चाचण्या मूत्रपिंडाच्या, यकृताच्या

डॉ हरीश सरोदे
Monday, 4 March 2019

डॉक्‍टर रक्तदाबाचे निदान करतात. पण अनेक वेळा त्यांचे समाधान होत नाही. मग ते मूत्रपिंडाच्या आणि यकृताच्या कार्यक्षमतेच्या चाचण्या करायला सांगतात. नेमके काय पाहिले जाते या चाचण्यांमधून ...

डॉक्‍टर रक्तदाबाचे निदान करतात. पण अनेक वेळा त्यांचे समाधान होत नाही. मग ते मूत्रपिंडाच्या आणि यकृताच्या कार्यक्षमतेच्या चाचण्या करायला सांगतात. नेमके काय पाहिले जाते या चाचण्यांमधून ...

मूत्रपिंडाच्या म्हणजेच ‘रिनल फंक्‍शन टेस्ट’मध्ये ब्लड युरिया, सिरम क्रियाटिनीन आणि युरिक ॲसिड या तपासण्या येतात. मूत्रपिंडाचे कार्य कसे सुरु आहे, तसेच शरीराच्या चयापचय यंत्रणेचे संतुलन कसे आहे याबद्दल त्यातून माहिती मिळते. किडनीच्या कार्यात रक्तातील अशुद्ध द्रव्ये वेगळी करून ती लघवीमधून शरीराबाहेर टाकणे ही महत्वाची गोष्ट होत असते. अनेक कारणांमुळे रक्ताभिसरण अतिरिक्त दाबाने झाले अथवा किडनीतील द्रव्ये गाळून वेगळी करण्याची प्रक्रिया सुरळीत नसेल तर या घटकांच्या सामान्य पातळ्यांमध्ये फरक दिसून येतो आणि त्यावर पुढची उपाययोजना, औषधांचे प्रमाण या गोष्टी अवलंबून असतात. यातील क्रिॲटिनीन ही तपासणी किडनीच्या आजारासाठी महत्त्वाची समजली जाते. 

सामान्यतः युरिया १५ ते ४०, क्रियाटिनीन ०.५ ते १.५ आणि युरिक ॲसिड २.५  ते ६ अशा असतात. वय आणि लिंगानुसार याच्या सामान्य पातळ्यांमध्ये थोडाफार फरक असू शकतो. 

याव्यतिरिक्त किडनी फंक्‍शन टेस्ट करताना इलेक्‍ट्रोलाइट्‌स आणि कॅल्शिअम , फॉस्फरस हे क्षार याचाही अंतर्भाव गरजेनुसार केला जातो. इलेकट्रोलाईट्‌स मध्ये सोडिअम , पोटॅशिअम आणि क्‍लोराईड या घटकांचा समावेश असतो.  

लिव्हर फंक्‍शन टेस्ट्‌स (यकृताच्या तपासण्या) 
    यामध्ये बिलिरुबिन , एसजीपीटी, एसजीओटी, अल्कलाईन फॉस्फटेज, सिरम प्रोटीन  या तपासण्या केल्या जातात. पैकी बिलिरुबीनचे टोटल, डायरेकक्‍ट आणि इन्डायरेक्‍ट असे प्रकार असतात, तर प्रोटीनचे टोटल,अल्बुमिन आणि ग्लोबुलीन असे प्रकार असतात. यामध्ये बिलिरुबीनच्या प्रमाणावर काविळीचे निदान होते. एसजीओटी आणि एसजीपीटी ही एन्झाइम्स यकृताच्या पेशींची स्थिती दर्शवतात, तर अल्कलाईन फॉस्फटेज हे यकृत आणि पित्ताशय यामधील कार्याबद्दल सांगते. प्रथिनांची पातळी ही यकृतामधून किती प्रथिने रक्तात सोडली जात आहेत हे सांगते. 

यकृताचे कार्य हे शरीरातील अशुद्ध द्रव्ये वेगळी करणे, प्रथिनांची निर्मिती करणे असे ढोबळमानाने असते. कोणत्याही विषाणूजनक आजारांमध्ये एसजीपीटी, एसजीओटी वाढलेल्या आढळतात . याशिवाय काविळीमध्ये काही प्रकारात त्या खूप वाढलेल्या असतात. इतर वेळा कोणतेही औषध शरीराला झेपते आहे की, त्याचे नीट पचन होण्याऐवजी दुष्परिणाम होत आहेत यासाठी या निष्कर्षांची खूपच मदत होते. त्यासाठीही काही औषंधाच्या उपाययोजनेपूर्वी आणि नंतर या तपासण्या कराव्या लागतात. 

याव्यतिरिक्त ग्यामाजीटी (जीजीटी) ही देखील एक तपासणी असून यकृताच्या दीर्घ मुदतीच्या आजारात त्याचा उपयोग केला जातो. 

लिपिड प्रोफाइल 
सर्वसाधारणपणे शरीरातील चरबीचे प्रमाण आणि हृदयाची स्थिती यासाठी ही तपासणी केली जाते. लिपिड तपासणीत कोलेस्टेरॉल, एचडीएल कोलेस्टेरॉल, एलडीएल कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइडेस आणि त्यांची व्हीएलडीएल आणि गुणोत्तर याचा समावेश होतो. यातील ट्रायग्लिसेराइडेस या तपासणीसाठी बारा ते चौदा तास उपाशी असणे आवश्‍यक असते. या कालावधीत रुग्ण पाणी पिऊ शकतो अथवा त्याची नेहमीची इतर औषधे घेऊ शकतो. 

सिरम कोलेस्टेरॉल हे शरीरातील चरबीचे एकत्रित प्रमाण दर्शविते. या एलडीएल कोलेस्टेरॉलला ‘बॅड कोलेस्टेरॉल’ म्हटले जाते. तर एचडीएल कोलेस्टेरॉल हे हृदयाच्या कार्याबद्दल भाष्य करते आणि त्याला चांगले म्हणजे ‘गुड कोलेस्टेरॉल’ म्हटले जाते. याचा अर्थ सामान्यतः सिरम कोलेस्टेरॉल मर्यादेच्या आत असावे, तर एचडीएल कोलेस्टेरॉल हे जेवढे जास्त तेवढे उत्तम आणि ते फक्त व्यायामाने नियंत्रित होते. एलडीएल कोलेस्टेरॉल हे एका विशिष्ट मर्यादेबाहेर थेट हृदयावर येणाऱ्या ताणाच्या दुष्परिणामाबद्दल शक्‍यता व्यक्त करते. ट्रायग्लिसेराइडेस ही तपासणी रक्तवाहिन्यांच्या स्थितीबद्दल अथवा त्यातून अतिरिक्त दाबाने वाहणाऱ्या रक्ताबद्दल अंदाज देते. तथापि ही तपासणी आहारविहारातील आदल्या दिवशीच्या अथवा अगदी जवळच्या काळातील अतिरिक्त गोड अथवा तेलकट खाण्याने, तसेच अपुरे उपाशी असण्याच्या म्हणजे तपासणीआधी कमी तास उपाशी असण्याने बदलू शकते. या सर्व चाचण्यांचे निष्कर्ष घेऊन काही गुणोत्तरे काढली जातात आणि त्यांवरूनही एकंदरीत अवस्थेचा अंदाज बांधता येतो. 

याबद्दलचे विविध शोधनिबंध आणि बदलती मानके यामुळे रुग्ण गोंधळात पडतात. तथापि कोलेस्टेरॉल टोटल मर्यादेत असणे, नियमित व्यायामाने चांगले-गुड कोलेस्टेरॉलची पातळी चांगली राखणे आणि आहार विहारातल्या योग्य समतोलाने ट्रायग्लिसेराईड्‌स प्रमाणात असणे हे नेहमीच हितावह असते. तसेच ही पूर्ण चाचणी करताना बारा ते चौदा तास उपाशी असणे आणि आदल्या दोन दिवशी मिठाई, दुधाचे पदार्थ यांचे सेवन टाळणे ही गोष्ट उपयुक्त ठरेल. शिवाय नुसतेच सिरम कोलेस्टेरॉल करताना कोणत्याही ‘फास्टिंग’ची गरज नसते हेही लक्षात घ्यायला हवे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tests of the kidney and liver Health Care