जागतिक मधुमेह दिन : ही लक्षणे दिसताच व्हा सावध, अशी घ्या काळजी

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 14 November 2019

मधुमेह झालेल्या व्यक्तीने रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब, कोलेस्ट्राॅल यांना नियंत्रणात न ठेवल्यास अनेक अवयवांवर याचा अत्यंत विपरित परिणाम होतो.

कार्य करण्यासाठी शरीराला उर्जेची आवश्यकता असते. ग्लुकोजमधून शरीर ही उर्जा प्राप्त करते. रक्ताच्या माध्यमातून शरीराच्या सर्व भागांपर्यंत हे ग्लुकोज पोहोचवले जाते. मात्र रक्तात याच ग्लुकोजचे प्रमाण जास्त झाल्यास मधुमेह विकार जडतो. मधुमेहामुळे रक्त वाहिन्यांवर सर्वाधिक विपरित परिणाम होतो. त्यांच्यात ग्लुकोज साचल्याने रक्तभिसरणामध्ये अडथळा येतो. 

मधुमेह झालेल्या व्यक्तीने रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब, कोलेस्ट्राॅल यांना नियंत्रणात न ठेवल्यास अनेक अवयवांवर याचा अत्यंत विपरित परिणाम होतो. त्यामुळे मधुमेहग्रस्त व्यक्तींनी कोणकोणती काळजी घ्यायला हवी, हे येथे सांगत आहोत. 

1) डोळ्यांची तपासणी अवश्य करावी
मधुमेहच्या सर्व रुग्णांनी वर्षातून किमान एकदा तरी डोळ्यांची तपासणी अवश्य करावी. डोळ्यांचा पडदा म्हणजेच रेटिनावर सुज आल्यास किंवा कोलेस्ट्राॅल जमा झाल्यास अंधत्व येण्याचा धोका असतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच नियमितपणे नेत्रतपासणी करावी. 

2) त्वचेवर फोड येणे, खाज याकडे दुर्लक्ष नको
वारंवार चेहऱ्यावर फोड येणे, जखम भरण्यास विलंब होणे, शरीराला खाज येणे हि मधुमेहाची लक्षणे असू शकतात. तसेच मधुमेहग्रस्त व्यक्तीच्या पायाच्या संवेदना कमी होतात. त्यामुळे पायाला जखम झाल्यावरही त्याकडे त्याचे लक्ष जात नाही. त्यामुळे छोटछोट्या जखमांमुळेही गँगरीन होण्याचा धोका असतो. 

3) हार्ट अटॅकची शक्यता तीन पटींनी वाढते
सामान्य नागरिकांपेक्षा मधुमेहग्रस्त व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याची शक्यता तीन पटींनी अधिक असते. बहुतांश वेळा हार्ट अटॅकपुर्वी अस्वस्थता, छातीत वेदना होणे, घाम येणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी मधुमेहग्रस्त व्यक्तींनी वर्षातून एकदा ह्रद्य, कोलेस्ट्राॅल आणि रक्तदाबाची चाचणी अवश्य करावी. नियमित व्यायायाम करुन वजनदेखील नियंत्रणात ठेवावे.

4) मुत्रपिंडविकार
वारंवार रक्तातील साखरेची पातळी कमी होणे, पायाला सुज येणे आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होत असेल, तर हे मुत्रपिंड विकाराचे लक्षण असु शकते. आणि याचा थेट संबंध मधुमेहाशी आहे. त्यामुळे अशी लक्षणे आढळताच तातडीने तपासणी करुन घ्यावी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world diabetes day : how to take care