खाद्यभ्रमंती : लातूरचं संजय क्वालिटी रिफ्रेशमेंट

महाराष्ट्र आणि पोहे यांचं नातं अतूट आहे. कोकणची स्पेशालिटी असलेले कोळाचे पोहे किंवा दडपे पोहे ते नागपूरमधील लोकप्रिय तर्री पोहे किंवा चना पोहे.
खाद्यभ्रमंती : लातूरचं संजय क्वालिटी रिफ्रेशमेंट

महाराष्ट्र आणि पोहे यांचं नातं अतूट आहे. कोकणची स्पेशालिटी असलेले कोळाचे पोहे किंवा दडपे पोहे ते नागपूरमधील लोकप्रिय तर्री पोहे किंवा चना पोहे. उभ्या आडव्या पसरलेल्या महाराष्ट्रातील पोह्यांचं वैविध्य नुसतं ऐकलं, तरी तोंडाला पाणी सुटतं. साधे कांदा पोहे, बटाटा पोहे, दही पोहे, ताक पोहे, दूध पोहे वगैरे. बरं नव्या प्रयोगांनुसार कोणी साध्या पोह्यांवर सांबार टाकून देतं, तर कुणी मटकी किंवा रस्सा मारून पोहे देतं. बरं, इंदूरचे पोहे आणि गोव्यातील गुळाचे पोहे नि कढीचे पोहे आणि इतर प्रकार मोजल्यास हे पोहेपुराण आणखीनच व्यापक होईल. वसईमध्ये शुद्ध शाकाहारी पोह्यांची चिकनसोबत युती करून ‘भुजिंग’ नावाचा अफलातून पदार्थ तयार केला जातो.

तर असे हे सर्वव्यापी, सर्वप्रिय पोहे. सकाळी न्याहारीला किंवा संध्याकाळी हलक्या नाश्त्यासाठी अगदी योग्य पर्याय. पोहे म्हटले की, अनेक ठिकाणं आठवतात. त्यातलं एक म्हणजे लातूरमधलं संजय क्वालिटी रिफ्रेशमेंट. ‘साम मराठी’मधील सहकारी, मित्र आणि मार्गदर्शक अनिल पौलकरनं काही वर्षांपूर्वी ‘संजय क्लालिटी रिफ्रेशमेंट’ या अफलातून जॉइंटची भेट घडवून आणली. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘संजय क्वालिटी’ आहे. नावाप्रमाणेच सर्व पदार्थ एकदम ‘क्वालिटी’. फक्त पोहे नाहीतर मिसळ, दही मिसळ, पुरीभाजी, बटाटा वडा, साबुदाणा खिचडी, बटाटा वडा, उपवासाची थाळी आणि बरंच काही... इथलं वैशिष्ट्य म्हणजे डिश कोणतीही असली, तरी छान सजवून देतात. अनेक गोष्टी ‘ॲड ऑन’ म्हणून मिळतात. प्रत्येक टेबलवर दाण्याच्या चटणीची एक वाटी ठेवलेली असते. तुम्हाला हवी असेल, तर कोणत्याही पदार्थाबरोबर हवी तितकी चटणी घेऊ शकता.

आपण दिलेल्या ऑर्डरची डिश आपल्यासमोर आली, की कधी एकदा पहिला घास खातोय, असं व्हावं इतकी ‘टेम्प्टिंग’ असते सजावट. एक प्लेट पोहे ऑर्डर केल्यानंतर फक्त पोहे आणि लिंबाची फोड इतकंच येणं अपेक्षित असतं, पण संजयमध्ये पोहे ऑर्डर केल्यानंतर पोह्यांसोबत मसाला पापड, टोमॅटो आणि काकडीचे काही काप, पोह्यांवर पसरलेली बारीक (झिरो) शेव आणि तळलेले शेंगदाणे. हे कमी म्हणून की काय, सोबत एक डॉलर जिलेबी आणि वाटीत घट्ट दही पण होतं. मग अस्मादिक एकदम प्रेमात...

सजावट चांगली असली आणि चव बकवास असलं की मूड जातो. काही ठिकाणी येतोही तसा अनुभव, पण ‘संजय’मध्ये चवही सजावटीपेक्षा थोडी अधिकच भारी. पोह्यांमध्ये लिंबू पिळूनच दिलेलं बहुधा. त्यामुळं पोह्यांना एक हलकी आंबट चव आली होती. शिवाय मिरची किंवा ठेचा होता... पण फारच कमी प्रमाणात. इतका कमी, की चव लागत होती पण झटका जाणवत नव्हता. तिखट आणि हलक्या आंबट नि तिखट चवीचे पोहे खरोखर एकदम भन्नाट. नुसते पोहेच इतके भारी की सहकलाकारांची आवश्यकताच भासू नये. कदाचित ‘कॉम्प्लिमेंटरी’ म्हणून ते येत असावेत. पोह्यांसोबत घट्ट मलईदार दही हे कॉम्बिनेशन एकदम भारी लागतं. मला कधीतरी खायला आवडतं. तो योग ‘संजय’मध्ये जुळून आला.

पोह्यानंतर मिसळ मागविली. मिसळ एकदम झणझणीत. मटकीचा रस्सा एकदम झणझणीत आणि तर्रीबाज. रस्सा तयार करण्यासाठी वापरलेला मसाला वैशिष्ट्यपूर्ण होता. रश्शाचा पहिला घास घेतल्यानंतर लगेच ते जाणवलं. दही मिसळ हा प्रकारही होता. पण मिसळ दह्यासोबत खाणं हा मला वैयक्तिकरित्या मिसळीचा अपमान वाटतो. झणझणीत झेपत नसेल, तर मिसळ खाऊ नका. उगाच दही वगैरे घालून मिसळ खाण्यात काय मजा.

पोहे आणि मिसळनंतर चहाऐवजी मस्त ताक मागवलं. मलईदार दह्यापासून बनविलेलं ताक तितकंच अप्रतिम आणि वरच्या दर्जाचं होतं. ‘संजय’मुळं लातूरमधील आमची दिवसाची सुरुवात एकदम ‘क्वालिटी’ आणि ‘रिफ्रेशिंग’ अशीच झाली. लातूरला कधी जाणं झाल्यास आवर्जून आस्वाद घ्यायला विसरू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com