esakal | हेल्दी रेसिपी : कारल्याचे वरण
sakal

बोलून बातमी शोधा

Karlyache-Varan

‘मुलांनी सर्व भाज्या खायला हव्यात आणि त्यासाठी त्यांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या भाज्यांची देठे चोखायला द्यावीत. त्यामुळे त्या भाज्यांची चव त्यांना लहानपणापासूनच समजेल,’’ हा माझ्या आईने नवमातांना दिलेला सल्ला मी अनेकदा ऐकला आहे.

हेल्दी रेसिपी : कारल्याचे वरण

sakal_logo
By
शिल्पा परांडेकर

‘मुलांनी सर्व भाज्या खायला हव्यात आणि त्यासाठी त्यांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या भाज्यांची देठे चोखायला द्यावीत. त्यामुळे त्या भाज्यांची चव त्यांना लहानपणापासूनच समजेल,’’ हा माझ्या आईने नवमातांना दिलेला सल्ला मी अनेकदा ऐकला आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कदाचित तिच्या या प्रयत्नांमुळेच आम्हीदेखील अगदी एखादी-दुसरी भाजी सोडल्यास जवळपास सर्व ऋतूंतील, सर्व भाज्या अगदी आवडीने खातो. हिंगोलीतील अशाच या सुगरण आजी. आपल्या नातवंडांनी सर्व भाज्या खाव्यात यासाठी एखाद्या आवडत्या पदार्थात त्यांची नावडती भाजी बेमालूमपणे घालून तो पदार्थ इतका चविष्ट बनवितात, की मुले तो नवा पदार्थ नेहमीच आवडीने खातात. अशा अनेक गमतीजमती त्यांच्याकडून मी ऐकल्या. त्यातीलच एक साधी, सोपी आणि चविष्ट रेसिपी – ‘कारल्याचे वरण’.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कारले म्हटले की, आपण बरेचजण नाक मुरडतो. मात्र, वरण साधारणपणे  आपल्या रोजच्याच जेवणातला एक आवश्यक पदार्थ. अशा आवश्यक पदार्थात एखादी नावडती भाजी किंवा एखादा नावडता, परंतु पौष्टिक पदार्थ घालण्याची आजींची ही कल्पना नक्कीच भन्नाट आहे. त्यामुळे सकस, परंतु नावडते पदार्थ आवडते बनतील. कारल्याची उपयुक्तता व त्याची गुणवैशिष्ट्ये आपल्या प्राचीन आहारशास्त्रात देखील नमूद केली आहेत.

कारवेल्लीफलं भेदी लघु तिक्तं च शीतलम् |
पित्तासृक्कामलापाण्डुकफमेद: कृमीञ्जयेत||

अर्थात, कारले हे शरीरातील संधात फोडणारे, पचायला हलके, कडू व थंड असते. पित्त, रक्त, कावीळ, पाण्डुरोग, कफ, मेद व कृमींचा नाश करणारे असते.

आयुर्वेदानुसार, कारल्याबरोबरच कारल्याची पानेही औषधी आहेत. मूळव्याध, खरुज, नायटा, रक्तशुद्धी, यकृताचे आजार, दमा, सर्दी, खोकला अशा विविध आजारांमध्ये पानांचा रस इतर औषधी पदार्थांसोबत घेतल्यास आराम मिळतो. मधुमेहींसाठी व चरबी कामी करणाऱ्यांसाठी कारल्याचे नियमित सेवन करणे उपयुक्त ठरते.

साहित्य - कोवळी कारली, मुगाची किंवा तुरीची डाळ, हिंग, मीठ, चिंच, गूळ, ओले खोबरे, कोथिंबीर.

फोडणी - तेल, जिरे, मोहरी, हिंग, मिरची, कढीपत्ता.

कृती -
१. कारल्यातील बिया काढून मीठ लावून बाजूला ठेवणे व नंतर सुटलेले पाणी काढून टाकणे.
२. धुतलेली डाळ व कारल्याच्या फोडी आधणात एकत्रित शिजवून व नंतर एकजीव घोटून घेणे.
३. फोडणी करून घोटलेली डाळ, चिंच, गूळ, किंचित पाणी, मीठ घालून उकळणे.
४. शेवटी खोबरे व कोथिंबीर घालणे.
    
मला खात्री आहे की, आजींची ही चविष्ट रेसिपी चाखल्यानंतर कारल्याची ‘नावडती’ भाजी नक्की ‘आवडती’ होईल.

loading image