हेल्दी रेसिपी : वाटल्या दाळीचे मोदक

Daliche-Modak
Daliche-Modak

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहोत. गेले काही दिवस आपल्याकडे बाप्पाला आवडणाऱ्या नैवेद्याच्या अनेक पदार्थांची रेलचेल होती आणि आज निरोपाच्या दिवशीही आपल्याकडे एक विशेष पदार्थ प्रसादासाठी केला जातो तो म्हणजे ‘मोकळं तिखट’ किंवा ‘वाटली डाळ’. गणपती विसर्जनाच्या दिवशी तसेच श्रावणात ज्यांच्याकडे लसूण-कांदा वर्ज्य असेल, त्यांच्याकडे ‘मोकळं तिखट’ केले जाते. शिवाय लवकर खराब होत नसल्यामुळे पूर्वी प्रवासातही हा पदार्थ आवर्जून नेला जात असे. या पदार्थाबाबत माझ्या लहानपणीची एक गोड आठवण आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या दिवशी माझी आई मोकळ्या तिखटाचे मोदक किंवा कानवले करीत असे, मग मी व माझा भाऊ हे मोदक वा कानवले किंवा असा घरीच बनविलेला खाऊ घेऊन गणपतीची मिरवणूक बघायला जायचो. तेव्हा आजच्या इतके ‘पॅकेजड’ पदार्थ मिळत नव्हते. शिवाय नेहमीच आईच्या अशा छोट्याशा कृतींमुळे घरच्या पौष्टिक पदार्थांचे महत्त्व नकळत आमच्यात रुजत असे. 

आपण आज मोकळ्या तिखटाच्या मोदकांची रेसिपी पाहणार आहोत. हरभरा भारतीय आहारातील महत्त्वाच्या घटकांपैकी एक. हरभऱ्याचा कोवळा पाला, अख्खे हरभरे, डाळ, पिठाचा वापर आपल्या स्वयंपाकात होतो. हरभरे व हरभऱ्याची डाळ शाकाहारी लोकांसाठी प्रथिनाचा उत्तम स्रोत असून अनेक महत्त्वाची खनिजे व पोषक घटकांनी युक्त अशी हरभऱ्याची डाळ स्नायूवर्धक व बल प्रदान करणारी आहे. हरभरा डाळीचे नियमित व योग्य प्रमाणातील सेवन मधुमेही लोकांसाठी व वजन कमी करणाऱ्यांसाठी लाभदायक आहे. हरभरा डाळीचे पीठ त्वचा व केसांना लावण्याचेही अनेक फायदे आहेत. 

साहित्य - रात्रभर भिजवलेली हरभरा डाळ, मिरची, जिरे, मीठ, किंचित साखर. फोडणीसाठी तेल, जिरे-मोहरी, हळद, कडीपत्ता. सजावटीसाठी ओले खोबरे, कोथिंबीर. 
मोदक - तांदळाची उकड किंवा कणीक. 
कृती - 
१. डाळ, मिरची, जिरे व मीठ एकत्रित वाटून घेणे. 
२. फोडणी करून त्यात हळद व वाटलेली डाळ घालून कोरडी व सुट्टी होईपर्यंत परतत राहणे. 
३. झाकण ठेवून एक वाफ आणणे. 
४. गॅस बंद करून ओले खोबरे, कोथिंबीर घालून एकत्रित करणे. 
५. उकडीची किंवा कणकेची पारी करून त्यात मोकळे तिखट भरून मोदक वळावेत व वाफवावेत. 
६. वरून कोथिंबीर व फोडणी घालून सजावट करावी. 

टीप - चिंचेच्या चटणीसोबत हे मोदक छान लागतात. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com