खाद्यभ्रमंती : चला, ‘कॉकटेल’ घेऊ...

Cocktail
Cocktail

तुम्ही वेंगुर्ल्यात किंवा सिंधुदुर्गात कुठेतरी आहात. भर दुपारी किंवा संध्याकाळी एखाद्या मित्रानं किंवा मैत्रिणीनं विचारलं, की ‘कॉकटेल’ घ्यायचं का? तर अजिबात गांगरून जाऊ नका. तुम्ही ‘घेणारे’ किंवा मद्यशौकीन नसलात, तरी एकदम बिनधास्त ‘हो’ म्हणून टाका! कारण सिंधुदुर्गात मिळणारं ‘कॉकटेल’ हे प्रकरण एकदम भन्नाट आहे. इतर हॉटेलात मिळणाऱ्या ‘त्या’ कॉकटेलशी याचा काहीही संबंध नाही. 

पुण्या-मुंबईत किंवा इतर अनेक ठिकाणी मिल्कशेक, मस्तानी, फालुदा किंवा फ्रूट सॅलेड हे पदार्थ सर्रास मिळतात. कॉकटेल म्हणजे या सर्वांच्या जवळ जाणारा, पण तरीही थोडा वेगळा पदार्थ...दूध कोल्ड्रिंक, त्यात आइस्क्रिमचे दोन स्कूप, स्धानिक पातळीवर मिळणाऱ्या सिझनल फळांचे काप, काजू-बदामाचे काप, बेदाणे-मनुका, वरून पावडर करून टाकलेला बोर्नव्हिटा किंवा कोको पावडर आणि सजावटीसाठी चेरी आणि एखादं बिस्किट किंवा वॅफल... फळांमध्ये अर्थातच, उपलब्धतेनुसार आंबा, पपई, केळं, चिकू अथवा आणखी एखाद्या फळाचा समावेश. वेगळ्या पदार्थांचं एकदम भारी कॉम्बिनेशन म्हणून ‘कॉकटेल’. 

‘कॉकटेल’ म्हणजे सिंधुदुर्गाची खासियत. वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी आणि मालवणला हे हमखास मिळणारच. रत्नागिरी, कोल्हापूर किंवा पुण्या-मुंबईत हे ‘कॉकटेल’ मिळायचं नाही, असं सिंधुदुर्गवासी अभिमानानं सांगतात. परवा पुण्यामध्ये कोल्हापूरच्या ‘राजमंदिर’च्या बोर्डावर ‘आइस्क्रिम कॉकटेल’ हा बोर्ड पाहिला. पण ते प्रकरण नेमकं काय आहे, हे कळायला मार्ग नाही. तूर्त तरी ‘कॉकटेल’वर सिंधुदुर्गाचा ‘स्वामित्व हक्क’ आहे, असं मानायला हरकत नाही.

आतापर्यंत तीन-चार वेळा सावंतवाडी, वेंगुर्ल्याला जाणं झालं, तेव्हा शशांक मराठेसोबत ‘कॉकटेल’चा आस्वाद घेत बसणं होतंच. अगदी लेटेस्ट गेलो तेव्हा वेंगुर्ल्यात राजन गावडे यांच्या ''राजश्री कोल्ड्रिंक हाऊस''मध्ये बसलेलो. तिथं क्वालिटी म्हणूनही एक ‘कोल्ड्रिंक हाऊस’ आहे, तिथं मागं एकदा बसलेलो. पदार्थ इतका दमदार, की एका ‘कॉकटेल’मध्ये माणूस हमखास गार पडतो. 

सर्वप्रथम हा पदार्थ नेमका कोणी किंवा कधी तयार केला, याचे पुरावे उपलब्ध नाहीत. पण तो चाळीस वर्षांपूर्वी सर्वप्रथम तयार झाला असावा, असं ‘राजश्री कोल्ड्रिंक’चे गावडे सांगतात. बाजारात त्यावेळी उपलब्ध असलेल्या फ्रूड सॅलेड, आइस्क्रिम आणि दूध कोल्ड्रिंक या पदार्थांना एकत्र करून ‘कॉकटेल’ची निर्मिती झाली असावी आणि कालांतराने इतर पदार्थ त्यात अॅड होत गेले, असा त्यांचा दावा. 

पूर्वी फक्त व्हॅनिला या एकाच स्वादाच्या दूध कोल्ड्रिंकमध्ये ‘कॉकटेल’ तयार व्हायचे. पण आता बटरस्कॉच, मावा, आंबा किंवा इतरही फ्लेव्हर्स उपलब्ध आहेत. आता सर्व फ्लेव्हर्समधील आइस्क्रिम्स देखील वापरली जातात. कोणत्या फ्लेव्हरच्या दूध कोल्ड्रिंक सोबत कोणतं आइस्क्रीम असं काही बंधन नाही. आवड आपलीआपली.

काळ उलटला, पिढ्या बदलल्या, पण सिंधुदुर्गातील लोकांचं ‘कॉकटेल’वरचं प्रेम आजही अबाधित आहे. प्रेम आमचंही आहे, पण माझ्यासारख्या लोकांची अडचण एकच आहे आणि ती म्हणजे सिंधुदुर्गातून कोणी येत असेल, तर काजू, खाजा किंवा बुंदीचे कडक लाडू पार्सल मागविता येतात. पण ‘कॉकटेल’ मात्र, मागविता येत नाही. अर्थात, ते बरंच आहे एकप्रकारे. त्यानिमित्तानं सिंधुदुर्गाला जाऊन ‘कॉकटेल’चा आस्वाद घेण्याची संधी मिळते...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com