हेल्दी रेसिपी : दामटीचे लाडू 

शिल्पा परांडेकर 
Tuesday, 10 November 2020

हा काळ थंडीचा आणि या काळात स्निग्ध पदार्थ खाणे शरीरासाठी आवश्यक असते,त्यामुळे दिवाळीच्या पदार्थांमध्ये अशा स्निग्ध पदार्थांचा समावेश आपसूकच होतो.पूर्वीच्याकाळी दिवाळीचे पदार्थ साधे आणि मोजकेच असायचे.

दिवाळी आपल्या भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण. पौराणिक, सांस्कृतिक दृष्टीने या सणाचे महत्त्व आहेच, त्याचबरोबर इतर सणांप्रमाणेच दिवाळीच्या बाबतीतही ऋतू, हवामान आणि आहार, याचा विचार आपल्या पूर्वजांनी केला आहे. 

हा काळ थंडीचा आणि या काळात स्निग्ध पदार्थ खाणे शरीरासाठी आवश्यक असते, त्यामुळे दिवाळीच्या पदार्थांमध्ये अशा स्निग्ध पदार्थांचा समावेश आपसूकच होतो. पूर्वीच्या काळी दिवाळीचे पदार्थ साधे आणि मोजकेच असायचे. आत्तासारखी पदार्थांची रेलचेल पूर्वी नसायची. गऱ्याचे लाडू (रव्याचे लाडू), कळीचे लाडू, दामटीचे लाडू, ताणली जाणारी चकली, काटेकडबोळी (चकली), राळ्याचे कानवले, शेव, हे काही जुने पदार्थ. पूर्वी दिवाळीच्या पदार्थांमध्ये मैद्याचा वापर होत नसे. मैदासदृश्य पदार्थ म्हणजे ‘पिठी’ कानवले (करंजी), वगैरे साठी वापरली जायची आणि अर्थातच, ती घरी बनविलेली असायची. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पूर्वी दिवाळीचे पदार्थही शेजारणी एकमेकींच्या मदतीने करीत असत. फराळाची सुरुवात एखाद्या गोड पदार्थाने केली जायची. माझ्या आजीचा दिवाळीचे पदार्थ करण्यात मोठा हातखंडा! आपली आजी इतर नवीन गृहिणींना क्लिष्ट वाटणारे पदार्थ लीलया कशी बनविते, याचे आकलन त्यावेळी व्हायचे नाही; मात्र अप्रूप जरूर वाटत असे. आणखी एक वेगळी गोष्ट माझ्या प्रवासात मी ऐकली, ती म्हणजे दिवाळीला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ‘शेवयांचा भात’ करत असत. आजही अनेक ठिकाणी दिवाळीच्या फराळासोबत दही-पोहे खाण्याची प्रथा आहे. दिवाळीचे पदार्थ पचनास सोपे व्हावेत, यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेले ते प्रयोजन आहे! 

आजकाल यातील काही प्रथा मागे पडल्या मात्र आठवणींच्या कप्प्यात त्या पदार्थांचा आणि रीतींचा खमंगपणा व खुसखुशीतपणा आजही कायम आहे. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

साहित्य – बेसन, गोळीबंद साखरपाक, काजूचे तुकडे, वेलची-जायफळ पूड, तूप किंवा तेल. 

कृती –  १. बेसन मळून घेणे व पोळी लाटून थोड्या तेलावर किंवा तुपावर भाजून घेणे. 
२. पोळी साधारण गार झाल्यावर पोळीचा चुरा करून घेणे. (अगदी बारीक चुरा न करता दरदरीत चुरा करावा.) 
३.पाक व चुरा एकत्र करून साधारण परतणे. 
४. उर्वरित साहित्य एकत्र करून कोमट असताना लाडू वळावेत. 

दामटीचे लाडू, हा प्रकार पूर्वी महाराष्ट्रात होत असे. दामटी म्हणजे बेसनाची पोळी लाटून निखाऱ्यावर भाजत किंवा काही ठिकाणी ती तळून त्यांपासून लाडू बनवित. यामध्ये तेलाचा/तुपाचा वापर अगदी नकळत असल्यामुळे एरवीही हे पौष्टिक लाडू आहारात घेता येतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Healthy recipe Damti laddu