पौष्टिक ज्वारीच्या कण्या... 

शिल्पा परांडेकर 
Tuesday, 14 April 2020

सध्या लॉकडाउनमुळं कोणताही व्यायाम व डाएट नीट होत नाहीये, अशावेळी अशा सोप्या पाककृती आहारात अंतर्भूत करून वजन आणि आरोग्य आटोक्यात नक्की ठेवता येईल. 

‘धनगर बसला जेवाया आणि ताकासंगं शेवया,’ लहानपणी या म्हणीचं मला फार कुतूहल वाटायचं. कारण शेवया दुधासोबत खातात आणि ताकासोबत ‘कण्या’ खातात, हे मला पक्कं ठाऊक होतं. कारण मी आजोबांना रोज ताकासोबत कण्या खाताना पाहायचे. आजोबा जेवायला बसले की त्यांच्यासोबत कण्या खाण्यासाठी बसायचेच, हे ठरलेलं. आजोबांसोबत कण्या ‘वरपण्याचा’ आनंद काही औरच. हो, बरोबर वाचलेत. ‘वरपणे’च. म्हणजे शुद्ध भाषेत ‘ओरपणे’ किंवा ‘भुरका मारणे’. कण्या खाण्याची ही खास पद्धत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खरेतर कण्या हा सर्व स्तरांतील लोकांचा पदार्थ. महाराष्ट्रात बहुतांशी भागात कण्या खाल्ल्या जातात, परंतु सध्या त्याचे प्रमाण कमी झालेय. पूर्वी दुष्काळात किंवा अन्नाचा तुटवडा असेल तेव्हा कोंड्याची भाकरी खाऊन दिवस काढले जात असत. यात नक्कीच तथ्य आहे. कारण कण्या थोड्या प्रमाणात खाल्ल्या, तरी पोट लगेच भरतं. आजच्या डाएटच्या ‘वन प्लेट मिल’ संकल्पनेमध्ये चपखल बसणारा, झटपट होणारा, पचायला हलका, ऊर्जा देणारा असा पौष्टिक पदार्थ होऊ शकतो. शिवाय उन्हाळ्याच्या दिवसांत भूक कमी असते व उष्णताही अधिक असते, अशावेळी ताकातील कण्या नक्कीच रोजच्या जेवणाला उत्तम पर्याय ठरू शकतात. ताकाला तर पृथ्वीवरचे अमृत मानले जाते. असे हे ताक रुचकर, पचन करणारे, तृप्तीकारक, पोटातील विकार बरे करणारे आहे, तर ज्वारी ग्लुटेन फ्री, प्रतिकारशक्ती वाढवणारी, रक्तातील साखर कमी करणारी आहे. 

सध्या लॉकडाउनमुळं कोणताही व्यायाम व डाएट नीट होत नाहीये, अशावेळी अशा सोप्या पाककृती आहारात अंतर्भूत करून वजन आणि आरोग्य आटोक्यात नक्की ठेवता येईल. 

ज्वारीच्या कण्या 

साहित्य – १. लापशीप्रमाणे भरडलेली ज्वारी, मीठ. 

कृती – १. भरड थोडा वेळ पाण्यात भिजवून मीठ घालून भाताप्रमाणे शिजवून घेणे. किंवा आधणात शिजवणे. 

२. दूध अथवा ताकासोबत खावे. 

टिप्स – 
१. शिजवताना आवडीनुसार विविध डाळींचा वापर करता येईल. 
२. या भरडीचा वापर करून उपमा, दलिया, खिरीसारखे पदार्थही बनविता येतील. 
३. जेवणाप्रमाणेच नाष्ट्यालाही कण्या उत्तम पर्याय ठरू शकतो. अलीकडे जसे आपण ओट्स वगैरे खातो, तसे कण्या दुधातून खाता येतील. 
४. कण्या ज्वारी, बाजरी किंवा मक्यापासून बनवून साठवून ठेवता येतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Healthy Recipes Nutritious sorghum