जंक फुडस्‌ खाताय ..? सावधान !

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

वडापाव किंवा सामोसे सर्वसामान्यपणे असे पदार्थ ज्यांना आपण जंकफूड म्हणतो हे  बनवत असताना वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरलेले असते.

सांगली : वडापाव किंवा सामोसे यांचे नाव जरी घेतले तरी आपल्या तोंडाला पाणी आल्याशिवाय रहात नाही, परंतु आपण कधीही विचार करत नाही की असले पदार्थ कोणत्या तेलात बनवले असतील किंवा याचे शरीरावर कोणते वाईट परिणाम होतील? म्हणूनच सावधान !

जंक फुडस्‌ आणि ट्रान्स फॅट्‌स्‌

सर्वसामान्यपणे असे पदार्थ ज्यांना आपण जंकफूड म्हणतो हे  बनवत असताना वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरलेले असते. तसेच वापरून कमी झालेल्या तेलात परत नवीन तेल ओतून अशा तेलात हे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे जंकफूड मध्ये ट्रान्स फॅट्‌स म्हणजेच हायड्रोजन युक्त तैलीय घटकांचा समावेश खूप जास्त असतो.

हेही वाचा - फिटनेसाठी नदीचा ‘नाद’ करणारा ‘अवलिया’
 

 परिणाम ट्रान्स फॅट्‌सचा

ट्रान्स फॅट्‌स मुळे तेलाची घनता सुद्धा वाढते आणि त्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये हे घटक कोलेस्टेरॉल स्वरूपात चिकटून राहतात व आरोग्यास नुकसान पोचवतात. संशोधन असे सांगते की या ट्रान्सफॅट्‌स चा शरीरावर होणारा परिणाम हा दररोज धूम्रपान केल्याइतकाच गंभीर स्वरूपाचा असतो.

हेही वाचा - ‘इलेस्ट्रेशन’ हे भावना व्यक्त करण्याचे साधन आहे तरी काय ? जाणून घ्या
 

 कशात वापर ट्रान्स फॅट्‌सचा 

सर्वात जास्त ट्रान्स फॅट्‌स वनस्पती तुपात (डालडा) असतात. याबरोबरच सामोसे, वडापाव, केक, पिझ्झा, रस्क, पेस्ट्री, कुकीज, फ्रेंच फ्राय, बिस्कीट व सर्व फास्ट फूड मध्ये असतात. अशा पदार्थांचे नित्य सेवन केल्यास हृदयरोगाचा धोका २३ टक्‍क्‍यांनी वाढतो असे संशोधन सांगतं.

काय होते ट्रान्सफॅट्‌सने

ट्रान्सफॅट्‌स मुळे शरीरातील LDL कोलेस्टेरॉल अतिरिक्त प्रमाणात वाढून रक्तवाहिन्या आणि धमन्या ठिसूळ होतात याचबरोबर मधुमेह, नपुंसकत्व आणि अनेक प्रकारचे कॅन्सरची शक्‍यताही असते.

निश्‍चित प्रमाणाचे लेबल गरजेचे

इंडियन कॉउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन कमिटीने तेलातील ट्रान्सफॅट्‌स च्या नियमनाची मागणी केली आहे व निश्‍चित प्रमाणाचे लेबल प्रत्येक खाद्यपदार्थावर प्रकाशित करावी असे सूचित केले आहे.

खबरदारी काय घ्याल

यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे ट्रान्सफॅट्‌सच्या वाईट परिणामांपासून वाचायचे असल्यास असे खाद्यपदार्थ बाहेर खाणे टाळाच.  किंवा ते कायमस्वरूपी बंद करण्याशिवाय पर्याय नाही.

- डॉ. राहुल गौर,  DRRAHULG३६@GMAIL.COM


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Junk Food Side Effects