esakal | ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : खाद्यसेवेच्या ठिकाणांमधले ‘पोटभेद’

बोलून बातमी शोधा

Paneer-Masala}

जगातील सर्वांत पहिलं रेस्टॉरंट कुठे आणि कधी सुरू झाले याविषयी बऱ्याच वदंता आहेत. ग्रीक आणि रोमन काळात तयार जेवण मिळणारे काही बार किंवा दुकानसदृश जागा सापडल्या आहेत. तसंच चीनमध्ये अकराव्या शतकातील राजधानी काईफेंगमध्ये रेस्टॉरंटसारख्या जागा प्रचलित होत्या.

food
ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : खाद्यसेवेच्या ठिकाणांमधले ‘पोटभेद’
sakal_logo
By
मधुरा पेठे

जगातील सर्वांत पहिलं रेस्टॉरंट कुठे आणि कधी सुरू झाले याविषयी बऱ्याच वदंता आहेत. ग्रीक आणि रोमन काळात तयार जेवण मिळणारे काही बार किंवा दुकानसदृश जागा सापडल्या आहेत. तसंच चीनमध्ये अकराव्या शतकातील राजधानी काईफेंगमध्ये रेस्टॉरंटसारख्या जागा प्रचलित होत्या.

तेराव्या शतकात फ्रन्समध्ये ‘इन’ या नावाची आद्य रेस्टॉरंट होती- ज्यात एकाच मोठ्या टेबलावर अनेक जणांकरता ब्रेड, चीज, बेकन, रोस्ट केलेलं मांस आणि मद्य सर्व्ह व्हायचं. फ्रान्स आणि मुख्यतः पॅरिसमध्ये रेस्टॉरंटची परंपरा फार जुनी आहे. तिथे Tavern, कॅब्रेट, कॅफे, बिस्त्रो इत्यादी फूड किंवा ड्रिंक मिळणारी ठिकाणं बऱ्याच काळापासून आहेत; परंतु मॉडर्न रेस्टॉरंट म्हणावं अस सन १७६५मध्ये सुरू झालं. नंतर एकापेक्षा एक अशी राजेशाही आणि निरनिराळे पदार्थ सर्व्ह करणारी अनेक खास रेस्टॉरंट सुरू झाली. अशा राजेशाही रेस्टॉरंटमध्ये महागडं फर्निचर, सजावट असायची आणि प्रशिक्षित स्टाफ सज्ज असे. वाईनचे असंख्य पर्याय आणि कलात्मकतेने सजवलेले फ्रेंच पदार्थ असा तामझाम असायचा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतात म्हणाल, तर अगदी मौर्य काळात किंवा त्याही आधीपासून अनेक वर्षं पथिकांकरता राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था असे. काही ठिकाणी तिथल्या राजाकडून जेवण आणि गुरांकरता चारापाण्याची व्यवस्था असे, तर काही ठिकाणी पैसे खर्च करून ही सुविधा मिळत असे. मुळात कामानिमित्त घराबाहेर जास्त काळ राहणारे व्यापारी, पथिक, फिरस्ते, साधू संतांकरता ही पथिकगृहं बांधलेली असायची आणि तिथं शक्य तितकी उत्तम व्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला जायचा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगभरात आताच्या काळात अगणित रेस्टॉरंट आहेत आणि त्यांचे असंख्य प्रकारसुद्धा. त्यातील खास भारतीय असा म्हणावा ते म्हणजे थाळी रेस्टॉरंट. थाळीत एकाच वेळी अनेक पदार्थ वाढले जातात. मनसोक्त हवा तो पदार्थ थाळीत खाता येत असल्याने थाळी रस्टॉरंट्स ही भारतातील सर्वांत आवडती रेस्टॉरंट्स आहेत.  

आशियामध्ये हॉटपॉट हा अतिशय आवडता पदार्थ आहे. टेबलवरील शेगडीवर गरम उकळत सूप आणून ठेवतात आणि सोबत कच्च्या भाज्या, मांस आणि मासे आणून देतात. आपण स्वतः त्यात भाज्या, मांस आणि मासे घालून शिजवून खायचं आणि सोबत मनसोक्त सूप प्यायचं. संपूर्ण आशियामध्ये या प्रकारची रेस्टॉरंट्स अतिशय लोकप्रिय आहेत. फिरत्या रंगमंचासारख्या कॅनव्हेयर बेल्टवर फूड सर्व्ह करणारी रेस्टॉरंट्ससुद्धा जगभरात प्रसिद्ध आहेत. इथं अगदी लहान पोर्शनमध्ये पदार्थ डिशमध्ये सर्व्ह करतात आणि तो पदार्थ बेल्टवरून सरकत आपल्यासमोर येतो. त्यातील आवडता पदार्थ उचलून घ्यायचा आणि पोटभर खाल्लं, की मग डिश मोजून पैसे द्यायचे.

भारतात ढाबा हा अतिशय स्वस्त आणि ऑल इन वन असा रेस्टॉरंटचा प्रकार आहे. जिथं हायवेवरून प्रवास करणारे ट्रक ड्रायव्हर किंवा प्रवासी जेवणाकरता थांबतात- सोबत तिथंच आराम करायची सोय असते, बाजूलाच गॅरेज आणि पेट्रोलपंप असल्यानं सोयीस्कर पडतं. सोबत जेवणही स्वस्त आणि चविष्ट असतं. पंजाब हरियानाच्या हायवेवरील धाबे विशेष प्रसिद्ध आहेत. पंजाबी पद्धतीची भाजी, चिकन सोबत गरमागरम रोटी, जीरा राईस आणि पतियाळा ग्लासमध्ये भरपूर लस्सी असा मोजका पण मस्त मेन्यू असतो. याचसोबत भारतातल्या तीर्थक्षेत्रात अनेक ठिकाणी असंख्य अन्नछत्रं आहेत- जिथं तुम्ही मोफत जेवू शकता आणि जमल्यास यथाशक्ती दान दक्षिणा देऊ शकता. म्हणजेच पुढे येणाऱ्या अनेक यात्रेकरूंच्या जेवणाची सोय तुमच्या दानातून होते. 

आजच्या काळात रेस्टॉरंट हे खूप मोठं बिझनेस सेक्टर आहे आणि भारतात त्याची झपाट्यानं वाढ होत आहे. अनेक नवीन कन्सेप्ट राबवून ग्राहकांना आकर्षित केलं जात आहे. ग्राहकांनादेखील जगभरातील नवनवीन चवी आणि पदार्थ चाखायला मिळतात म्हणून ग्राहकदेखील रेस्टॉरंट्समध्ये गर्दी करतात. आज आपण खास ढाबा स्टाईल चमचमीत पनीर मसालाची रेसिपी पाहूयात.

ढाबा स्टाईल पनीर मसाला
साहित्य - २५० ग्राम पनीर, १ कप घट्ट दही, २ कांदे, २ टोमॅटोची पेस्ट, २ हिरव्या मिरच्या उभ्या कापून, १ चमचा आलं लसूण पेस्ट, दीड चमचा धने जीरा पावडर, पाव चमचा हळद, १ चमचा काश्मिरी मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, २ चमचे बटर,  २ चमचे तेल, १ चमचा क्रीम, १ टीस्पून कसुरी मेथी चुरून, मीठ, अख्खा गरम मसाला फोडणीकरता. 

कृती 

  • पनीरचे चौकोनी तुकडे कापून तेलात तळून घ्या.  
  • बटरमध्ये अख्खा गरम मसाला फोडणीत टाकून त्यावर बारीक चिरलेला कांदा टाका. 
  • कांदा सोनेरी रंगावर परतल्यावर त्यात आले लसूण पेस्ट, हळद, तिखट, धने जिरं पावडर, हिरवी मिरची, दही टाकून घट्ट होईपर्यंत परतून घ्या. 
  • त्यात टोमॅटोची पेस्ट मीठ टाकून तेल सुटेपर्यंत परता. नंतर त्यात पनीर आणि गरम मसाला पावडर, कसुरी मेथी आणि क्रीम टाकून मिक्स करा.
  • वरून आल्याचे बारीक काप आणि कोथिंबीर टाकून सजवा आणि गरमागरम नानसोबत सर्व्ह करा.

Edited By - Prashant Patil