
Makar Sankranti 2023 : मकरसंक्रांत स्पेशल तिळाचा पौष्टिक भात कसा करायचा?
मकरसंक्रात आली की तिळगुळ बनवण्याची लगबग सुरू होते. हवेतल्या गारठ्याचा, थंडीचा बंदोबस्त म्हणून शरीराला उष्मांक मिळवून देण्यासाठी तिळगुळ एकदम हुक्मी काम करतो. मात्र, तिळाच्या लाडवांच्या पलीकडेही तीळ नानाविध प्रकारांमध्ये कधी सरमिसळ करून, तर कधी स्वतंत्रपणे वापरला जातो. त्यामुळे तिळाचे लाडू, गुळतीळपोळीच्या पलीकडेही तिळाच्या भाताची चव वेगळीच आहे. आजच्या लेखात आपण मकरसंक्रांत स्पेशल तिळाचा पौष्टिक भात कसा करतात याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.
हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात ओव्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?
साहित्य:
दिड कप शिजलेला भात (मोकळा)
दोन चमचे तीळ
एक चमचा उडीद डाळ
दोन सुक्या लाल मिरच्या
तेल
मोहोरी
हिंग
कढीपत्ता
मुठभर शेंगदाणे
चवीपुरते मीठ
हेही वाचा: Makar Sankrant 2023: मकरसंक्रांत स्पेशल तीळ पापडी कशी तयार करायची?
कृती:
तीळ भाजून घ्यावे. उडीद डाळ लालसर रंग येईस्तोवर कोरडी भाजावी. मिक्सरमध्ये आधी उडीद डाळ आणि मिरची बारीक करून घ्यावी. ती एका वाटीत काढावी. नंतर तिळाची बारीक पूड करावी. कढईत तेल गरम करून आच बारीक करावी. त्यात शेंगदाणे खमंग तळून घ्यावे. त्यात मोहोरी, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करावी. भात आणि मीठ घालून परतावे. नंतर तिळाची आणि उडीद डाळीची पूड घालावी. मिक्स करावे. झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ काढावी. हा भात गरमच खावा. खाताना तूप घालून खाल्ल्यास अधिक चविष्ट लागतो.