
Onion Paratha Recipe : वाढत्या उन्हापासून वाचायचं आहे? ट्राय करा आजीच्या बटव्यातला हा पदार्थ!
Masala Onion Paratha Recipe : अजून फेब्रुवारी संपलाही नाही तर उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. अशात आपला आहार बदलण्याची वेळ आली आहे, पण मग नक्की खावं हा प्रश्न असेलच ना? आजीच्या बटव्याला हा प्रश्न विचारुन बघा... उत्तर येईल, उन्हापासून वाचण्यासाठी कांदा खूप गरजेचा आहे. मग चला याच कांद्यापासून एक भन्नाट रेसिपी बनवूयात..
अशी एक भन्नाट रेसिपी म्हणजे मसाला कांदा पराठा. मसाला कांदा पराठ्याची चव खूप हटके लागते. चविष्ट मसाला कांदा पराठा हेवी नाश्त्या म्हणून एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही हा पराठा मुलांच्या डब्यातही देता येऊ शकतो. याची रेसिपी बनवायला खूप सोपी आणि प्रत्येकाला आवडणारी आहे.
साहित्य :
- गव्हाचे पीठ - १ कप
- बेसन - १/२ कप
- बारीक चिरलेला कांदा - ३/४ कप
- हिरवी मिरची - १
- कोथिंबीर - १ टीस्पून
- जिरे - १/२ टीस्पून
- लाल तिखट - १/२ टीस्पून
- हळद - १/४ टीस्पून
- कांदा-लसूण मसाला - १/४ टीस्पून
- देशी तूप - आवश्यकतेनुसार
- मीठ - चवीनुसार
कृती :
- एक कांदा घ्या आणि त्याची साल काढून त्याचे बारीक तुकडे करा.
- यानंतर हिरव्या मिरच्या आणि हिरवी कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावी.
- आता एक मोठा मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यात गव्हाचे पीठ आणि बेसन टाका आणि दोन्ही चांगले मिक्स करा. यानंतर जिरे, हळद, लाल तिखट घालून मिक्स करा. आता या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा घालून मिक्स करा.
- कांदे घातल्यानंतर मिश्रणात २ चमचे तेल टाका आणि त्यात कांदा-लसूण मसाला किंवा गरम मसाला घालून चांगले मिक्स करा.
- आता थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. यानंतर, पीठ सेट होण्यासाठी १० मिनिटे झाकून ठेवा. ठरलेल्या वेळेनंतर पीठ घेऊन त्याचे गोळे बनवा.
- आता तवा मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यावर त्यात थोडं तूप टाकून सगळीकडे पसरवा.
- आता कणकेचा गोळा घेऊन गोल लाटून घ्या आणि थोडा वेळ भाजून घ्या.
- नंतर पराठा पलटी करून वर थोडं तूप लावून भाजून घ्या. रोटी दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
- यानंतर एका प्लेटमध्ये पराठा काढा. तुम्हाला हवे असल्यास तूप न लावताही पराठा भाजता येतो. हा पराठा लोणचं किंवा चटणीसोबत सर्व्ह करता येतो.