हेल्दी रेसिपी : हादग्याची खिरापत - यल्लापे!

 शिल्पा परांडेकर 
Tuesday, 13 October 2020

आपल्या लोकसंस्कृतीतील मानवी मनाचे भावविश्व उलगडणारी; नातीगोती, आचारविचार, खाद्यसंस्कृती परस्परांपर्यंत पोचवणारी; कृषीसंस्कृतीविषयी, स्त्रियांविषयी आदरभाव व्यक्त करणारी एक अनोखी परंपरा.

हादगा, भोंडला किंवा भुलाबाई ही आपल्या लोकसंस्कृतीतील मानवी मनाचे भावविश्व उलगडणारी; नातीगोती, आचारविचार, खाद्यसंस्कृती परस्परांपर्यंत पोचवणारी; कृषीसंस्कृतीविषयी, स्त्रियांविषयी आदरभाव व्यक्त करणारी एक अनोखी परंपरा. एकाच प्रथेतून किंवा परंपरेतून अनेक गोष्टींविषयी कृतज्ञता व्यक्त करणे किंवा अनेक गोष्टींची महती पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याची ही आपल्या संस्कृतीतील अद्भुत गुंफण मला नेहमीच भावते. हादग्यासारख्या लोकपरंपरेत श्रमपरिहार, विरंगुळा, करमणूक, संघटनकौशल्य, एकात्मता, आदरभाव अशा अनेक बाबींचा नकळत विचार केला गेला आहे. त्यामुळे आपल्या आजी-पणजीला आठवून पाहा, त्यांच्या कामात ही गुणवैशिष्ट्ये नक्कीच आढळतील. कदाचित त्यांनी ती अशाच परंपरांतून आत्मसात केली असावीत. 

हादग्याच्या गाण्यांसोबत सर्व महिलावर्गाची आवडती आठवण असेल ती म्हणजे ‘खिरापतीची’, हे नक्की. ‘ओळखा पाहू आज काय खिरापत?’ असे खिरापत आणलेल्या मैत्रिणीने सर्व मैत्रिणींसमोर डबा वाजवत विचारायचे आणि बाकीच्या मैत्रिणींनी ते ओळखण्याचा प्रयत्न करायचा. ही एक वेगळीच गंमत! 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माझी खिरापत नेहमी आजीच बनवून द्यायची. तिचे म्हणणे असायचे की, खिरापत अशी असली पाहिजे की ती पटकन ओळखता यायला नको. त्यामुळे माझी आजी तिच्या पोतडीतून काहीतरी खासमखास पदार्थ शोधून काढणार. तिच्यामुळेच माझ्या खिरापतीच्या डब्यात दरवर्षी काहीतरी नवीन, भन्नाट असायचे. मला आनंद मिळावा म्हणून मोठ्या कष्टाने आणि निगुतीने ती हे करायची. या एका छोट्या कृतीतून आजीने माझ्यापर्यंत कित्येक गोष्टी पोचवल्या! आपल्या आजीला नक्की माहीत होते, अशा छोट्या-छोट्या पैलूंतूनच आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोचणार आहे, नाही का? 

बिबजा आजी. माझ्या आजीप्रमाणेच या मालवणी आजींनीही त्यांच्या पोतडीतून अनेक खासमखास रेसिपी त्यांच्या ‘मालवणी अंदाजात’ मला सांगितल्या होत्या. त्यातीलच ही आजची रेसिपी. नाष्ट्यासाठी उत्तम. पौष्टिक, चविष्ट आणि पोटभरू. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(आणि हो, माझ्या खिरापतीच्या डब्यात कधीकधी ‘आप्पे’ही असायचे हे आता वेगळे सांगायला नको..!) 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेसिपी 
साहित्य – आंबोळीचा तांदूळ – २ वाटी, उडीद डाळ, हरभरा डाळ – प्रत्येकी अर्धा वाटी, गूळ चवीनुसार, किंचित हळद व मीठ, वेलची-जायफळ पूड, ड्रायफ्रुट व खोबऱ्याचा किस (ऐच्छिक) 

कृती – 
१. तांदूळ, डाळी सकाळी भिजवून रात्री वाटून आंबवण्यासाठी ठेवून देणे. 
२. दुसऱ्या दिवशी सकाळी पिठात उर्वरित साहित्य घालून एकत्रित करणे. 
३. आप्पे पात्रात यल्लाप्पे घालून दोन्ही बाजूंनी भाजून घेणे. 
(टीप ः नुसतेच किंवा नारळाच्या गोड दुधासोबत हे यल्लापे छान लागतात.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shilpa parandekar article Healthy recipe about aape