हेल्दी रेसिपी  : उकडपेंडी चवदार आणि पौष्टिकही

शिल्पा परांडेकर
Tuesday, 21 January 2020

आज आपण चाखणार आहोत विदर्भातील नाष्ट्याचा एक पौष्टिक पदार्थ– ‘उकडपेंडी’

नाश्ता राजासारखा घ्यावा, म्हणजे तो पौष्टिक आणि भरपेट असावा, दुपारचे जेवण मंत्र्यासारखे म्हणजे परिपूर्ण व सकस. रात्रीचे जेवण भिकाऱ्याप्रमाणे म्हणजे अल्प प्रमाणात, साधे व पचायला हलके घ्यावे. आजच्या आहारशास्त्राच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘उलट्या पिरॅमिड’प्रमाणे, म्हणजे ‘अधिक, मध्यम व कमी’ असे आहाराचे प्रमाण असावे. पण आपला पिरॅमिड नेमका ‘सुलटा’ असतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बहुतेक जण योग्य प्रमाणात व पौष्टिक नाष्टा घेत नाही किंवा अनेकदा नाष्टाच घेत नाहीत. ‘वेळ नाही, रोज तेच-तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे,’ हे आपले नाष्टा टाळण्याचे आवडीचे बहाणे. यावर दोन मिनिटांत’ पदार्थ तयार, हा आजकालचा जालीम उपाय झालाय. 

मी महाराष्ट्राच्या विविध भागांत विविध पदार्थांच्या शोधात भटकत असताना माझी विशिष्ट प्रश्नावली तयार असते. ‘आपल्याकडे पूर्वी नाष्ट्यासाठी कोणते पदार्थ होते?’ हा एक प्रश्न. बहुतांश ठिकाणी ‘शिळी भाकरी’ असे उत्तर असते. परंतु शेती, पिके, हवामान या दृष्टीने समृद्ध प्रांतात नाष्ट्याचे काही खास पदार्थ आढळतात. सुदैवाने या भागांत ते आजही आवडीने खाल्ले जातात, मात्र प्रमाण अत्यल्प आहे. त्यामागे वर नमूद केलेली कारणे आहेतच, शिवाय ‘झटपट’ पॅकेजिंग फूडचा ‘झगमगाट’, परदेशी पदार्थांचे आक्रमण हीदेखील काही महत्त्वाची कारणे. यामुळे आपल्या पौष्टिक, सकस आहाराचा वारसा नामशेष होण्याचा मार्गावर आहे, याची खंत वाटते.

आज आपण चाखणार आहोत विदर्भातील नाष्ट्याचा एक पौष्टिक पदार्थ– ‘उकडपेंडी’ (नावात उकड असली, तरी इथे आपल्याला कशाचीही उकड काढायची नाही किंवा कसली पेंडीदेखील बांधायची नाही.)

साहित्य : ज्वारीचे पीठ, कांदा, मीठ, तिखट, चिमूटभर कांदा-लसूण मसाला/काळा मसाला, शेंगदाणे, कोथिंबीर (सर्व साहित्य अंदाजे).
फोडणीचे साहित्य : तेल, हिंग, जिरे, मोहरी, कडीपत्ता.
तेलावर ज्वारीचे पीठ चांगले भाजून घ्यावे व बाजूला ठेवून द्यावे.

फोडणी करून कांदा, कडीपत्ता, शेंगदाणे घालून परतून घ्यावे.

या फोडणीत पीठ, तिखट, मसाला, मीठ घालून परतणे.

गरम पाण्याचा हबका देऊन वाफेवर शिजवून घेणे.

कोथिंबीर घालून  खायला देणे.
आवश्यक बाबी 
१. कांदा व थोडे जास्त तेल आवश्यक. 
२. पिठाच्या गाठी होता कामा नयेत. यासाठी आवश्यक वाटल्यास परतताना वरून तेलाचा वापर करावा. 
उकडपेंडी करायला सोपा आणि खायलाही मस्त, पौष्टिक आणि भरपेटही. थोडे तेल जास्त असल्याने थंडीच्या दिवसांत नक्की करून पाहा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shilpa Parandekar Ukadpendi Recipe