हेल्दी रेसिपी : ढेस्याचे सूप

शिल्पा परांडेकर
Tuesday, 25 August 2020

एक मानाची भाजी ‘ढेसे’ म्हणजे माठ. लाल व हिरवी अशा दोन प्रकारांत आढळणारी ही भाजी या सणांना करणे महत्त्वाचे मानले जात असून, ही भाजी उपवासालादेखील तितकीच आवडीने खाल्ली जाते.

आपल्याकडे भोगी, महालक्ष्मी (गौरी) जेवण, ऋषीपंचमी, पितृपक्ष अशा विविध सणांच्या प्रसंगी सोळा, पाच किंवा ऋतूतील उपलब्ध मिसळीच्या भाज्या करण्याची प्रथा आहे. त्यातीलच एक मानाची भाजी ‘ढेसे’ म्हणजे माठ. लाल व हिरवी अशा दोन प्रकारांत आढळणारी ही भाजी या सणांना करणे महत्त्वाचे मानले जात असून, ही भाजी उपवासालादेखील तितकीच आवडीने खाल्ली जाते.

माझ्या प्रवासात मी ही भाजी अनेकांच्या परड्यात उगवलेली पाहिली आहे. गावातील महिला त्यांच्या अनुभव व निरीक्षणातून या भाजीच्या रेसिपीसोबतच भाजीच्या उपयुक्ततेविषयी बरीच माहिती सांगतात. या भाजीमध्ये भाजीच्या देठांचा वापर केला जातो. शिवाय याची मुळेही अतिशय पौष्टिक असल्याने त्यांचाही भाजीमध्ये वापर होतो.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या भाजीत ‘ब’ जीवनसत्त्व, लोह, मॅग्नेशिअम, मॅगेनीज, फॉस्फरस आणि झिंक असे उपयुक्त घटक  आढळतात. ही भाजी पचनास सुलभ असून, वजन घटविण्याबरोबरच मूळव्याध, मासिक अतिस्त्राव, कोलेस्ट्रोल कमी करणे अशा समस्यांवरदेखील लाभदायक आहे. दुग्धवर्धक असल्यामुळे बाळंतिणीसाठी ही मुळे उपयुक्त आहेत. ज्वरनाशक असून इसबसारख्या त्वचारोगांवर बाह्यउपचार म्हणून ढेस्याच्या पानांचा लेप वापरला जातो.

इतर हेल्दी रेसिपीसाठी येथे क्लिक करा

या भाजीचा आहारात पारंपरिक किंवा आजच्या या ‘ट्वीस्ट’ रेसिपीने देखील समावेश करता येईल.

पारंपरिक भाजीमध्ये कांदा, डाळ, शेंगदाणा कूट, कारळाकूट घालून नेहमीच्या भाजीप्रमाणे भाजी बनवितात. ही देठे शिजण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे देठे आधी वाफवून घेणे आवश्यक असते.

ढेस्याचे सूप
साहित्य - ढेस्याची देठे, कांदा, लसूण, आल्याचा तुकडा (ऐच्छिक), कारळा चटणी.

कृती  - देठांची साल व शिरा काढून घेणे. (शेवग्याच्या शेंगांप्रमाणे)
कांदा, लसूण, देठे क्रमाक्रमाने तेलात परतून घेणे.
पाणी व आले घालून देठे शिजवून घेणे.
थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून घेऊन गाळून घेणे.
मीठ घालून उकळून घेणे.
खातेवेळी वरून कारळा चटणी घालून सूप पिण्यास तयार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shilpa parandekar writes article about Healthy recipe soup