गतविजेता जर्मनी साखळीतच गारद, द. कोरियाचा विश्‍वकरंडकातील ऐतिहासिक विजय 

Germany out in world cup, south Korea's historic win
Germany out in world cup, south Korea's historic win

कझान : पाचव्यांदा विजेतेपद मिळवून ब्राझीलच्या पंक्तीत जाण्याचे गतविजेत्या जर्मनीचे स्वप्न बुधवारी दक्षिण कोरियाने मोडले. "फ' गटातील अखेरच्या साखळी सामन्यात कोरियाने जर्मनीचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणले. कोरियाचा विश्‍वकरंडक स्पर्धेतील आतापर्यंतचा ऐतिहासिक आणि सर्वांत सनसनाटी विजय ठरला. कोरियाने दोन्ही गोल भरपाई वेळेत केले. 

भरपाई वेळेतील दुसऱ्या मिनिटाला किम योंग ग्वोन याने गोल केला. मात्र, व्हिडियो रिव्ह्यू घेतल्यानंतरच त्याच्या गोलवर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर अंतिम क्षणापूर्वी काही सेकंद आधी सोन हेउंग मिन याने कोरियाचा दुसरा गोल नोंदवला. जर्मनीवर 1938 नंतर प्रथमच विश्‍वकरंडक स्पर्धेत साखळीतच गारद होण्याची वेळ आली. 

बाद फेरीत पोचण्यासाठी जर्मनीला दोनच्या गोलफरकाने विजय आवश्‍यक होता. मात्र, चपळ आणि वेगवान खेळ करणाऱ्या कोरियाने या वेळी आपल्या वेगाला भक्कम बचावाची जोड दिली. जर्मनीने विजयासाठी अथक प्रयत्न केले. सामन्यात गोलपोस्टच्या दिशेने तब्बल 26 शॉट्‌स मारूनही त्यांना कोरियाचा गोलरक्षक जो ह्यऑन हू याला चकवता आले नाही. 

चार वेळचे विजेते आणि चारवेळा उपविजेते अशी जर्मनीची यशस्वी वाटचाल या वेळी साखळीतच संपुष्टात आली. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मेक्‍सिकोकडून झालेला पराभव त्यांना चांगलाच महागात पडला. 


स्वीडनवरील विजयात जर्मनीचा हिरो ठरलेल्या टोनी क्रूसने उत्तरार्धात खूप प्रयत्न केले. पण, कोरियन गोलरक्षकाला टकवणे त्यालाही जमले नाही. सामन्याच्या 88व्या मिनिटापर्यंत जर्मनीचे प्रयत्न सुरू होते. पण, गोलशून्य बरोबरीची कोंडी कोरियानेच फोडली. कीन योंग ग्वान याने कॉर्नरनंतर गोलपोस्टच्या समोर आलेल्या पासवर अगदी जवळून गोल केला. अखेरच्या टप्प्यात जर्मनीचा गोलरक्षक न्यूएर हा गोलपोस्ट सोडून पुढे खेळायला येत होता. याचाच फायदा कोरियाने उठवला. खोलवर पास मिळाल्यानंतर सोन एकट्यानेच जर्मनीच्या गोलकक्षात धावून गेला आणि मोकळ्या गोलपोस्टचा वेध घेत त्याने कोरियाला जल्लोषात, तर जर्मनीला दुःखात लोटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com