रोनाल्डो चौथ्यांदा सर्वोत्तम फुटबॉलपटू

Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo

पॅरिस : फुटबॉल विश्‍वातील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या शर्यतीत या वेळी ख्रिस्तियानो रोनाल्डोने लिओनेल मेस्सीला मागे टाकून प्रतिष्ठेचा बॅलन डी ऑर हा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार चौथ्यांदा मिळवला. मेस्सीने हा मान पाच वेळा मिळवलेला आहे.


रोनाल्डोने तीन वर्षांत दोनदा आपल्या रेआल माद्रिद या क्‍लबला दोन वेळा चॅंपियन्स लीगचे विजेतेपद मिळवून दिले. त्याचबरोबर यंदाच्या युरो फुटबॉल स्पर्धेतही पोर्तुगालच्या विजेतेपदात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. फ्रान्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात दुखापतीमुळे त्याला लगेचच बाहेर जावे लागले होते.


माझे स्वप्न पुन्हा साकार झाले, अशा शब्दांत रोनाल्डोने भावना व्यक्त केली. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मला चौथ्यांदा मिळेल, असे वाटले नव्हते. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारताना अत्यानंद होत आहे. मला क्‍लबमधील सहकारी आणि राष्ट्रीय संघातील सहकाऱ्यांचे विशेष आभार मानायचे आहे, कारण त्यांच्या सहकार्यामुळेच मला हा पुरस्कार मिळाला आहे, असे रोनाल्डो म्हणाला.
हे यश वारंवार मिळत नसते, म्हणूनच मला या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. जगभरातील फुटबॉल तज्ज्ञ असलेल्या 173 पत्रकारांनी केलेल्या मतदानावरून हा पुरस्कार निवडला जातो. रोनाल्डोनंतर मेस्सी आणि त्यानंतर अँटोनी ग्रिझमन, लुईस सुवारेझ, नेमार आणि रोनाल्डोचा रेआलमधील साथीदार गॅरेथ बेल अशी क्रमवारी लागली.


2008 मध्ये मॅंचेस्टर युनायटेड क्‍लबमधून इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेत खेळताना रोनाल्डोला हा पुरस्कार पहिल्यांदा मिळाला होता. त्या वेळी मॅंचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीग आणि चॅंपियन्स लीगचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा पुरस्कार मान मिळवण्यासाठी त्याला 2013 पर्यंत वाट पाहावी लागली. त्यानंतर 2014 मध्येही त्याने हा मान मिळवला होता. 2016 च्या वर्षात रोनाल्डोने क्‍लब आणि देशाकडून खेळताना 52 सामन्यांत 48 गोल केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com