esakal | Ganesh Chaturthi 2021: अथर्वशीर्ष स्तोत्र पठन का करावे?
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesha Chaturthi 2021: अथर्वशीर्ष स्तोत्र पठन का करावे?

Ganesha Chaturthi 2021: अथर्वशीर्ष स्तोत्र पठन का करावे?

sakal_logo
By
टीम इ सकाळ

-दा. कृ. सोमण

गणपती अथर्वशीर्ष

त्वं वाड्.मयस्त्वं चिन्मय: ।

त्वंमानन्दमयस्त्वं ब्रह्ममय: ।

त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि । त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि ।

त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ॥

( अथर्वशीर्षम् )

“ तू वेदादी वाड्.मय आहेस. तू चैतन्यस्वरूप आहेस. तू आनंदमय आहेस. तू ब्रह्ममय आहेस. तू सत्, चित्, आनंदस्वरुप , अद्वितीय आहेस.तू साक्षात ब्रह्म आहेस. तू ज्ञानविज्ञानमय आहेस.” गणपती अथर्वशीर्षम् हे एक उपनिषद आहे. ‘ थर्व ‘ म्हणजे हलणारे आणि ‘ अथर्व ‘ म्हणजे न हलणारे. ‘ शीर्षम् ‘ म्हणजे मस्तक , डोके! अथर्वशीर्ष म्हणजे ‘ न हलणारे डोके ! ‘ म्हणजेच चंचल नसलेले , स्थिर बुद्धी असलेले मस्तक ! अथर्वशीर्ष स्तोत्र पठनाने मन व बुद्धी स्थिर होते अशी गणेश उपासकांची श्रद्धा आहे.

हेही वाचा: टिळकांच्या प्रेरणेतून स्थापन झालेला श्रीमंत मानाचा कसबा गणपती!

आज आपण ‘ त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ‘ याविषयाचाच सविस्तर विचार करणार आहोत. आपण श्रीगणेशाची पूजा का करतो ? तो आपणास सर्व काही मिळवून देतो म्हणून आपण श्रीगणेशाची पूजा करतो असे काहीना वाटते. पण तसे असते तर पूजा सर्वजण करतात , मग सर्वांनाच सर्व गोष्टी मिळायला पाहिजे होत्या. गणेशमंदिरातील पुजारी तर रोजच श्रीगणेशाची पूजा करीत असतो . पण तो सुखी असतो का ? खरं म्हटलं तर पूजा ही आपल्यात चांगला बदल व्हावा, आपले मनोधैर्य वाढावे, आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी करावयाची असते. पूजा ही नेहमी आदर्शाची करावयाची असते. ज्याची आपण पूजा करतो त्याच्यामधील गूण आपल्या अंगी यावेत यासाठी पूजा करावयाची असते. गणपती हा चौदा विद्या , चौसष्ट कलांचा अधिपती आहे. तो सुखकर्ता आहे, दु:खहर्ता आहे. तो गणांचा नायक आहे. त्याच्यापाशी उत्कृष्ट नेतृत्त्वगुण आहेत. तो नटेश्वर आहे. तो लढवय्या आहे. तो कल्पक आहे. व्यवस्थापन शास्त्राचे कौशल्य त्याच्यापाशी आहे, तो मातृभक्त आहे. तो कृपाळू आहे. गणपतीचे हे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी गणेशपूजा करावयाची असते.

तसेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ‘ पार्थिव ‘ गणेश पूजन करावयास सांगितले आहे. पार्थिव म्हणजे मातीची ! म्हणून गणेश मूर्ती ही मातीचीच हवी. ही पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद महिन्यांत शेतात धान्य तयार होत असते, कृतज्ञता म्हणून पृथ्वीची म्हणजे मातीच्या मूर्तीची पूजा आपण करायची असते. त्यानंतर भाद्रपद कृष्ण पक्षात पितरांचे स्मरण करावयाचे असते. आश्विन महिन्यात शेतात तयार झालेले नवीन धान्य घरात येते म्हणून नवरात्रात दुर्गेची म्हणजे ‘ निर्मिती शक्तीची ‘ पूजा करावयाची असते. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने सणांची रचना याप्रमाणे करण्यात आली आहे. हे प्रथम समजून घेतले पाहिजे.

शरीराचे आरोग्य आहारावर अवलंबून असते. आहार ऋतूप्रमाणे घेतला तर शरीराचे आरोग्य चांगले राहते. परंतु सण हे चंद्रावर अवलंबून असतात. ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. ठराविक सण ठराविक ऋतूमध्येच यावेत यासाठी आपल्याकडील पंचांग चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेले असते.

हेही वाचा: टिळकांच्या प्रेरणेतून स्थापन झालेला श्रीमंत मानाचा कसबा गणपती!

ज्ञान म्हणजे काय ?

गणपती अथर्वशीर्षामध्ये गणेशाला तू ‘ ज्ञान’ आहेस, तू ‘ विज्ञान ‘ आहेस असे म्हटले आहे. प्रथम आपण ‘ ज्ञान ‘ म्हणजे काय ते पाहूया. ‘ ज्ञा ‘ म्हणजे जाणणे ! या धातूपासून ज्ञान हा शब्द तयार झाला आहे. ‘ ज्ञायते अनेन इति ज्ञानम् ‘ — ज्याच्या योगाने जाणले जाते ते ‘ ज्ञान ‘ होय. जाणण्याचा संबंध जाणिवेशी असतो. सजीव प्राण्यामध्ये जाणीव असते म्हणून त्याला जाणतां येते. निर्जीव वस्तूंना जाणीव नसल्याने त्याना जाणतां येत नाही. मात्र सर्वच प्राण्यांची जाणीव सारखीच नसते. माणसांमध्ये जाणीव अधिक सूक्ष्म व व्यापक असते. माणसास अनेक प्रकारचे अनुभव येत असतात.अनुभवातून वस्तूची जाणीव होते.अनुभव घेणाराला ज्ञाता व ज्ञानाच्या विषयाला ज्ञेय म्हणतात. एखादा पदार्थ , त्याचे गुण , क्रिया, मनाची वृत्ती, काल्पनिक वस्तू यापैकी काहीही ज्ञेय असू शकते. ज्ञान हे बुद्धिप्रधान असते. ज्ञान हे (१) शब्दप्रमाण (२) प्रत्यक्षप्रमाण आणि (३) अनुमान प्रमाण असते. शब्दप्रमाण म्हणजे शब्दांद्वारे , प्रत्यक्षप्रमाण म्हणजे आपल्या इंद्रियांद्वारे आणि अनुमानप्रमाण म्हणजे आपल्या बुद्धीचा उपयोग करून ज्ञान प्राप्त होते. आत्म्याविषयी ज्ञान मिळते त्याला आत्मज्ञान किंवा अध्यात्म म्हणतात. ब्रह्माविषयी ज्ञान त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात

हेही वाचा: टिळकांच्या प्रेरणेतून स्थापन झालेला श्रीमंत मानाचा कसबा गणपती!

विज्ञानमयोऽसि

अथर्वशीर्षामध्ये श्रीगणेशाला तू ‘ विज्ञान ‘ आहेस . असे म्हटले आहे. म्हणून आपण प्रथम विज्ञान शब्दाचा अर्थ पाहूया. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, शास्त्रीय ज्ञान, तत्त्वज्ञान , अपरोक्ष ज्ञान , ब्रह्मज्ञान. विज्ञान या शब्दाचे असे अनेक अर्थ होतात. सामान्यपणे जड पदार्थ आणि नैसर्गिक घटना यांचे निरीक्षण करून व प्रयोग करून आपल्या इंद्रियाच्या साहाय्याने जे ज्ञान प्राप्त होते , ते क्रमबद्ध व नियमबद्ध केले असता जे शास्त्र निर्माण होते त्याला

‘ विज्ञान ‘ म्हणतात. सूक्ष्म निरीक्षण, वर्गीकरण, नियम व त्यांच्या आधारे अनुमान करणे या विज्ञानपद्धतीच्या चार पायर्या आहेत. जगातील वस्तूच्या वागण्याचे जे विविध नियम आहेत, त्यांत कार्यकारणभाव हा नियम सर्वात व्यापकपणे आढळतो. म्हणून विज्ञानाचा मुख्यभर वस्तूंमधील कार्यकारणसंबंध निश्चित करण्याकडे असतो. विज्ञानाच्या दृष्टीने जगातील सर्व घटना अत्यंत नियमबद्ध आहेत. निसर्गात गूढ, चमत्कारमय असे काहीही नाही. ज्या घटना गूढ वाटतात त्यांचा कार्यकारणभाव कळल्यानंतर त्या गूढ वाटत नाहीत. या निसर्गसृष्टीमधील नियम गणेशच आहे. अथर्वशीर्षामध्ये ज्ञान आणि विज्ञान शब्दांचा किती सुंदर उपयोग केलेला आहे हे दिसून येते.

सध्याचे जग तर विज्ञानाचेच जग आहे. प्रत्येकांने विज्ञान समजून घेण्याची गरज आहे. या जगात चमत्कार असे काहीही नाही. प्रत्येकाने जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे महत्वाचे आहे. आवश्यक आहे. मनात अंधश्रद्धांना स्थान देताकामा नये.

हेही वाचा: व्यापारी-पोलीस वाद, 'लालबाग राजा'च्या प्राणप्रतिष्ठापना पूजेस विलंब

काळाची गरज

अथर्वशीर्षामधील ‘ त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ‘ हे शब्द आपणास या काळात खूप महत्त्वाचा संदेश देत आहेत. ज्ञान- विज्ञानाखेरीज या काळात कोणत्याही देशाची प्रगती होणार नाही. निसर्गाचे रक्षण करा. अंधश्रद्धेने जगू नका. आपण निसर्गाला जपले तरच निसर्ग आपणास जपणार आहे. श्रीगणेश हा नवसाला कधीच पावत नाही. त्यामुळे ‘ नवसाला पावणारा गणपती ‘ अशा जाहिरातीना बळी पडू नका. गणेशोत्सव साजरा करतांना जलप्रदूषण , ध्वनिप्रदूषण आणि वायूप्रदूषण होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेऊया. गणेशमूर्ती मातीचीच आणूया. सजावट करतांना प्लॅस्टिक-थर्मोकोलचा वापर टाळूया. ध्वनिवर्धकाचा वापर संयमाने करूया. आरती ओरडून न म्हणता मंद आवाजात, प्रसन्नता राखून म्हणूया. गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करूया. निर्माल्य पाण्यात न टाकतां त्याचा खत म्हणून वापर करूया. केमिकलच्या अगरबत्तीचा वापरकरणे टाळूया. गणेशोत्सव साजरा करून आपण आनंद घेऊया आणि इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करूया.

“ माणसाने माणसाशी माणसारखे वागावे “ ही आपल्या सनातन वैदिक धर्माची शिकवण आहे. यावर्षी सांगली-कोल्हापूर भागात पुराने थैमान घातले होते. त्यामध्ये अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. शेती पाण्याखाली गेली. माणसे- जनावरे मृत्युमुखी पडली. आपण सर्वांनी यावर्षी गणेशोत्सव कमीतकमी खर्चामध्ये साजरा करूया आणि बचतकरून ती रक्कम पूरग्रस्तांना संसार उभे करण्यासाठी मदत म्हणून देऊया. आपण जर असे केले तरच ती खरी गणेशपूजा ठरेल. तसेच ‘ त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि’ चा अर्थ आपण समजून घेतला असे होईल. श्रीगणेश बुद्धीदाता आहे. सर्वांना तो पर्यावरणाचे रक्षण करण्याची, जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याची आणि पूरग्रस्तांना मदत करण्याची बुद्धी देईल असा विश्वास श्रीगणेशपूजेचा प्रारंभ साडेतीन हजार वर्षांपूर्वी झाला असावा. श्रीगणेशपुराण आणि श्रीमुद्गल पुराण हे गणेशविषयक प्राचीन प्रमुख ग्रंथ आहेत. श्रीगणेशपूजेनंतर आरती म्हणण्याची पद्धत मात्र नंतर सुरू झाली. श्रीसमर्थ रामदास, श्रीगोसावीनंदन, श्रीअंकुशधारी महाराज, श्रीमाणिकदास, श्रीमुक्तेश्वर, श्रीविठ्ठल, श्रीमोरया गोसावी, श्रीमध्वमुनीश्वर, श्रीरामकृष्णबापू इत्यादीनी विविध देव-देवतांच्या आरत्यांची रचना केलेल्या आहेत.

(लेखक पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक)

loading image
go to top