esakal | Idol of Ganesha | 'श्रीं'ची मूर्ती कशी असावी?
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Idol

घरी असो अथवा चौकांत 'गणेशोत्सव कसा करावा?' मूर्ती केवढी, कशी असावी?, मुहूर्त नेमका कोणता घ्यावा? यांसारखे अनेक प्रश्‍न अनेकांना सतावतात. अशा प्रश्‍नांचे हे समाधान. 

Ganesh Chaturthi 2021 : 'श्रीं'ची मूर्ती कशी असावी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सवात "श्रीं'ची मूर्ती कशी असावी, असा प्रश्‍न अनेकजण विचारतात. 'श्री गणेश चतुर्थी' व्रत हे पार्थिव गणेश गणेश पूजनाचे व्रत आहे, असे सर्वच पंचांगांतून ठळकपणे छापलेले असते; परंतु पार्थिव गणेश म्हणजे नेमके काय? हेच अनेकांना माहिती नसते.

पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून (पंचमहाभूतांपैकी सर्वाद्य.) नदी, ओढा, सरोवर, तळे यांसारख्या जलाशयाच्या काठावरील पाऊस पडून ओली झालेली माती खणून, कणीक तिंबतो तशी मळून तिची स्वतःच्याच हाताने गणेशाची मूर्ती तयार करायची. गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, पूजा करून ती वाळून भंग पावण्यापूर्वी अर्धा दिवस, दीड दिवस किंवा पाच दिवस (गौरीबरोबर) होताच तिचे वाहत्या जलप्रवाहांत अथवा शेतांत विसर्जन करावे. निसर्गातून घेतलेले पुन्हा निसर्गाला परत करावे. ही आहे, खरी "पार्थिव गणेश पूजा!' आज मात्र हे सर्व संकेत झुगारून शाडू, प्लास्टर इतर तत्सम पदार्थांपासून आपल्याला हवे तसे गणपतीचे रूप तयार करणे आणि "हे तर आमचे धर्मप्रेम' असा उद्‌घोष करणे, ही शुद्ध फसवणूक आहे. इतरांची आणि स्वतःचाही. 

हेही वाचा: श्रींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पूजनाचे साहित्य

मूर्ती कशी हवी? 
ज्यांना 'धर्म' म्हणून हे व्रत, उत्सव करायचा असेल, त्यांनी माती मळून मूर्ती करणे शक्‍य, व्यवहार्य वाटत नसेल, तर बाजारात मिळणाऱ्या मूर्तीची 'अथर्वशीर्ष' या उपासनाप्रधान उपनिषदात सांगितल्याप्रमाणे मूर्तीची नियमबद्धता तपासावी. 

एकदन्तंचतुर्हस्तं पाशमंकुश धारिणम्‌ । 
रदं च वरदं हस्तैर्‌ विभ्राणं मूषकं ध्वजम ।। 
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्‌ । 
रक्तगंधानुलिप्तांगम्‌ रक्तपुष्पैः सुपूजितम्‌ ।। 

या अथर्वशीर्षातील वचनाप्रमाणे एकदन्ती (एक दात असलेला), चार हातांचा, पाश, अंकुश ही दोन आयुधे हाती असलेला, तुटलेला दात एका हातात आणि दर्शन घेणाऱ्याला प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देणारा (हात वर करून), मूषकध्वज म्हणजे ध्वजावर उंदीर असलेला, लाल वर्णाचा (रक्तम्‌) लंबोदर, सुपासारखे मोठे कान असलेला, लाल वर्णाच्या (गडद) केशरी गंधाचा सर्वांगाला लेप असलेला, (लाल कमळासारख्या) रक्तवर्ण फुलांनी पूजिलेल्या श्री गणेशाचे जे याच रूपात नित्य यान करतात, त्यांना गणपती प्रसन्न होऊन पावतो.

लाभप्रद, कल्याणकारक मंगलमूर्ती ठरतो. तयार मूर्ती विकत घेतानाच हे वर्णन लागू पडेल. अशीच गणेशाची मूर्ती खरेदी करावी. गणेशोत्सवात गडद लाल, केशी, जांभळ्या, पिवळट रंगाला प्राधान्य द्यावे. रक्तवर्ण, रक्तगंध (रक्तचंदन), रक्तपुष्प या शब्दांतील 'रक्त' शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, हे विसरू नये. 

(वसंत गाडगीळ यांचा संबंधित लेख सप्टेंबर २०१९ मध्ये 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाला होता. गणेशोत्सवानिमित्त हा लेख पुन्हा प्रकाशित करत आहोत)

loading image
go to top