गणेशोत्सव2019 : गणेशाला "गज' मुखच का?

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते 
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

भगवान श्री गणेशाचे मस्तक हे गज मस्तक आहे. गणेशास दुसरे नाव गजानन, गजवदन असेही आहे. आता प्रश्‍न असा पडतो, की गणेशाला "गजा'चे म्हणजे हत्तीचेच मस्तक का आहे ? याविषयी ब्रह्मवैवर्तपुराणात जी कथा आलेली आहे, ती आपल्या सर्वांना माहीतच आहे. पार्वतीला जे बालक जन्माला आले, त्याचे दर्शन घ्यायला सर्व देवता आल्या व त्याबरोबर शनिदेवही आले.

भगवान श्री गणेशाचे मस्तक हे गज मस्तक आहे. गणेशास दुसरे नाव गजानन, गजवदन असेही आहे. आता प्रश्‍न असा पडतो, की गणेशाला "गजा'चे म्हणजे हत्तीचेच मस्तक का आहे ? याविषयी ब्रह्मवैवर्तपुराणात जी कथा आलेली आहे, ती आपल्या सर्वांना माहीतच आहे. पार्वतीला जे बालक जन्माला आले, त्याचे दर्शन घ्यायला सर्व देवता आल्या व त्याबरोबर शनिदेवही आले. शनीची दृष्टी बालकावर पडल्यामुळे त्या बालकाचे शीर धडापासून वेगळे झाले व तेथे "गज' म्हणजे हत्तीचे शीर बसवले, असे ही कथा सांगते. 

कोणत्याही कथेचा एक वाच्यार्थ असतो व दुसरा लक्ष्यार्थ असतो. आता गज या शब्दाकडे वळूयात. "गज' हा संस्कृत शब्द आहे. यातील "ग'कार हा गर्भयातना थांबविणारा व "ज'कार हा जन्ममरणविच्छेद करणारा या अर्थाने आहे. अर्थात, "गज' शब्दाने कैवल्यमुक्ती देणारी अशी कोणती देवता असेल, तर ती भगवान गजानन ही होय. संख्याशास्त्रानुसार गज शब्दाने 8 ही संख्या व्यक्त होते. भारतीय संख्याशास्त्रात आकडे हे विशिष्ट शब्दाने व्यक्त करण्याची पद्धत पूर्वीपासून प्रचलित आहे. उदा. 4 आकडा हा वेद या शब्दाने, 3 हा आकडा अग्नी या शब्दाने व्यक्त होतो. त्याचप्रमाणे गज शब्दाने 8 ही संख्या व्यक्त होते. आठही दिशांना जो संपूर्णपणे व्याप्त आहे असा तो गजानन होय. त्याचप्रमाणे स्वरशास्त्रानुसार "गज' शब्दातील "ग'कार हा 3 संख्या दर्शवितो व "ज'कार हाही 3 संख्या दर्शवितो. 

"गज' शब्द एकत्र लिहिल्यास 33 ही संख्या येते. 33 कोटी अर्थात 33 प्रकारच्या देवतांचा अधिपती तो गजानन होय. या 33 देवता कोणत्या ते शतपथ ब्राह्मणात सांगितलेले आहे. 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र व 2 अश्‍विनीकुमार मिळून 33 देवता होतात. थोडक्‍यात, गणपतीला "गज' मस्तकच का? तर "गज' शब्दाने इतके गूढ अर्थ अभिव्यक्त होतात, ते इथे घेणे अभिप्रेत आहे. 
- गौरव देशपांडे, पंचांगकर्ते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Festival