#बाप्पामोरया : गणेश उपासनेचे महत्त्व

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

गणेशाची उपासना अनादीकालापासून भारत देशात आसेतुहिमाचल सर्वत्र होत आहे. ‘कलौ चण्डी विनायकौ’ असे सांगितलेले आहे. अर्थात, कलियुगात दुर्गा व गणपतीची उपासना शीघ्र फलप्रद होते, असे शास्त्र सांगते.

गणेशाची उपासना अनादीकालापासून भारत देशात आसेतुहिमाचल सर्वत्र होत आहे. ‘कलौ चण्डी विनायकौ’ असे सांगितलेले आहे. अर्थात, कलियुगात दुर्गा व गणपतीची उपासना शीघ्र फलप्रद होते, असे शास्त्र सांगते. तसेच, आद्य शंकराचार्यांनी ज्या पंचायतन पूजेचा प्रसार केला, त्या पंचायतन पूजेमध्ये गणेशपूजन सांगितलेले आहे. पंचायतन पूजेमधील पाच देवता अर्थात गणपती, विष्णू, शंकर, सूर्य व दुर्गा या पंचमहाभूतांची प्रतीके आहेत. सृष्टीमधील व पूजन करणाऱ्या शरीरामधील पंचमहाभूतांचे संतुलन कायम राहावे, यासाठी या पाच देवतांची उपासना सांगितलेली आहे. कपिलतंत्रात ‘आकाशस्याधिपो विष्णुरग्नेश्‍चैव महेश्‍वरी। वायोः सूर्य क्षितेरशो जीवनस्य गणाधिपः।।’ असे सांगितलेले आहे. अर्थात, आकाश तत्त्वाचा अधिपती विष्णू, अग्नितत्त्वाची दुर्गा, वायुतत्त्वाचा सूर्य, पृथ्वीतत्त्वाची देवता शंकर व जलतत्त्वाचा अधिपती गणपती सांगितलेला आहे. तसेच, गणेश उपासनेने विघ्नाश होतो व बुद्धिप्राप्ती होते, असे याज्ञवल्क्‍य स्मृतीत सांगितलेले आहे. गणेश उपासनेने विघ्न निवारण होते म्हणजे नक्की काय होते? तर सारासार विवेकबुद्धी, अचूक निर्णय घेण्याची क्षमता या गोष्टी गणेश उपासकामध्ये वाढीस लागतात. त्यामुळे एकदा अचूक निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त झाली की संकटे कशी येतील?
- गौरव देशपांडे, पंचांगकर्ते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Importance