esakal | आली गौराई...निरोगी आरोग्याच्या पावली
sakal

बोलून बातमी शोधा

गौरीचे आगमण

आली गौराई...निरोगी आरोग्याच्या पावली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आपल्या लाडक्या ‘बाप्पा’च्या आगमनानंतर येणाऱ्या गौराईंचे घरोघरी मोठ्या जल्लोषात आणि मंगलमय वातावरणात रविवारी आगमन झाले. ‘आली गौराई, सोन्याच्या पावली, ‘आली गौराई आरोग्याच्या पावली’ असे म्हणत घरोघरी सुवासिनींनी गौरीचे आगमन केले. सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या सावटात घरोघरी मोजक्याच महिलांच्या उपस्थितीत गौरी परंपरागत पद्धतीने गौराईंचे जोरदार स्वागत झाले.

कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी एकूणच गणेशोत्सव साजरा करण्यावर कडक निर्बंध होते. यंदा मात्र नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे गौरीच्या आगमनासाठी महिला वर्गाने जय्यत तयारी केल्याचे दिसून आले. यानिमित्ताने आकर्षक फराळाचे पदार्थ, विविध प्रकारची फुले, पत्री, फळे, विद्युत माळा, रेडिमेड रांगोळ्या असे आकर्षक सजावटीचे साहित्य खरेदीसाठी महिलांनी बाजारपेठेत सकाळी गर्दी केल्याचे दिसून आले.

हेही वाचा: ‘हीलींग हँड्स हर्ब्स’ला आयुर्वेदिक उत्पादनांचे भारतीय पेटंट

पुण्यात बाहेरगावहून आलेले नागरिक दरवर्षी गौरी आगमनाच्या निमित्ताने आपल्या मूळ गावी जातात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबांनी सलग दुसऱ्यावर्षी यानिमित्ताने गावी जाणे टाळल्याचे चित्र आहे. मूळच्या औरंगाबाद येथील असणाऱ्या रोहिणी चोरमले गेल्या काही वर्षांपासून पुणेस्थित आहेत. दरवर्षी त्या गौरी आगमनानिमित्त खासकरून एकत्रित आनंदोत्सव साजरा करण्यासाठी औरंगाबादला जातात. ‘‘कोरोनाच्या भितीपोटी गेल्यावर्षी आणि यावर्षी गावाला गौरी-गणपतीनिमित्ताने जाणे टाळले. त्याऐवजी घराजवळ असणाऱ्या शेजाऱ्यांकडे गौरीच्या दर्शनासाठी आणि परंपरेनुसार गौरी पूजनासाठी जाणार आहे,’’ असे रोहिणी यांनी आवर्जून सांगितले.

पूजा सोमवंशी म्हणाल्या,‘‘दरवर्षी गौरीचे आगमन अगदी उत्साहात होत असते. परंतु यंदा कोरोनामुळे कुटुंबातील सदस्यांना गमावल्याचे दु:ख आहे. त्यामुळे परंपरेनुसार गौरीचे आगमन केले असून सर्वत्र असणारे कोरोनाचे संकट लवकरच दूर व्हावे, अशी प्रार्थना करत आहोत.’’ तर धनश्री हेंद्रे म्हणाल्या,‘‘यावर्षी गौरीला आम्ही अन्नपूर्णा देवीच्या रूपात विराजमान केले आहे. ‘जगावर कोणतेही संकट आले तरी सर्वांना भरल्या पोटी लढण्याची ताकद दे’ अशी प्रार्थना केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव यंदाही कायम असल्याने गौरी आगमनानिमित्त नातेवाईक, मित्र-मंडळी घरी येऊ शकले नाहीत. त्यामुळे दरवर्षी मोठ्या उत्साहात येणाऱ्या सर्व नातेवाईकांसाठी सोशल मिडियाचा आधार घेत गौरी आगमनाचे दर्शन घडविले आहे.’’

loading image
go to top