esakal | गौरी गणपतीच्या सजावटीतून ऑनलाइन शिक्षणाचा संदेश
sakal

बोलून बातमी शोधा

gauri pujan

गौरी गणपतीच्या सजावटीतून ऑनलाइन शिक्षणाचा संदेश

sakal_logo
By
उमेश महाजन

महूद (सोलापूर) : कोरोना महामारीमुळे सर्वात जास्त नुकसान शैक्षणिक क्षेत्राचे झाले आहे. यामुळे अजूनही शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षणास मोठ्या प्रमाणावर मर्यादा आहेत.तरीही संकटात संधी शोधून जागरूक पालकांच्या मदतीने काही प्रमाणात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरु आहे.या ऑनलाईन शिक्षणाचा आनंद घेणारी मुले याही शिक्षणात गुंतली असून ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिकवलेल्या सजावट साहित्याच्या साह्याने महूद (ता. सांगोला) येथील विद्यार्थ्याने गौरी गणपतीची सजावट केली आहे. गौरी गणपतीच्या सजावटीतून त्याने ऑनलाइन शिक्षणाचा संदेश दिला आहे.

महूद अंतर्गत असलेल्या चव्हाणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या रुद्र दिगंबर चव्हाण याने शिक्षण विभाग पंचायत समिती माळशिरस यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गौरी गणपती आरास स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.त्याने आपल्या घरातील गौरी गणपती समोर ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारी सजावट केली आहे.शिक्षण विभाग पंचायत समिती माळशिरस यांच्या वतीने नियमितपणे ऑनलाईन अध्यापन सुरू आहे.या ऑनलाईन वर्गास रुद्र चव्हाण नियमित हजेरी लावत असून पालकांच्या सहकार्याने त्याचा अभ्यास सुरू आहे.या ऑनलाईन तासिका मध्ये अभ्यासाबरोबरच कला,कार्यानुभव,पारंपारिक सण समारंभ यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.या प्रत्येक उपक्रमात सहभागी होऊन,त्याचा आनंद घेत रुद्र चव्हाण शिकवलेले साहित्य स्वतः बनवत आहे.त्याने पतंग,चिखलाचा गणपती,बैलगाडी,राखी अशा प्रकारचे विविध साहित्य त्याने बनवले आहे.चित्रे,कोलाज चित्रे त्याने रेखाटली आहेत.या सर्वांचा उपयोग करत त्याने सुंदर अशी गौरी गणपतीची आरास केली होती. ऑनलाईन शिक्षणामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिकांची नावे गौरींना तर शिक्षकांची नावे गणपतीला त्याने दिली आहेत.ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा मजकूर लिहून त्यालाही सजावट केली आहे.मोबाईल च्या समोर बसून अभ्यास करणारे विद्यार्थी असा देखावा ही त्याने साकारला आहे.त्याच्या या उत्कृष्ट सजावटील शिक्षण विभाग पंचायत समिती माळशिरस यांनी प्रथम क्रमांक देऊन गौरविले आहे.रुद्र च्या या यशाबद्दल चव्हाणवाडी शाळेच्या वतीने संजय चव्हाण व मुख्याध्यापक तानाजी खबाले यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी दिगंबर चव्हाण,धोंडीराम चव्हाण, विठ्ठल तांबवे आदी उपस्थित होते.

चौकट-माळशिरसची आनंददायी शाळा-

कोरोना महामारी मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभाग पंचायत समिती माळशिरस यांच्या वतीने विविध उपक्रम नेहमीच अतिशय प्रभावीपणे राबविले जात आहेत. या उपक्रमांचे आनंददायी शाळा असे नामकरण करण्यात आले आहे.या आनंददायी शाळेच्या माध्यमातून सर्वच वर्गांसाठी नियमित अध्यापन सुरू आहे.याचा लाभ माळशिरस तालुक्यासह जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी घेत आहेत.अभ्यासाबरोबरच कला, कार्यानुभव,सण-समारंभ यासाठी ही उपक्रम राबविले जातात.स्पर्धा परीक्षांबाबत ही वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे.ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पारावरची शाळा हा उपक्रम तसेच पीडीएफ स्वरूपात अभ्यास दिला जात आहे.

2) कोरोनामुळे माझ्या घराच्या जवळच असलेल्या शाळेत ही मला जाता येत नाही.ऑनलाइन शिक्षणामध्ये अभ्यासाबरोबर अनेक छान-छान गोष्टी शिकायला मिळत आहेत.मित्रांशिवाय या गोष्टीमध्ये मजा नाही मात्र तरीही यामध्ये आनंद वाटतो आहे. खूप चांगले मार्गदर्शन मिळत आहे.-रुद्र चव्हाण,विद्यार्थी(चव्हाणवाडी,महूद)

3) गौरीच्या व गणपतीच्या भूमिकेत शिक्षकांना दर्शवून खूप मोठी जबाबदारी आमच्यावर टाकली आहे.खरं तर आम्ही आमचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचे काम करतोय.पण आज या आपल्या आनंददायी शाळेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी व पालकांनी आम्हाला दिलेली ही उपमा आमच्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे.देवाचं स्थान तर आम्ही कोणत्याही जन्मात घेऊच शकत नाही.पण परमेश्वराने ज्या कार्यासाठी आम्हाला हे जीवन दिलंय,त्याचं सार्थक करण्याचे काम आम्ही नक्कीच करु - गिरीजा नाईकनवरे,शिक्षिका

4) माझा मुलगा रुद्र यास या आनंदाची शाळेचा खुपच लळा लागला आहे.त्याच्या मनात या शाळेने घर केले आहे.भविष्यात शाळा सुरू झाल्या तरीही अशा प्रकारच्या आनंदी शाळा सुरूच राहाव्यात.- सौ.पूजा चव्हाण,रुद्रची आई

loading image
go to top