विदर्भाचे अष्टविनायक भाग २ : एकचक्रा अन् भृशुंड गणपतीची पौराणिक कथा माहितीये का?

vidarbha ashtavinayak
vidarbha ashtavinayake sakal

नागपूर : महाराष्ट्रातील अष्टविनायक सर्वांना माहिती आहे. तसेच गणेशोत्सव म्हटलं की, मुंबई आणि कोकणात धुमधडाक्यात गणेशोत्सव (ganesh festival 2021) साजरा केला जातो. पण, राज्याच्या पूर्वेकडे असलेला निसर्गसंपन्न प्रदेश म्हणून विदर्भाची (ganesha in vidarbha) ओळख आहे. याच विदर्भात सर्वगुणसंपन्न् अशा प्रदेशात गणपतीची अनेक मंदिरे आणि मूर्ती पाहायला मिळतात. अशाच विदर्भातील अष्टविनायकाचे (vidarbha ashtavinayak) दर्शन आपण या गणेशोत्सवानिमित्त घेणार आहोत. याआधीच्या भागात आपण दोन गणपतींबद्दल माहिती घेतली होती. आज आणखी दोन गणपतींबद्दल जाणून घेऊया.

vidarbha ashtavinayak
पिंपळाच्या झाडाखालील बाप्पा ते मंदिराच्या नगरीतील गणेश, जाणून घ्या महत्व

काय आहे एकचक्रामागील कहानी? -

विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक म्हणजे सिद्धीविनायका एकचक्रा गणपती. एकचक्रा हे नाव पांडवांशी संबंधित आहे. बकासूर नावाच्या राक्षसाचा भीमाने वध केला आणि याच एकचक्रा गावातील लोकांची त्या राक्षसाच्या तावडीतून सुटका केल्याची कथा सर्वपरिचित आहे. नागपूर-वर्धा रस्त्यावर वर्ध्यापासून अंदाजे २५ कि.मी. अंतरावर केळझर किल्ला आहे. या केळझर किल्ल्यावरच हे प्राचीन गणेशाचे देवालय वसले आहे. स्थानिक लोक याला पांडवकालीन गणेशस्थान असेही म्हणतात. पांडवांनी बकासुर वधाची स्मृती म्हणून या गणपतीची स्थापना केली, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. प्राचीन काळी केळझर या गावालाच एकचक्रानगरी म्हणून ओळखले जायचे. अर्थातच या गणेशालासुद्धा एकचक्रागणेश असे म्हणतात. केळझरच्या किल्ल्यावर उंच जागेवर हे गणेश मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पुष्कर्णी आहे. ही पुष्कर्णी चौकोनी असून दगडांनी भक्कम बांधलेली आहे. विहिरीतील पाण्यापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधून काढल्या आहेत. रस्त्याच्या दक्षिणेकडे एक तलाव आहे. या तलावात बाहुबलीची काळ्या दगडाची एक मूर्ती सापडली होती. गणेश मंदिरातील गणेशमूर्ती उजव्या सोंडेची असल्यामुळे याला सिद्धिविनायक असे म्हणतात. या गणेशाच्या दर्शनाला परगावाहून अनेक लोक येतात. भाद्रपद आणि माघी चतुर्थीला इथे मोठा उत्सव असतो. मंदिराजवळच धर्मशाळा बांधलेली आहे. मात्र, आता कोरोनामुळे भाविकांना गर्दी करण्यास मनाई आहे.

भृशुंड गणपतीची सुंदर कथा -

विदर्भातील अष्टविनायांपैकी एक म्हणजे मेंढा या गावी वैनगंगेच्या तीरावर वसलेला भृशुंड गणपती. हा गणपती भंडारा जिल्ह्यातील असून या बाप्पाच्या नावाबद्दल अतिशय रंजक कथा सांगितल्या जातात. या परिसरात एक नामा कोळी लोकांची वाट अडवून लोकांना त्रास देत होता. एकदा तो गणेशतीर्थ या ठिकाणी अंघोळीला गेला असता मुद्गल ऋषी तिथून चालले होते. ते तोंडाने गजानन गजानन असे नामस्मरण करीत होते. नामा कोळ्याने त्यांना मारण्यासाठी आपली तलवार उपसली आणि तो आता वार करणार एवढय़ात ती तलवार गळून जमिनीवर पडली. नामा कोळ्याला पश्चात्ताप झाला आणि आपली पापे धुण्यासाठी काय करावे याची याचना त्याने मुदगल ऋषींकडे केली. मुदगल ऋषींनी त्याला सांगितले की ते परत येईपर्यंत नामा कोळ्याने श्री गणेशाय नम: असा जप सुरू करावा. तसेच त्यांनी एक वाळकी काठी दिली आणि तिला रोज पाणी घालायला सांगितले. जेव्हा त्या काठीला पालवी फुटेल तेव्हा मी परत येईन, असे आश्वासन मुद्गल ऋषींनी दिले. नामा आता मंत्राचा जप करू लागला. अनेक वर्ष अशीच गेली आणि मुदगल ऋषी तिथे परत आले. त्यांना त्या काठीच्या जागी एक भलामोठा वृक्ष आणि एक मुंग्यांचे वारूळ दृष्टीस पडले. वारुळातून श्री गणेशाय नम: असा आवाज येत होता. ऋषींनी ते वारूळ बाजूला करून पाहिले तर त्यांना नामा कोळी नामस्मरण करताना आढळला. तो गणेशसाधनेत इतका गणेशमय होऊन गेला होता की त्याला नाकाच्या ठिकाणी गणपतीप्रमाणे सोंड फुटली होती. मुदगल ऋषींनी त्याचे तप आणि त्याची सोंड पाहून त्याचे नामकरण भृशुंड ऋषी असे केले. या भृशुंड ऋषींनीच इथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. मुदगल ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला की आणि जो कोणी या ठिकाणी दर्शनाला येईल त्याला सर्व शक्ती प्राप्त होतील असे सांगितले. मंदिरातील गणेशाची मूर्ती आठ फूट उंचीची मोठी भव्य असून ती सव्यललितासनात बसलेली आहे. पायाशी नागाचे वेटोळे, त्यावर गणेशाचे वाहन उंदीर आणि त्यावर हा गणपती विराजमान झालेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com