esakal | विदर्भाचे अष्टविनायक - १ : पिंपळाच्या झाडाखालील बाप्पा ते मंदिराच्या नगरीतील गणेश, जाणून घ्या महत्व
sakal

बोलून बातमी शोधा

विदर्भातील अष्टविनायक

पिंपळाच्या झाडाखालील बाप्पा ते मंदिराच्या नगरीतील गणेश, जाणून घ्या महत्व

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : महाराष्ट्रातील अष्टविनायक सर्वांना माहिती आहे. तसेच गणेशोत्सव (ganesh festival 2021) म्हटलं की, मुंबई आणि कोकणात धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. पण, राज्याच्या पूर्वेकडे असलेला निसर्गसंपन्न प्रदेश म्हणून विदर्भाची ओळख आहे. याच विदर्भात सर्वगुणसंपन्न अशा प्रदेशात गणपतीची अनेक मंदिरे आणि मूर्ती पाहायला मिळतात. अशाच विदर्भातील अष्टविनायकाचे (Vidarbha Ashtvinayak) दर्शन आपण या गणेशोत्सवानिमित्त घेणार आहोत. आज आपण दोन गणपतींबद्दल जाणून घेऊया.

हेही वाचा: गणेशोत्सव देखाव्यात ऑलम्पिक विजेत्यांचे फोटो लावून अनोखी देशभक्ती

अष्टविनायकातील पहिला गणपती -

वरदविनायक म्हणजे नागपुरातील टेकडीचा गणपती. हा विदर्भातील अष्टविनायकातील पहिला गणपती आहे. पिंपळाच्या झाडाखाली गणेशाची शेंदूर लावलेली प्रतिमा याठिकाणी पाहायला मिळते. नागपूर ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे स्थान आहे. भोसले आणि इंग्रज लढाई झालेल्या सीताबर्डी परिसरात हे गणपतीचे मंदिर असून आजही अनेक भक्त येथे गर्दी करतात. स्वयंभू गणेशाची ही मूर्ती एका प्राचीन मंदिराच्या भग्न झालेल्या अवशेषांमध्ये मिळाली असे सांगितले जाते. पूर्वीच्या काळात येथे एक साधे मंदीर होते. त्यानंतर चार खांबावर एक छप्पर उभारण्यात आले. आता याठिकाणी मोठे आणि प्रेक्षणीय मंदीर उभे झाले आहे. मुख्य गणपती जवळजवळ पाच फूट रुंद आणि तीन फूट उंच असून इथे फक्त गणेशाचे तोंडच दिसते. त्यालाच डोळे आणि गंध लावून पूजा केली जाते. पहाटे साडेचारपासून याठिकाणी पूजापाठाला सुरुवात होते. त्यानंतर मंगळवार आणि शनिवारी याठिकाणी भक्तांची गर्दी असते. तसेच या गणपतीजवळ अनेक भक्त नवस बोलतात. गणपती सर्व मनोकामना पूर्ण करतो, अशी आख्यायिका अनेक भक्त सांगतात. त्यामुळे नवस फेडण्यासाठी देखील या गणपतीजवळ गर्दी असते. मंदिर परिसर अत्यंत रमणीय असून वड, पिंपळ आदी विविध वृक्षांची इथे मोठय़ा प्रमाणावर दाटी दिसते. इथून थोडय़ाच अंतरावर दुसऱ्या एका टेकडीवर फौजी गणपती मंदिर असून या दोघांना भाऊ-भाऊ असे म्हटले जाते.

दरम्यान, कोरोनामुळे या मंदिरात सध्या निर्बंध लागू आहेत. त्यामुळे अतिशय कमी लोकांमध्ये हा उत्सव साजरा केला जात आहे.

टेकडी गणपती नागपूर

टेकडी गणपती नागपूर

एकाच मंदिरात विघ्नहर्त्याची तीन रूपे -

रामटेक नगरीत अनेक मंदिरे आहेत. येथील गडमंदिर प्रसिद्ध आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पावनस्पर्शीने ही भूमिक पुनित झाल्याचे सांगितले जाते. या रामनगरीतच विदर्भातील अष्टविनायकापैकी एक प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. याठिकाणी अठराभूजा गणेशाचे अतिसुंदर रूप पाहायला मिळते. विशेष म्हणजे एकाच मंदिरात विघ्नहर्त्याच्या तीन रूपांचे दर्शन होत असल्याने भाविकांना तिन्ही लोकींचा आनंद अनुभवण्यास मिळतो.

गणेशाचे मंदीर हे रामटेकच्या मध्यभागी आहे. नागपुरातील चांदरायण कुटुंबीयांच्या पूर्वजांनी हे मंदीर बांधले असून अठराभूजा असलेले हे गणेशाचे एकमेक मंदिर असावे, असेही जाणकार सांगतात. श्री गणेशाच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग आहे. गळ्यातही नाग आहे. कंबरेला नागपट्टा आहे. अठरा सिद्धीमुळे श्री अठराभूजा गणेशास "विघ्नेश्वर"म्हणून पूजले जाते. विशेष म्हणजे या अठराभूजा गणेश मंदिरात विघ्नहर्त्याची तीन रूपे आहेत. मंदिरात मध्यभागी महागणपतीची अतिशय सुंदर, मनमोहक रूप असलेली मूर्ती आहे. त्याच्या उजव्या बाजूस रिद्धीसिद्धी तर डावीकडे श्री अठराभूजा गणेशाची मूर्ती आहे. विघ्नेशाच्या या तिन्ही रूपांच्या दर्शनाने गणेशभक्त रोमांचित होतात.

अष्टदशभूज गणपती, रामटेक

अष्टदशभूज गणपती, रामटेक

साडेचार फूट ऊंचीची ही मूर्ती असून मूर्तीच्या हातात अंकुश, पाश, त्रिशुळ, धनुष्य, परशु आदी विविध शस्रे आहेत. एका हातात मोदक, दुसर्‍या हातात मोरपंखाची लेखणी आहे. या मंदिरात वर्षभर भाविकांचा राबता असतो. प्रत्येक चतुर्थीला भाविकांची मांदियाळी असते. अद्याप या मंदिरात अग्रपूजेचा मान चांदरायण कुटुंबाकडेच आहे. रामटेकच्या प्रसिद्ध शोभायात्रेची सुरुवात श्री अठराभूजा गणेश मंदिर येथूनच पूजा, आरती नंतर होते. मात्र, कोरोनामुळे निर्बंध असल्याने यंदा भक्तांची गर्दी पाहायला मिळत नाही. कोरोनाचे सर्व नियम पाळूनच याठिकाणी भक्तांना दर्शन दिले जाते.

loading image
go to top