esakal | गणेशोत्सवातून बुद्धिवर्धन व आरोग्यरक्षण...
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवातून बुद्धिवर्धन व आरोग्यरक्षण...

-डॉ. भाग्यश्री झोपे

गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवण्यात येणारे उकडीचे मोदक, खोबऱ्याचे लाडू किंवा वड्या, नारळाच्या करंज्या, तांदळाची खीर, पातोळा यांतील घटकद्रव्ये पाहिली तर त्यात नारळ, गूळ वा साखर, तांदूळ, वेलची वगैरेंचा प्रामुख्याने समावेश असतो. यांचे गुणधर्म लक्षात घेतल्यास हे सर्व पदार्थ पचायला सोपे, भाद्रपदातील हवामानासाठी अनुकूल आणि आरोग्यासाठी अतिशय हितकारक असतात.

गणेशोत्सवातून बुद्धिवर्धन व आरोग्यरक्षण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीगणेश ही बुद्धीची देवता. भाद्रपदातील शुद्ध चतुर्थीपासून अनंतचतुर्दशीपर्यंत १० दिवस गणेशोत्सव साजरा करण्याची आपली परंपरा आहे. महाराष्ट्रात तर गणेशोत्सव खूपच उत्साहाने साजरा होतो. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक वगैरे राज्यांमध्येसुद्धा घरात गणेशस्थापना करणे, पूजा करणे, आरत्या म्हणणे, नैवेद्य दाखवणे अशा स्वरूपात हा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सव येतो वर्षा ऋतूच्या शेवटच्या भागात. या दिवसांत ऊन-पावसाचा खेळ चालू असल्याने जंतुसंसर्ग होण्यास मोठा वाव असतो. अर्थात या दिवसांत आरोग्याची काळजी घेणे खूप आवश्यक असते. गणेशपूजनासाठी लागणाऱ्या फुला-पानांचे गुणधर्म पाहिले, नैवेद्यासाठी लागणाऱ्या अन्नपदार्थांचे गुणधर्म पाहिले तर भारतीय संस्कृतीने योजलेल्या उत्सव-परंपरांमागची दूरदृष्टी लक्षात येते.

श्रीगणेशपूजनासाठी अग्रणी असतात त्या दूर्वा. ‘पित्ततृङ्‌वान्तिदाहास्र दोषश्रमकफापहा । मूर्च्छारुचिविसर्पांश्र्च भूतबाधां च नाशयेत्‌॥’ दूर्वा पित्तशामक असतात. रक्तदोष, दाह, उलट्या, तृष्णा, श्रम, मूर्च्छा, अरुची, नागीण वगैरे विकारांत उपयुक्त असतात, श्रम नाहीसे करतात, भूतबाधा म्हणजे सूक्ष्म जीवजंतूंना दूर ठेवतात. संगणकावर अनेक तास काम करणाऱ्यांना उष्णता वाढून डोकेदुखी, डोळ्यांची आग होण्याचा, कधी कधी डोळ्यांच्या नसा कोरड्या पडण्याचा त्रास होताना दिसतो. अशा वेळी खडीसाखर घालून दूर्वांचा १-२ चमचे रस घेण्याचा उपयोग होतो. गर्भधारणेनंतर गर्भरक्षण व्हावे यासाठी गर्भवतीच्या आसपास दूर्वा असाव्या असे सांगितले आहे. कीडा-मुंगी चावल्याने आग होत असल्यास त्यावर दूर्वा वाटून त्याचा लेप करण्याने बरे वाटते. लघवीला आग होत असल्यास, रंग गडद असला तर दूर्वांचा रस (२-२ चमचे) घेण्याने बरे वाटते.

श्रीगणेशांच्या पूजेसाठी लाल जास्वंदीचे फूल आवश्यक असते. ‘जपा शीता च मधुरा स्निग्धा पुष्टिप्रदा मता।’ जास्वंद शीतल, स्निग्ध आणि धातुपुष्टी करणारी असते. स्त्रियांना अंगावरून पांढरे जाते त्यावर जास्वंदीचे मूळ उगाळून त्यात थोडी खडीसाखर टाकून घेण्याने बरे वाटते. पुरुषांमध्ये लघवीवाटे धातू जात असल्यास जास्वंदींच्या मुळ्या व पांढऱ्या सावरीची साल यांचे समभाग चूर्ण एक चमचा प्रमाणात सकाळ-संध्याकाळ दुधाबरोबर घेण्याने गुण येतो. चाई लागलेल्या ठिकाणी जास्वंदीच्या फुलांचा रस चोळण्याचा उपयोग होतो. अकाली केस पांढरे होऊ नयेत यासाठी जास्वंदींच्या फुलांची पेस्ट केसांना लावून ठेवण्याचा उपयोग होतो. श्रीगणेशांना अर्पण करायच्या २१ पत्रींमध्ये ब्राह्मीचा समावेश असतो. ‘ब्राह्मी शीता कषाया च तिक्ता बुद्धिप्रदा मता।’ ब्राह्मी बुद्धी, मेधा, स्मृती या तिघांसाठी पोषक असते, याशिवाय रसायन म्हणूनही काम करते. ब्राह्मीच्या पानांचा रस दोन चमचे या प्रमाणात रोज सेवन केला तर बुद्धी-स्मृतीमध्ये सुधारणा होते, मानसिक विकार बरे होण्यास मदत होते. कुंडीमध्येसुद्धा ब्राह्मी छान वाढते. लहान मुलांना १-२ पाने नुसती खायला दिली तरी चालतात. डिप्रेशन या विकारात ब्राह्मीच्या रसाचे नस्य देण्याचा उपयोग होताना दिसतो. पिंपळाच्या पानांचाही पत्रीमध्ये समावेश असतो. दर रविवारी पिंपळाच्या पानावर गरम भात वाढून लहान मुलांना भरविण्याने त्यांचे बोलणे सुधारते, समज वाढते असा अनुभव आहे.

गणेशस्थापनेच्या दिवशी, तसेच नंतरही जितके दिवस श्रीगणेश घरी असतात, तितके दिवस त्यांना रोज नैवेद्य दाखवला जातो व प्रसाद म्हणून सेवन केला जातो. यात उकडीचे मोदक अग्रस्थानी असतात. पाठोपाठ खोबऱ्याचे लाडू किंवा वड्या, नारळाच्या करंज्या, तांदळाची खीर, पातोळी यांसारखे पदार्थ करण्याची परंपरा असते. यांतील घटकद्रव्ये पाहिली तर त्यात नारळ, गूळ वा साखर, तांदूळ, वेलची वगैरेंचा प्रामुख्याने समावेश असतो. यांचे गुणधर्म पाहिले तर लक्षात येते की हे सर्व पदार्थ पचायला सोपे, भाद्रपदातील हवामानासाठी अनुकूल आणि आरोग्यासाठी अतिशय हितकारक असतात. ओला नारळ मज्जाधातूपोषक असतो. त्यामुळे मेंदू, मेरुदंड, नसा, यांच्यासाठी उपयोगी असतो. ओल्या नारळाची करंजी किंवा उकडीचे मोदक शरीराला आवश्यक ती स्निग्धता देतात. वातामुळे सांधेदुखी, कंबरदुखी वगैरे त्रास असताना या गोष्टी हितकारक असतात.

ओला नारळ खवून त्यातून काढलेले दूध व खडीसाखर यांचे मिश्रण रोज घेण्याने मज्जाधातू, मेंदू यांचे पोषण होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीरातील उष्णता कमी होते. तांदूळ इतर धान्यांच्या तुलनेत पचायला सोपे असतात, ताकद वाढवितात, शुक्रधातूला पोषक असतात. उकडीचे मोदक, पातोळी, तांदळाची खीर हे पदार्थ लगेच ताकद वाढविणारे, तृप्ती देणारे, सांध्यांना वंगण देणारे असतात. गुळामुळे शरीरातील लोह वाढते, हिमोग्लोबिन सुधारते. मात्र ज्यांना गूळ उष्ण पडतो, त्यांना गुळाऐवजी खडीसाखर वापरता येते. खडीसाखर सुद्धा लागलीच ताकद वाढविणारी, शुक्रधातूचे पोषण करणारी, मेंदूसाठी हितकारक असते. थकवा वाटत असल्यास थोडी खडीसाखर चघळल्याने लगेच बरे वाटते. अशा प्रकारे गणेशोत्सवातील परंपरांमागचे तत्त्व समजून घेतले, विज्ञान समजून घेतले तर त्यांचे पालन करणे सोपे होईल आणि आरोग्याचा लाभ घेता येईल.

loading image
go to top