esakal | कलासक्त कर्मकठोर
sakal

बोलून बातमी शोधा

कलासक्त कर्मकठोर

कलासक्त कर्मकठोर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नानासाहेब! जनार्दन नथोबा सुंकले. हे नावसुद्धा आमच्या घरी अतीव आदराने आणि आदबीने उच्चारलं जाई. एक तर हा आमच्या घरचा जावईमाणूस, माझ्या चंदूआत्याचा नवरा. त्यातून बोलणं अगदी माफक. जेवढ्यास तेवढं. अघळपघळ बोलण्याचा स्वभाव नव्हे. हं, कधी तरी सटीसामाशी मूड असला, तर सुरेख हार्मोनियम वाजवायचे. त्यांचं मूळ गाव अलिबागजवळचं थळ. तिथले भजन संस्कार त्यांच्या आवाजात होते.

नानासाहेब उत्तम स्वयंपाकी होते. काजूचे साखर-फुटाणे, पातळ पोह्यांचा चिवडा आणि चटकदार बटाटेवडा, हे त्यांचे खास पदार्थ होते. घरात काही विशेष असलं, की ब्राह्मणी पद्धतीची शेवग्याची आमटी नानासाहेबांशिवाय कोणाच्याच हातची चालत नसे. ते वामन हरी पेठेंकडे सुवर्ण कारागीर होते. त्यांची अतिसूक्ष्म नाजूक नक्षी अतिशय लोभस असायची. नानासाहेबांचं राहणीमान अभिरुचीसंपन्न होतं. स्वतःचे, पत्नीचे आणि आपल्या मुलांचे कपडे ते चोखंदळपणे निवडत. त्यांचं बिनसलं की मात्र कोणी त्यांच्या वाऱ्याला उभं राहात नसे.

आम्ही मुलं तर तेव्हा चार हात लांबच होतो. नानासाहेब एवढेच नव्हते. जे होते, त्याचं महत्त्व मला मोठेपणी कळलेलं आहे. नानासाहेब कुशल मूर्तिकार होते. गणपतीच्या सुबक मूर्ती ते घडवीत. त्यांनी तयार केलेल्या गणपतीचे डोळे इतके बोलके, सजीव आणि पाणीदार असायचे, की आत्ता ही मूर्ती आपल्याशी बोलू लागेल, असं वाटायचं. साधारण गणेशचतुर्थीच्या आधी महिनाभर नानासाहेब कामावरून रजा घेत. माझ्या माहेरचं तेव्हाचं घर म्हणजे ठाण्यातला पारशी घरमालकाचा भलामोठा बंगला होता. आमच्या वाट्याला प्रशस्त चार खोल्या, मोठा हाॕल आणि लांब-रुंद बाल्कनी होती. तेव्हाचं ठाणं शांत होतं. नानासाहेब आणि आत्या तेव्हा विक्रोळीला बिऱ्हाड करून राहायचे. चंदूआत्या मुंबई महानगरपालिकेत शिक्षिका होती. तर, नानासाहेबांनी रजा घेतली की दोघंजण ठाण्याला आमच्या घरी यायचे. त्या दोघांसाठीच एक खोली राखीव व्हायची. गणेशचतुर्थीपर्यंत हे दाम्पत्य मुक्कामाला ठाण्यात असायचं.

शाडूची माती येऊन पडायची. साचे यायचे. आमचा हाॕल म्हणजे गणपती कारखानाच व्हायचा. माती भिजवणे, मळणे, साच्यात घालणे, सगळी कामं नानासाहेब स्वतःच करायचे. विशेष गोष्ट ही होती, ते फक्त एकवीस गणपतीच घडवीत. त्यांचे भक्त ग्राहक ठरलेले होते. त्यातला एक गणपती हत्तीवर बसलेला असायचा. तो हत्ती आणि गणपती, इतके जिवंत वाटायचे की, नजर हटणं कठीण. आम्हा पोरासोरांना सगळ्या प्रक्रियेचं मुक्त निरीक्षण करण्याची मुभा असायची. नानासाहेब तेव्हा वेगळेच दिसायचे. गणपती घडवणारी त्यांची आकृती एकाग्र असायची. त्यांची बोटं गणपतीचे सगळे अवयव बारकाईने साकार करायची. विशेषतः डोळे रेखताना तर नानासाहेब जणू या जगात नसायचेच. अतीव आत्ममग्न आनंदात भवतालची दुनिया विसरून ते गणपतीला नजर बहाल करायचे.

रात्रंदिवस तहानभूक विसरून त्यांचं काम चाले. आमचं घर या एकवीस मूर्तींनी मंदिर होऊन जाई. हरितालिकेच्या दिवशी संध्याकाळी सगळेजण आपापल्या मूर्ती वाजतगाजत घेऊन जात. फक्त आमचा घरचा गणपती तेवढा एकटा असे. हो. आमचा गणपतीही नानासाहेबांच्याच हातचा होता. सांगायचं पुढेच आहे. हरितालिकेच्या रात्री आरती झाली की, दोन्ही आत्या आणि नानासाहेब हिशेबाला बसत. माती, रंग आणि उत्पादनखर्च वजा करून उरलेली रक्कम चंदूआत्या आणि नानासाहेब ठाण्यातल्या एका अंधशाळेला मदत म्हणून नेऊन देत. त्यांची ही कृती आज आठवली, की मला अचंबित व्हायला होतं. एरवी माणूसघाणा, अबोल असा वाटणारा माणूस, आतून किती कलासक्त कर्मयोगी होता! अंधशाळेला मदत देत होता, म्हणून तर त्यांच्या मूर्तींचे डोळे इतके पाणीदार रेखले जायचे का? माझं आयुष्य अशा गुरुमूर्तींनी समृद्ध केलं, याचं केवढं ऋणछत्र आहे शिरावर!

loading image
go to top