esakal | गणेशोत्सव : शंका-समाधान
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव : शंका-समाधान

गणेशोत्सव : शंका-समाधान

sakal_logo
By
पं.नरेंद्र धारणे (धर्म अभ्यासक)

सर्व वेदवेत्त्या गुरुजनांना वंदन करून भाद्रपद शु. ४ पार्थिव सिद्धिविनायक व्रतासंबंधी काही शंकांचे धर्मशास्त्रानुसार निराकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. गणेशोत्सवात अनेक अज्ञानी मंडळी आपले श्रेष्ठत्व सिद्ध करणाऱ्याच्या नादात अत्यंत चुकीचे व अधार्मिक सल्ले लोकांना देतात. याच अनुषंगाने हा ऊहापोह...

गणेशमूर्ती आणण्याचा मुहूर्त

ज्योतिषशास्त्र व धर्मशास्त्र हे परस्परपूरक आहेत. कोणत्याही धर्मग्रंथात गणेशमूर्ती आणण्याकरिता अमुक दिवस शुभ आहे... अमुक वेळ शुभ आहे... त्याच वेळी मूर्ती घरी आणावी असे दिलेले नाही. (गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी शक्यतो मूर्ती आणावी हे व्यावहारिक बाजूस धरून योग्य आहे.). त्यामुळे गणपती मुहूर्तास आणले की नाही याचा बागुलबुवा करण्याची किंवा भीती बाळगण्याची गरज नाही. गणेशाची प्राणप्रतिष्ठापना होण्यापूर्वी जर मूर्तिभंग किंवा प्रतिमेस धक्का पोचला असेल तर वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जन करावी. प्रतिमेची मुख्य तीन अंगे असतात. उत्तमांग म्हणजे मस्तक, शिखाग्र, भाल (ललाट) नाक, कान, डोळे हात, पाय या अवयवांचा भंग झाला तर मूर्ती उत्तरपूजन करून लगेच विसर्जन करावी. मध्यमांग म्हणजे हातापायाची बोटे, कानाची पाळी, नासाग्र मुखाग्र हे भंग झाल्यास मूर्ती विसर्जन करावी. हीनांग म्हणजे नखाचे अग्र, अलंकार, माला, आयुधे, प्रभावळ, मुकुट यांना जर लहान तडा गेला तर प्रतिमा विसर्जन करू नये. त्या भागास लेप द्यावा असे ‘वैखानस समूर्तार्चाधिकरण संहिता’ ग्रंथात दिले आहे. चुकून जर कधी हा प्रसंग उद्‌भवला तर न घाबरता सर्वप्रथम काळजीपूर्वक प्रतिमा अवलोकन करावी व नंतर विसर्जन करावी की करू नये हा निर्णय घ्यावा.

हेही वाचा: बाल गणेशाने इथेच मारला सिंदुरासुरास

इकोफ्रेंडलीच्या नावाखाली कागद, गोमय, तुरटी, पुठ्ठा, सोने, चांदी, पंचधातू, फळे यापासून बनविलेले गणपती पूजन करू नये. पार्थिव याचा अर्थ मातीपासून बनविलेला होतो. चिकण माती, शाडू काही प्रांतांत लाल मातीदेखील वापरून मूर्ती गणपती बनवितात. तिचे पूजन करावे.

धर्मशास्त्राचे आयुर्वेदात महत्त्व

गणपतीस पत्री वाहिल्याने गणपतीची कृपा होते व सोबतच दूर्वा, बेल, शमी, रुई, आघाडा अशी औषधी वनस्पतींना ‘ओळखणे’ सोपे होते.
अनेक जुनी मंडळी व आयुर्वेदतज्ज्ञ या वनस्पतींवर आधारित औषधे देतात. प्रवासात संकटसमयी किंवा ट्रेकिंगला गेले असताना अचानक कोणी आजारी पडला तर तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्याने ही वनौषधी घेता येतात. याकरिता या वनस्पतींची ओळख असणे सोपे जाते. म्हणूनच मंगळागौर, हरितालिका, गणपती सर्व व्रतांत विविध पत्री या दोन्ही हेतूनेच योजल्या आहेत. महिलावर्ग पत्री काढणे व निवडणे हे काम कौशल्यपूर्वक करतात त्यामुळे आजीबाईंच्या बटव्यात औषधे असतात. ती आजोबांकडे नसतात. गणपती हा गणपतीप्रमाणेच असावा, तो विविध महापुरुषांच्या रूपात नसावा. मूषक गणेशाचे वाहन असल्याने हत्तीवर, मोरावर, बैलावर, सिंहावर बसलेला गणपती करू नये. सिंहासनावर बसलेला एकदंत, शूर्पकर्ण, गजवक्त्र (हत्तीप्रमाणे मुख असलेला), लंबोदर, चार हातांत पाश, अंकुश, रद म्हणजे (तुटलेला दात) व वरदकर (आशीर्वाद) देणारा, रक्तवास म्हणजे लाल वस्त्र धारण केलेला, लाल फुलांनी सजविलेला गणपती हवा. नाग यज्ञोपवितदेखील हवे असे काही ग्रंथांत वर्णन आहे. नाचणारा, तबला वाजविणारा किंवा अभिनेत्यांच्या रूपातला नसावा.

गणेशभक्तांचे प्रश्न आणि उत्तरे

१) गणेशस्थापना मुहूर्त व अकस्मात अडचण आल्यास काय करावे? गणेशस्थापना मुहूर्त कोणता?

गणेशस्थापना तिथीप्रधान व्रत असल्यामुळे भाद्रपद शु. चतुर्थी दिवसभरात कधीही पण शक्यतो सूर्योदयापासून मध्यान्हीपर्यंत कधीही करता येते. उशीर होणार असेल तर दुपारपर्यंत संकल्प करून दुपारी स्थापना झाली तरी चालेल. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, स्थिर राशींचा कालावधी, भद्रा (विष्टिकरण), चौघडिया मुहूर्त (अमृत, लाभ), राहुकाल इत्यादी पाहण्याची गरज नाही. घरातील महिला गर्भवती असल्यामुळे मूर्ती विसर्जन करावे की नाही? याला काहीही शास्त्रीय आधार नाही. आपल्या घरात नवीन बाळाचे आगमन होणार असते. अशा वेळेस सर्वांची मने हळवी झालेली असतात व त्या वेळी गणेशाचे बालरूप कसे विसर्जित करावे, असा भोळा समज त्यामागे आहे.

२) अशौच (सोयर व सुतक) आल्यास गणपती नंतर बसविला तर चालेल का?

पार्थिव गणपती पूजन हे व्रत आहे, कुलाचार नाही. त्याचा एखाद्या वर्षी लोप झाला तरी चालतो. पुढील वर्षी बसविता येतो. पार्थिव गणेशस्थापना करण्याचा भाद्रपद शु. चतुर्थी हा एकच दिवस असल्याने, त्या दिवशी जमले नाही किंवा चतुर्थीपूर्वी अशौच संपत नसेल, तर त्या वर्षी गणपती बसवू नये. येथे स्थापना दिवस महत्त्वाचा असल्यामुळे पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येणार नाही.

३) आता अशौचामुळे शक्य नसल्यामुळे आश्विन नवरात्रात गणपती बसविला तर चालेल का?

आश्विन मासातील नवरात्रात विनायक चतुर्थीस राहिलेले गणपती पूजन करू नये. त्याला काहीही शास्त्राधार नाही. अनेक जण गौरी पण अडचण आल्यास नवरात्रात बसवितात. ते पण शास्त्रमान्य नाही.

हेही वाचा: महाभारताचा इतिहास लाभलेले श्री क्षेत्र पद्मालय

४) यंदा कोरोनामुळे गावी दहा दिवस थांबता येणार नाही तर पाच दिवसांत विसर्जन केले तर चालेल का?

अडचणीच्या काळात दीड दिवस, तीन, पाच, सात दिवसांत विसर्जन करू शकता. गणेशस्थापना झाल्यावर अशौच आले तर लगेच दुसऱ्या व्यक्तीकडून गणेश विसर्जन करून घ्यावे. अशौच आल्यावर घरात पार्थिव गणपती ठेवू नये.

५) मागील वर्षी आम्ही बसविलेली गणेशमूर्ती भंगली होती मग आम्ही नवीन आणून बसविली. ते योग्य आहे का?
गणेशस्थापनेनंतर मूर्ती भंगली तर लगेच विसर्जन करावे, दुसरी मूर्ती आणून परत प्रतिष्ठापना करू नये. जर प्रतिष्ठापना होण्यापूर्वी मूर्ती भंगली तर मात्र नवीन आणून बसवू शकता.

६) वडील स्वर्गवासी झाले पण सव्वा महिना झाला नाही तर गणपती बसवावा का?

चौदा दिवसांनंतर उदक शांती झाल्यावर सर्व व्रते, देवकार्य करता येते. त्यामुळे आरास न करता, साध्या पद्धतीने व भक्तिभावाने गणेशस्थापना करावी.

७) आम्ही दर वर्षी गावाकडे मोठ्या भावाकडे गौरी गणपतीचा सण साजरा करतो, पण यंदा कोरोनामुळे जाणे शक्य नाही. आम्ही वेगळ्या गौरी-गणपती बसवू शकतो का?

हो. जे भाऊ वेगळे वास्तव्यास आहेत, ज्यांची चूल वेगळी आहे त्या सर्वांना वेगळे व्रत करण्याचा अधिकार असतो. प्रतिवार्षिक व महालय श्राद्धसुद्धा वेगळे करावे लागते.

८) पार्थिव गणेशमूर्तीचा आकार किती असावा?

घरी मातीची मूर्ती स्वतः तयार करून त्याची प्रतिष्ठापना व पूजन करावे व ती मूर्ती वाहत्या पाण्यात, जलाशयात विसर्जित करावी असा विधी आहे. त्यामुळे त्याबद्दलचे विशिष्ट नियम नाहीत.

९) या वर्षी सार्वजनिक गणेशस्थापना करता येत नाही मग घरामध्ये स्वतःचा एक व सार्वजनिक एक असे गणपती बसविले तर चालेल का?

गणेशस्थापना हे एक व्रत आहे. त्याला सार्वजनिक स्वरूप लोकमान्य टिळकांनी दिले. त्या वेळी स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी होती. त्यामुळे घरात फक्त वैयक्तिक व्रताचा गणपती बसवावा. दोन गणेशस्थापना एकाच घरात करू नयेत.

१०) ज्या घरात/कुटुंबात चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानंतर पण गणेश चतुर्थीपूर्वी मृत्यू झाला असेल त्यांनी गौरी-गणपती बसवू नयेत, असे शास्त्र आहे का?

पार्थिव गणेशस्थापना एक व्रत आहे. आई-वडील गेल्यावर मंगल कार्यासाठी जरी वर्षभर अशौच असले तरी कोणतेही व्रत, उपासना करण्यास काहीच हरकत नाही. फक्त रोषणाई, समारंभ नको.

११) गौरी-गणपती मृतकाच्या सुतकाच्या कालावधीत येत असल्यास सुतक संपल्यानंतर लगेच येणाऱ्या चतुर्थीला गौरी-गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पूजाअर्चा, नैवेद्य वगैरे दाखवून त्याच दिवशी विसर्जन करून टाकावे का?

पार्थिव गणेशस्थापना एक व्रत आहे. त्यामध्ये विशिष्ट दिवशीच म्हणजे गणेश चतुर्थीलाच स्थापना करावी लागते पण उस्थापणा दिवस कुळाचाराप्रमाणे वेगवेगळा असू शकतो. कुणाकडे एक दिवस, कुणाकडे पाच दिवस, तर बहुतेक ठिकाणी दहा दिवस गणपती असतात. त्यामुळे स्थापनेच्या दिवशी अशौच असल्यास त्या वर्षी व्रताचा लोप करावा, पण पुढील वर्षी हे व्रत चालू ठेवावे.

१२) गौरी-गणपती बसविल्यानंतर घरात मृत्यू घडल्यास मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारांच्या आधी गौरी-गणपतीचे विसर्जन करून टाकावे का?

हो. घरामध्ये व्यक्ती मृत झाली की लगेच दुसऱ्या कुटुंबातील कुणाकडूनही गणेश विसर्जन करून घ्यावे. गौरीची पण कुणाकडून उस्थापणा करून घ्यावी.

१३) विसर्जनाचा दिवस शनिवार आल्यास शनिवारी विसर्जन करू नये. दुसऱ्या दिवशी करावे, असा काही नियम आहे का?

असा कोणताही नियम धर्मशास्त्रात नाही. गणेशव्रताचे विधान ठरलेले असते, त्यात बदल करू नये.

१४) गौरी-गणपती बसल्यानंतर जर घरातील स्त्री बाळंतीण झाली तर काय करावे?

गणेशस्थापनेनंतर घरात सोयर आले तर दुसऱ्या कुटुंबातील कुणाकडून पुढील पूजा, आरती करून नंतर विसर्जन करावे.

१५) मूर्ती विसर्जनासाठी नेताना घराबाहेर रस्त्यात भंग पावली तर काय करावे?

स्थापना केलेल्या मूर्तीची उत्तरपूजा झाल्यावर भंगली तरी दोष नाही. विसर्जित करावी.

१६) चार भाऊ चार वेगवेगळ्या गावी राहतात तर ते चारही भाऊ आपापल्या घरी स्वतंत्रपणे गौरी-गणपती बसवू शकतात का?
गौरी-गणपती अथवा इतर कुळाचार हे आपल्या मूळ गावी मूळ घरातच साजरे केले पाहिजेत असा नियम आहे का?

ज्यांचा अग्नी वेगळा झाला आहे, व्यवहार वेगळे झाले आहेत, देवघर वेगळे आहे, त्या प्रत्येकाला वेगळे व्रत करण्याचा अधिकार असतो. मूळ गावीच सर्व व्रते करावीत असा कोणताही नियम नाही. एकत्रित का करतात, तर त्यामुळे सर्व कुटुंबातील सदस्य त्यानिमित्ताने एकत्र येऊन आनंदात साजरा करतात, एकमेकांना भेटतात, सुखदुःख वाटून घेतात. पण कोविड काळात प्रवासावर बंधने आली आहेत, प्रवास धोकादायक झाल्याने वेगळी गणेशस्थापना प्रत्येक घरी करता येतेन

हेही वाचा: अंजीरवाडी गणेशोत्सवात छगन भुजबळांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा

loading image
go to top