esakal | बारामतीत विघ्नहर्त्याचे उत्साहात स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati

बारामतीत विघ्नहर्त्याचे उत्साहात स्वागत

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : ....गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया...अशा जयघोषात आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याला आज हजारो बारामतीकरांनी वाजतगाजत घरी नेले. उत्साह व मोठ्या भक्तीभावाने आज गणरायाची घरोघरी प्राणप्रतिष्ठा केली गेली.

बारामती शहरातील रेल्वे मैदानासमोरील सेवा रस्त्यावर तसेच बारामतीती इतर ठिकाणी असलेल्या स्टॉल्सवर आज सकाळपासूनच लोकांची बाप्पांना घरी नेण्यासाठी लगबग सुरु होती. बाप्पांच्या मूर्ती खरेदीसोबतच सजावटीचे व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी आबालवृध्दांची सकाळपासूनच धावपळ सुरु होती. मोठ्यांसोबतच बाळगोपाळांचा उत्साह आज कमालीचा होता.

हेही वाचा: पुणे : पोलिसांच्या तत्परतेने झाली माय लेकरांची भेट

आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी गेल्या काही दिवसांपासूनच तयारी सुरु होती. आज तो क्षण आल्यानंतर वाजत गाजत बाप्पांचा जयघोष करत सर्वांनीच घराघरातून बाप्पाची प्रतिष्ठापना केली. पूजाअर्चा व घराघरातून आरत्यांचा आवाज दुमदुमत होता.

यंदा गणेशमूर्तींसह सजावटीच्या साहित्याच्या किंमतीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे, मात्र तरीही या भाववाढीचा बाप्पांच्या भक्तांवर त्याचा जराही परिणाम जाणवला नाही. तितक्याच उत्साह व आनंदाने घरोघरी बाप्पांची विधीपूर्वक स्थापना केली गेली. दुचाकीसह चारचाकी वाहनातून बाप्पांना लोकांनी घरी नेले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वांनीच मास्क परिधान करुनच खरेदी केली. काही ठिकाणी गर्दी उसळली होती, मात्र बाप्पांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर लोक काही काळापुरते तरी कोरोनाला विसरुन जात उत्साहाने बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत गर्क असल्याचे दिसले. आज सुट्टी असूनही शहरातील वर्दळ कमालीची वाढली होती. मास्कचा वापर सर्वांनीच केलेला दिसला, मात्र सोशल डिस्टन्सिंगचा मात्र सगळीकडे फज्जा उडाला होता. प्रशासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केलेले होते मात्र अनेक ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळाली.

loading image
go to top