तीन दिवसांच्या कलाकारांची पाठ यंदा कोण थोपटणार? सजीव देखाव्यांअभावी पूर्वभागात सन्नाटा

श्रीनिवास दुध्याल 
Saturday, 29 August 2020

टीव्हीच्या आगमनापूर्वी शहरातील गणेशोत्सवात मंडळांमध्ये पौराणिक कथांवर आधारित मूर्तींचे हालते देखावे असायचे. उत्सवाच्या शेवटच्या तीन दिवसांत देखावे पाहण्यासाठी सायंकाळी ते पहाटपर्यंत गर्दी असायची. मात्र मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यात पूर्वीप्रमाणे देखावे नसल्याने देखावे पाहणाऱ्यांच्या संख्येतही घट झाली. मात्र पूर्वभागातील घोंगडे वस्ती, भवानी पेठ परिसरातील सजीव देखावे पाहण्यासाठी गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस तुडुंब गर्दी असते. 

सोलापूर : दरवर्षी गणेशोत्सवातील शेवटच्या तीन दिवसांत शहरातील मुख्य आकर्षण असते ते पूर्वभागातील सजीव देखावे. घोंगडे वस्ती, भवानी पेठ व जोडभावी पेठ येथील 30 ते 35 मंडळांच्या व्यासपीठावर या परिसरातील चाकरमानी, विद्यार्थी, कामगार वर्ग सद्य:परिस्थितीवर आधारित घटनांवर सजीव देखावे करून प्रेक्षकांची वाहव्वा मिळवतात. मात्र या वर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर या कलाकारांमध्ये नाराजी पसरली असून, आम्हा कलाकारांना यावर्षी कोण दाद देणार, अशी खंत व्यक्त या तीन दिवसांच्या कलाकारांकडून व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा : यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवात पुरोहितांच्या "दक्षिणे'वर पाणी 

टीव्हीच्या आगमनापूर्वी शहरातील गणेशोत्सवात मंडळांमध्ये पौराणिक कथांवर आधारित मूर्तींचे हालते देखावे असायचे. उत्सवाच्या शेवटच्या तीन दिवसांत देखावे पाहण्यासाठी सायंकाळी ते पहाटपर्यंत गर्दी असायची. मात्र मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यात पूर्वीप्रमाणे देखावे नसल्याने देखावे पाहणाऱ्यांच्या संख्येतही घट झाली. मात्र पूर्वभागातील घोंगडे वस्ती, भवानी पेठ परिसरातील सजीव देखावे पाहण्यासाठी गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस तुडुंब गर्दी असते. तीन दिवस आपली कला सादर करणाऱ्या विद्यार्थी व चाकरमान्यांच्या कलेला उत्स्फूर्त दाद मिळते. मात्र या वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागत असल्याने कलाकारांमध्ये नाराजी पसरली आहे. 

हेही वाचा : राजकीय आडोशाला खाकीचा गोरख धंदा! "या' शहरात 15 दिवसांत चार पोलिस निलंबित 

जोडभावी पेठ परिसरातील या मंडळांकडून पौराणिक कथांवर आधारित नाटके, विनोदी, तेलुगु, मराठी चित्रपटातील प्रसंग, विनोदी नाटके, राजकारणावरील घडामोडींवर आधारित नाटके नेत्यांच्या वेशभूषेत सादर केली जातात. त्यासाठी ध्वनिमुद्रण, पोषाख, बॅनर, सजावट आदींसाठी खर्च केला जातो. मात्र प्रेक्षकांची दाद, टाळ्या, शिट्या मिळाल्या की या कलाकांरांचा आनंद वेगळाच असतो. वर्षातून एकदा संधी मिळत असल्याने या तीन दिवसांच्या कलाकारांचा जोश काही औरच असतो. 

आठवडाभर सुरू असतो सराव 
येथील शंकर मित्र मंडळाचे सदस्य व सजीव देखाव्यातील कलाकार विनायक मादम म्हणाले, आमच्या मंडळामार्फत गेल्या 25 वर्षांपासून सजीव देखावे सादर केले जातात. यात सामाजिक, शैक्षणिक, स्वच्छ भारत, व्यसनमुक्ती, स्त्री-भ्रूणहत्याविरोधी नाटके सादर केली जातात. यासाठी मंडळातील कार्यकर्तेच स्क्रिप्ट लिहितात, गाणे म्हणतात, अभिनय करतात. यासाठी एक आठवडा आधीपासून रात्रभर सराव केला जातो. मात्र यावर्षी सर्व कलाकार नाराज असून, मंडळात शांतता पसरली आहे. 

प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नवनवीन विषय द्यायचा प्रयत्न
जन्मभूमी मित्र मंडळाचे देविदास त्रिमल म्हणाले, जोडभावी, भवानी पेठ व घोंगडे वस्ती परिसरात 30 ते 35 मंडळे सजीव देखावे सादर करतात. कलाकारांच्या कलागुणांना यामुळे व्यासपीठ मिळते. आमच्या मंडळाकडून गेल्या 40 वर्षांपासून सजीव देखावे सादर करत असून, प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नवनवीन विषय द्यायचा आमचा प्रयत्न असतो. यासाठी आठवडाभरापासून सर्व तयारी केली जाते. सेट, त्यामागील दृष्यासाठी डिजिटल पडदे, साउंड रेकॉर्डिंग ही सर्व कामे कार्यकर्ते व कलाकारच करतात. मात्र या वर्षी सर्व काही सुनेसुनेच आहे. तरीही कोरोनाला घालवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे आहे व गणेशभक्तांनी या वर्षी कृपया गर्दी करू नये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dissatisfaction among artists and activists as there is no live show in Ganeshotsav this year