यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवात पुरोहितांच्या "दक्षिणे'वर पाणी !

श्‍याम जोशी 
Saturday, 29 August 2020

यंदा गुढी पाडव्यापासूनच टाळेबंदी सुरू झाल्याने नवीन संवत्सरात पुरोहित व्यवसायाला ग्रहण लागल्याची स्थिती झाली. लॉकडाउनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने रोजची गुजराणही थांबली. केवळ या व्यवसायावर येथील अनेक पुरोहित कुटुंबांचा उदरनिर्वाह असल्याने त्यांचे जगणेच संकटात सापडले. आता अनलॉकनंतर सर्व बाजारपेठा सुरळीत होत आहेत, मात्र सार्वजनिक धार्मिक कार्यांना बंधने असल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. 

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : आपल्याकडे श्रावणासह गणेशोत्सवात धार्मिक कार्यांची मोठी रेलचेल असते. प्रतिवर्षी या काळात पुरोहित वर्गाची मोठी धावपळ असते. एकाच मुहूर्तावर अनेक कार्य असल्याने त्या काळात पुरोहितांची कमतरता जाणवते. या काळातील "दक्षिणे'तून मिळणाऱ्या कमाईवरच पुरोहितांचे वर्षभराचे उत्पन्न अवलंबून असते. यंदा मात्र कोरोना महामारीमुळे धार्मिक कार्यांनाच ब्रेक लागल्याने पुरोहितांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून पुरोहितांना आपल्या "दक्षिणे'वर पाणी सोडावे लागले आहे. 

हेही वाचा : राजकीय आडोशाला खाकीचा गोरख धंदा! "या' शहरात 15 दिवसांत चार पोलिस निलंबित 

यंदा गुढी पाडव्यापासूनच टाळेबंदी सुरू झाल्याने नवीन संवत्सरात पुरोहित व्यवसायाला ग्रहण लागल्याची स्थिती झाली. लॉकडाउनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने रोजची गुजराणही थांबली. केवळ या व्यवसायावर येथील अनेक पुरोहित कुटुंबांचा उदरनिर्वाह असल्याने त्यांचे जगणेच संकटात सापडले. अनेक संघटनांनी पुढे येत या पुरोहितांना अन्नधान्याचा पुरवठा केला. आता अनलॉकनंतर सर्व बाजारपेठा सुरळीत होत आहेत, मात्र सार्वजनिक धार्मिक कार्यांना बंधने असल्याने ती होत नाहीत. सार्वजनिक गणेशोत्सवावरही अनेक निर्बंध आले आहेत. त्यामुळे सार्वजनिक मंडळांच्या पूजा, सहस्त्रावर्तनाचे कार्यक्रम, गणेशयाग आदी उपक्रम झालेच नाहीत. त्याचा परिणाम पुरोहितांच्या व्यवसायावर झाला आहे. कोरोना संसर्गामुळे अनेक घरांतून गणेश प्रतिष्ठपनेच्या पूजाही ऑनलाइन पद्धतीने झाल्या. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवातील सर्वच धार्मिक कार्यक्रमांच्या "दक्षिणे'वर पुरोहितांना पाणी सोडावे लागले आहे. 

हेही वाचा : कोरोनातही "येथील' तुरुंग हाउसफुल्ल ! तुरुंगाची क्षमता 141 अन्‌ कैदी 357 म्हणून उभारले तात्पुरते जेल 

काय म्हणतात पुरोहित... 
याबाबत वेद प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पुरोहित अभिजित तेरकर म्हणाले, कोरोना संसर्गामुळे पुरोहितांना यंदा गणेशोत्सवात कुठेच आमंत्रण नसल्याने व्यवसाय ठप्प आहे. गेल्या 15 वर्षांपासून मुरारजी पेठ परिसरातील अनेक मंडळांच्या व घरगुती गणेशोत्सवातील स्थापना, सत्यनारायण पूजा माझ्याकडे आहेत. यंदा मात्र त्यासाठी बोलावणे आले नाही. मंडळाच्या व घरातील पूजा अनेकजण ऑडिओ रेकॉर्डवरील मंत्रांच्या व आरतीच्या द्वारेच उरकत आहेत. त्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. 

पुरोहित विठ्ठल जोशी वैरागकर म्हणाले, गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडळे तसेच अनेक घरांतून आम्हा पुरोहितांना विविध प्रकारच्या पूजेसाठी बोलावण्यात येत असे. त्यामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना विधी, मंत्रजागर, सामुदायिक सहस्त्रावर्तनाचे पाठ, गणेशयाग यज्ञ केले जात असत. यंदा कोरोनामुळे सार्वजनिक मंडळांकडून कोणतेच विधी होत नाहीत. तर घरातूनही विधीकार्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे पुरोहितांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. किमान देवी नवरात्रोत्सवापर्यंत तरी कोरोना संसर्ग कमी होऊन व्यवसायाला गती मिळावी, हीच प्रार्थना. 

पुरोहित वैभव कामतकर म्हणाले, यंदा अनेक मंडळांच्या पूजा नसल्याने पुरोहितांना आर्थिक फटका बसला आहे. घरातील गणपतीच्या स्थापना व अन्य पूजेसाठी बोलावले जात आहे मात्र ते प्रमाण खूपच कमी आहे. पाडव्यापासून लॉकडाउन झाल्याने लग्नसराईतील कमाईही गेली अन्‌ आता श्रावणासह गणेशोत्सवही गेला आहे. त्यामुळे वर्षभराच्या कमाईवर पुरोहितांना पाणी सोडावे लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona affected the business of priests during Ganeshotsav including Shravan