कोरोनामुळे गुरुजींना आले 'अच्छे दिन'; बाप्पाची ऑनलाइन प्राणप्रतिष्ठापना करण्यावर भर!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

खरंतर गणेशोत्सवात दरवर्षी घरात नातेवाईक, आप्तस्वकीयांची मांदियाळी असते. मात्र यंदा ही मांदियाळी सोशल मीडियाद्वारे जमली. व्हिडीओ कॉल, स्काइप, वेबिनार, झूम यांच्या सहाय्याने भाविकांनी एकमेकांच्या घरातील 'बाप्पा'चे घरबसल्या दर्शन घेतले.

पुणे : कात्रजमध्ये राहणाऱ्या पवार कुटुंबीयांच्या घरी 'बाप्पा'चे आगमन झाले खरे... पण कोरोनाच्या काळातही मोठ्या थाटामाटात गुरुजी पूजा सांगत होते आणि घरातील मंडळींनी मंगलमय वातावरणात 'बाप्पा'ची प्राणप्रतिष्ठापना केली. होय, कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही हे गुरुजी मात्र निवांतपणे पूजा सांगत होते. आता, तुम्ही म्हणाल हे कसे काय शक्य आहे? तर हे शक्य झाले ते 'यु-ट्यूब'च्या माध्यमातून, आणि याद्वारेच गुरूजींनी विधीवत पूजा सांगितली.

Ganeshotsav 2020 : श्रीमंत दगडूशेठ मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; यंदा उत्सवकाळात मंदिरात एन्ट्री नाही!​

कोरोनाच्या काळातही अनेक भाविकांनी घरोघरी यू-ट्यूब, व्हिडीओ तसेच ऑनलाइनच्या सहाय्याने 'बाप्पा'चे आगमन केले. खरंतर गणेशोत्सवात दरवर्षी घरात नातेवाईक, आप्तस्वकीयांची मांदियाळी असते. मात्र यंदा ही मांदियाळी सोशल मीडियाद्वारे जमली. व्हिडीओ कॉल, स्काइप, वेबिनार, झूम यांच्या सहाय्याने भाविकांनी एकमेकांच्या घरातील 'बाप्पा'चे घरबसल्या दर्शन घेतले. तर 'श्रीं'च्या स्वागतासाठी केलेली आरास, आकर्षक सजावट फेसबुक, व्हाट्सएपद्वारे मोठ्या संख्येने शेअर झाली आणि त्याला भरघोस लाइक आणि शेअर मिळाल्या.

Ganeshotsav 2020 : लाडक्या बाप्पाचं पुणेकरांनी केलं उत्साहात स्वागत; घराघरात आणि मंडळांतही बाप्पा विराजमान!​

शनिवार पेठेत राहणाऱ्या आणि बँक कर्मचारी असणाऱ्या सुचेता खांडके यांनी देखील आपली 'यु- ट्यूब' वरील व्हिडिओ पाहून 'बाप्पा'ची विधीवत प्राणप्रतिष्ठापना केली. सुचेता म्हणाल्या, "खरंतर अशाप्रकारे पूजा करायला कधी लागू नये, असे वाटते. परंतु कोरोनामुळे यावर्षी आदल्या दिवशीच इंटरनेटवर विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी व्हिडीओ सर्च करुन ठेवले आणि आज सकाळी ब्राह्ममुहूर्तावर 'बाप्पा'ची प्राणप्रतिष्ठापना केली."

यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे प्राणप्रतिष्ठापनेसाठी गुरुजींना घरी बोलावणे बहुतांश नागरिकांनी टाळले. तर काही गुरुजींनी पुजेसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे यंदा गुरुजींनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत काहींच्या घरी पूजा सांगितली. आयटी क्षेत्रात क्वॉन्टिटी अॅनालिसिस्ट असणारी तृप्ती आळेकर यांनी देखील घरी 'यु-ट्यूब'वरुन 'बाप्पा'चे आगमन केले आणि त्या पूजेचा व्हिडिओ करून आप्तस्वकीयांना मोबाईलवर पाठविला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many Punekars worshiped Ganpati with the help of online Guruji due to Corona