Ganeshotsav 2020 : लाडक्या बाप्पाचं पुणेकरांनी केलं उत्साहात स्वागत; घराघरात आणि मंडळांतही बाप्पा विराजमान!

Pune_Ganesh_Festival
Pune_Ganesh_Festival

Ganesh Festival 2020 : पुणे : 'कोरोना'ने ग्रासलेल्या चिंतेला बाजूला सारून घरातील बाळगोपाळ, वृद्ध, महिला सर्वांनी लाडक्‍या गणपती बाप्पाचे दणक्‍यात स्वागत केले. गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... या घोषणांनी प्रत्येक गल्ली, सोसायटी, फ्लॅटमध्ये उत्साह आणला. घराघरात बाप्पा विराजमान झाले. घंटी, टाळ, शंख यांच्या घुमणाऱ्या नादाने वातावरण पवित्र झाले. आनंद अन् सुखाच्या पर्वाची सुरुवात झाली.

जवळपास गेल्या सहा महिन्यांपासून 'कोरोना'च्या दहशतीने समाजाला ग्रासले आहे. या संकटकाळातून सुटकेची वाट सर्वजण पाहत आहेत. आनंद देणारा, दुःखाचे निवारण करणाऱ्या विघ्नहर्त्याचे आगमन होत असताना या गणेशोत्सवासही याचा फटका बसला. गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी दरवर्षी भव्यपणे गणेशोत्सवाचे आयोजन करण्याच्या इच्छेला गणेश मंडळांनी, कार्यकर्त्यांनी मुरड घातली. आणि बाप्पाचे अगदी साधेपणाने स्वागत करण्याचा निर्णय घेतला. नुसता घेतलाच नाही तर तो प्रत्यक्ष अमलात आणल्याने एक नवा आदर्श पुण्याच्या गणेशोत्सवाने घालून दिला आहे. शहरात आज असेच चित्र दिसून आले.

गणेशोत्सवात गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात असताना पुणेकरांनीही त्यासाठी काळजी घेतली. गेल्या तीन चार दिवसांपासूनच भाविकांनी बुक केलेली गणपतीची मूर्ती घरी घेऊन जाण्यास सुरूवात केली होती. पुजेचे साहित्य, फळे, फुलेही घराजवळच घेण्यास पसंती दिली. त्यामुळे आज रस्त्यावर दिसणारी गर्दी यापूर्वी पेक्षा कमी होती.

गणपती प्राणप्रतिष्ठापनेसाठी पहाटेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत मुहूर्त होता. सकाळी ९-१० वाजल्यापासून गणपती बसविण्यासाठी लगबग सुरू होती. कार, दुचाकी, रिक्षांमधून गणपती बाप्पाचा जयघोष करत लाडक्‍या बाप्पाला भाविक घरी घेऊन जात होते. घरात पुस्तके, खेळाचे साहित्य, विद्युत रोषणाई, फुलांची सजावट करून, मोदक, पेढ्यांचा प्रसाद दाखवून पूजा करण्यात आली.

शहरातील गणपती मंडळांनीही साधेपणाने गणेशोत्सवाची सुरूवात केली. मिरवणूक न काढता गणपती मंदिरासमोर छोटा मांडव टाकून, विद्युत रोषणाई, फुलांची आरास केली होती. दुपारनंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्स ठेवत प्राणप्रतिष्ठापना केली.

कार्यकर्ते पारंपरिक वेशात
गणपतीची मिरवणूक नसली म्हणून कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही. मंडळाचे कार्यकर्ते सकाळपासून पारंपरिक वेशात, कपाळावर अष्ठगंध अन चंदनाचा टिळा लावून कामाला लागल्याचे चित्र दिसून येत होते.

मेटलडिटेक्‍टर ऐवजी सॅनिटायझर
गणेशोत्सवात होणाऱ्या गर्दीमुळे प्रमुख मंडळांसह इतर गर्दी होणाऱ्या मंडळांना मेटल डिटेक्‍टर लावणे अनिवार्य झाले आहे. मात्र, यंदा भाविकांची गर्दी होणार नसल्याने मेटलडिटेक्‍टर गरज नाही, पण मांडवात कार्यकर्त्यांची वर्दळ असणार असल्याने बहुतांश ठिकाणी सॅनिटाझर ठेवण्यात आले होते आणि मास्कही अनिवार्य करण्यात आला होता.

पोलिसांना आराम
गणेशोत्सवात ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, आज मिरवणुकाच नसल्याने पोलिसांना रस्ते बंद करावे लागले नाहीत, तसेच जे रस्ते सुरू आहेत तेथे गर्दी बाजूला करून वाहनांना वाट मोकळी करून द्यावी लागली नाही. पोलिस कर्मचारी त्यांना नेमूण दिलेल्या ठिकाणी तैनात होते, पण त्यांना दरवेळीप्रमाणे ताण पडला नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com