esakal | अडीचशे वर्षांचा इतिहास असलेला बेळगावचा प्रसिद्ध लोणी गणपती 
sakal

बोलून बातमी शोधा

The famous Loni Ganpati of Belgaum with a history of two hundred and fifty years

250 वर्षांचा इतिहास मंदिराला आहे. गणेशाची मूर्ती त्यावेळी सध्याच्या ठिकाणी मिळाली आहे.

अडीचशे वर्षांचा इतिहास असलेला बेळगावचा प्रसिद्ध लोणी गणपती 

sakal_logo
By
सतिश जाधव

बेळगाव - चन्नमा सर्कलमध्ये स्थित असलेल्या गणेश मंदिराला सुमारे अडीचशे वर्षांचा इतिहास लाभला आहे. नवसाला पावणारा आणि लोणी गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे. चन्नमा सर्कलमध्ये अगदी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी नेहमी भक्तांची रांग लागलेली असते. 

एक प्राचीन श्रद्धास्थान म्हणूनही गणेश मंदिराला ओळखले जाते. या गणेशाचे दर्शन घेऊनच परिसरातील सर्वसामान्य नागरीक, व्यापारी, व्यावसायिक दैनंदिन कामकाजाला प्रारंभ करतात. गणेश मूर्तीचे प्राचीनत्व भावनारे आहे. सध्या चोपडे कुटुंबीय मंदिराची देखभाल करतात. सध्या असलेल्या ठिकाणी पूर्वी अगदी लहान मुर्ती व राऊळ होते. भाविकांच्या मागणीनुसार देशपांडे कुटुंबीयांनी 1968 साली मंदिराचा जिर्णोद्धार केला. आजही भाविकांच्या देणगीतून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. लोणी गणपती म्हणून हा गणेश प्रसिद्ध आहे. मूर्तीची रोज लोण्यामध्ये पूजा बांधली जाते. म्हणून हे नाव पडले आहे. ब्रिटीशांच्या काळापासून मंदिर असल्याचा उल्लेख असल्याची माहिती सेवेकऱ्यांनी दिली. 

मंदिर आवारात जिल्हा रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, व्यावसायिक अस्थापने असल्याने मंदिरात भाविकांची नेहमीच वर्दळ असते. रमेश चोपडे, प्रभाकर चोपडे, सुनील चोपडे, विजय चोपडे यांच्याकडून मंदिराची सेवा केली जाते. मंदिरात रोज सकाळी आरती, पूजा, अभिषेक, महाआरती, आदी धार्मिक कार्यक्रम होतात. त्याचबरोबर गणेश जयंतीनिमित्त पाळणा, प्रसाद वाटप केला जातो. दसरा, उत्सव, गणेशोत्सव आदी कार्यक्रम वर्षभरात होतात. रोज सुमारे 500 भाविक भेट देऊन दर्शन घेतात. तसेच आरतीला रोज सुमारे 50 भाविक असतात. यापूर्वी नकटा गणपती म्हणून हे देवस्थान प्रसिद्ध होते. सध्या लोणी गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. कर्नाटक, गोवा, या भागातील भक्त शहरात आल्यानंतर या मंदिराला आवर्जून भेट देतात. 

कोरोनामुळे 24 मार्चपासून मंदिरे बंदच होती. सरकारने परवानगी दिल्यानंतर सुमारे महिनाभरापासून मंदिरे खुली करण्यात आली आहेत. मात्र, कोरोनाचे प्रमाण वाढतच असल्याने भक्तांची वर्दळ कमी झाली आहे. मंदिरात आलेल्या भक्तांना सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले जाते. तसेच मास्क असलेल्यांना प्रवेश दिला जातो व सॅनिटायझरची सोयही करण्यात आली आहे. 


सुमारे 250 वर्षांचा इतिहास मंदिराला आहे. गणेशाची मूर्ती त्यावेळी सध्याच्या ठिकाणी मिळाली आहे. त्याच ठिकाणी राऊळ उभारून तिची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. लोणी गणपती म्हणून मंदिर प्रसिद्ध आहे. 
-रमेश चोपडे, सेवेकरी

( संबंधित लेख २०१९ मध्ये 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाला होता. गणेशोत्सवानिमित्त हा लेख पुन्हा प्रकाशित करत आहोत)

go to top