esakal | वैदर्भीय अष्टविनायक श्री अठराभुजा गणेश!
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati

अठरा विषयांच्या विज्ञानाचे ज्ञान असलेल्या विद्याधराची दृष्टीच या अठराभुजा गणेशात आढळते. साडेचार फूट उंचीच्या शुभ्र स्फटिकाच्या मूर्तीच्या हातात अंकुश, पिश, सटवांग, त्रिशूल, परशू, धनुष्य आदी विविध शस्रे आहेत.

वैदर्भीय अष्टविनायक श्री अठराभुजा गणेश!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रामटेक - विदर्भाची अयोध्या म्हणून ओळख असलेल्या रामनगरीत असंख्य मंदिरे आहेत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या पावन स्पर्शाने दोनदा पुनित झालेल्या या रामनगरीत विद्येचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाच्या तीन रूपांचे दर्शन विशेषतः वैदर्भीय अष्टविनायक श्री अठराभूजा गणेशाच्या दर्शनाने गणेशभक्तांना तिन्ही लोकींचा आनंद अनुभवण्यास मिळतो.

गडमंदिरावरील १३ व्या शतकातील श्रीराम, जानकी व लक्ष्मण मंदिर, अगस्ती ऋषींचा आश्रम, वाकाटककालीन वराह व त्रिविक्रम मंदिर, रुद्र व केवल नृसिंह मंदिर, प्रसिद्ध कुमारिका बाहुली, राष्ट्रकुटकालीन कालंका मंदिर, जैन तीर्थंकरांची मंदिरे असलेला शांतिनाथ मंदिर समूह अशी एकापेक्षा एक प्रसिद्भ मंदिरे रामटेक नगरीत आहेत. या मंदिरांपैकी एक मंदिर श्री अठराभुजा गणेशाचे आहे. शहराच्या मध्यवस्तीत शास्त्री वॉर्डात रामगिरीच्या पायथ्याशी श्री अठराभुजा गणेश मंदिर आहे. या मंदिराची व श्री गणेशाची कथा वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुमारे ५०० वर्षांपूर्वी नागपूरच्या चांदरायण कुटुंबीयांच्या पूर्वजांनी मंदिराचे निर्माण केले. 

अठरा विषयांच्या विज्ञानाचे ज्ञान असलेल्या विद्याधराची दृष्टीच या अठराभुजा गणेशात आढळते. साडेचार फूट उंचीच्या शुभ्र स्फटिकाच्या मूर्तीच्या हातात अंकुश, पिश, सटवांग, त्रिशूल, परशू, धनुष्य आदी विविध शस्रे आहेत. एका हातात मोदक व दुसऱ्या हातात मोरपंखाची लेखणी आहे. श्रीगणेशाची सोंड वेटोळी आहे. श्री गणेशाच्या डोक्‍यावर पाच फण्यांचा नाग आहे. गळ्यातही नाग आहे. कमरेला नागपट्टा आहे. अठरा सिद्धींमुळे श्री अठराभुजा गणेशास शास्त्रपुराणात विघ्नेश्वर म्हणून पुजले जाते. विशेष म्हणजे या अठराभुजा गणेश मंदिरात विघ्नहर्त्याची तीन रूपे पहावयास मिळतात. मंदिरात मध्यभागी महागणपतीची अतिशय सुंदर रूप असलेली मूर्ती आहे. त्याच्या उजव्या बाजूला रिद्धिसिद्धी गणेशाची मूर्ती आहे. डाव्या बाजूस श्री अठराभुजा गणेशाची मूर्ती आहे. या मंदिराचा जीणोद्धार श्री अठराभुजा गणेश मंडळाद्वारे करण्यात आला आहे.

go to top