
१) मानाचा पहिला गणपती ग्रामदैवत श्री कसबा गणपती
श्री कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत. शहाजीराजे भोसले यांनी १६३६ मध्ये पुण्यात लाल महाल बांधला, तेव्हा जिजाबाईंनी या गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली होती. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली, त्या वेळी या गणपतीला प्रथम मान दिला गेला. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ मध्ये सुरुवात झाली. कसबा गणपती मंदिर शनिवारवाड्याच्या जवळ असून, येथेच मंडळातर्फे दर वर्षी उत्सव साजरा केला जातो. कसबा गणपती मंडळ धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी नावाजलेले आहे. दर वर्षी मंडळातर्फे ७५ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला जातो, तसेच नगर जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी हे दुष्काळी गाव दत्तक घेऊन त्याचा विकास मंडळातर्फे केला जातो.