Ganeshotsav 2022 : पुरोगामी चळवळीचा आदर्श कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh chaturthi 2022

Ganeshotsav 2022 : पुरोगामी चळवळीचा आदर्श कायम

नांदेड : नव्या सरकारने उत्सवावरील बहुतांश निर्बंध उठविल्याने यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात होत असताना अनेक गावांनी पुरोगामी चळवळीचा आदर्श कायम ठेवला आहे. नांदेड जिल्ह्यात शहरामध्ये ३७६ व ग्रामीण भागात दोन हजार ७४० असे एकूण तीन हजार ११६ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. तसेच जिल्ह्यातील ५७५ गावांत ''एक गाव, एक गणपती'' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

कोरोना संसर्गामुळे गेल्यावर्षी हा उत्सवच न करण्याचा निर्णय अनेक गावे आणि सार्वजनिक मंडळांनी घेतला होता. यंदा अशा गावांची संख्या फारच कमी आहे. दोन वर्षे राज्यावर कोरोना संसर्गाचे मोठे संकट होते. या पार्श्वभूमीवर दोन वर्षे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदा नव्या सरकारने उत्सवावरील बहुतांश निर्बंध उठविल्याने तरुणाईमध्ये उत्साह बघायला मिळत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी तसेच शासकीय निमशासकीय, खासगी कार्यालयांमध्येही गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जल्लोषात करण्यात आली. गृहनिर्माण सोसायट्याही त्यात मागे नाहीत.

यंदा करोनाची भीती कमी झाल्याने सर्व गावांत गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. जिल्ह्यात शहरामध्ये ३७६ व ग्रामीण भागात दोन हजार ७४० असे एकूण तीन हजार ११६ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. त्यापैकी ‘एक गाव, एक गणपती’ ५७५ गावांमध्ये आहे. या गावांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा अधिक असल्याने हे पुरोगामी चळवळ अधिक घट्ट होत असल्याचे लक्षण मानले जात आहे.

भक्तांचा उत्साह कायम...

गणेशोत्सव म्हटलं की, जिथं नजर जाईल तिथं बाप्पांचं दर्शन घडतं. मग गावागावांत असो पाड्यापाड्यांत असो किंवा गल्लोगल्ली असो. जिथं- तिथं घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचे गणपती दिसून येतात. जिल्ह्यात घरोघरी दीड, अडीच आणि पाच दिवसांचा तर सार्वजनिक गणेश मंडळामध्ये पाच, सात आणि अकरा दिवसांसाठी बाप्पांची स्थापना होते. मात्र ''एक गाव, एक गणपती'' सारखी संकल्पना क्वचितच काही ठिकाणी दिसून येते. अशीच ''एक गाव, एक गणपती''ची संकल्पना नांदेड जिल्ह्यात ५७५ गावांमध्ये राबविण्यात आली आहे.

उत्सवावरील निर्बंध उठवल्याने एकीकडे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याची जोरदार तयारी झाली असताना अजूनही काही गावांनी ''एक गाव, एक गणपती'' या उपक्रमाच्या माध्यमातून एकीचा संदेश कायम ठेवला आहे, हे कौतुकास्पद आहे. पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक गावांत बैठक घेऊन नागरिकांना व कार्यकर्त्यांना समजावल्याने यंदा अशा गावांची संख्या वाढली आहे.

- चंद्रसेन देशमुख,उपविभागीय पोलिस अधिकारी, नांदेड.

Web Title: Ganeshotsav 2022 Nanded Ganesh Festival One Village One Idol Activity

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..