
दर्शन मात्रे..!
विघ्नहर्त्या श्री गजाननाचे आज (मंगळवारी) आगमन होत आहे. त्यानिमित्त सातारा जिल्ह्यातील प्राचीन व प्रसिध्द असणाऱ्या गणेश मंदिर व मूर्तींची माहिती आजपासून...
-भद्रेश भाटे
श्री तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहरात कृष्णा नदीच्या तीरावर महागणपतीचे मंदिर आबालवृद्ध भाविक व पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. दररोज हजारो गणेशभक्त या मंदिराला भेटी देतात. सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी १७६२ मध्ये सुमारे दीड लाख रुपये खर्च करून हे मंदिर उभारले. मंदिर अतिशय भव्य असून गाभारा व सभामंडप असे दोन भाग आहेत. साडेचौसष्ट फूट लांब व पावणेएकोणचाळीस फूट रुंद आणि पंधरा फूट उंचीचा हा दगडी सभामंडप आहे. चुना आणि फरशीचा समन्वय साधून वास्तुशास्त्रज्ञांनी छताच्या पाषाणाला खाचा पाडून त्यात दुसऱ्या दगडांना अणकुचीदार टोके करून ती त्यात बसविली आहेत. मंडपाच्या पूर्वेला तीन, दक्षिणेस पाच, उत्तरेस तीन कमानी आहेत. प्रत्येक कमान दहा फूट उंच व पावणेसात फूट रुंद आहे. सभामंडपातून गाभाऱ्यात जाण्यासाठी पूर्वेकडून तीन, दक्षिण व उत्तरेकडून प्रत्येकी एक असे पाच दरवाजे आहेत.
मंदिराचा गाभा तीस फूट लांब आणि तेवढाच रुंद आहे. गर्भगृहात अर्धा मीटर उंच चौथऱ्यावर एकाच दगडातून घडविलेली गजाननाची रेखीव बैठी मूर्ती असून उंची सहा फूट तर रुंदी सात फूट अशी भव्य डाव्या सोंडेची मूर्ती आहे. भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला ‘ढोल्या गणपती’ असे संबोधले जाते. पण, नंतर ‘महागणपती’ हे नाव रुढ झाले. मूर्ती एकसंध काळ्या दगडात कोरलेली असून, दगड कर्नाटकातून आणला आहे. गणपती उकिडवा दोन्ही मांड्या रोवून बसला आहे. प्रसन्न मुद्रेतील गणपतीस यज्ञोपवितासह मोजके अलंकार घातले आहेत. त्यात गळ्यातील हार, बाजूबंद व पायातील तोडे स्पष्ट दिसतात. मूर्तीच्या मागील प्रभावळ अर्धचंद्राकृती ३ मीटर (६३ सेमी) उंच आहे. गर्भगृहाचे छत ही जणू प्राचीन स्थापत्यशैलीची किमयाच आहे. वाईतील सर्व मंदिरांत महागणपतीचे शिखर सर्वांत उंच असून, त्याची पायथ्यापासून कळसापर्यंतची उंची २४ मीटर आहे.
वारंवार येणाऱ्या नदीच्या पुरापासून संरक्षण व्हावे, म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार बांधली आहे. त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले जाऊन पाण्याचा दाब कमी होतो आणि मंदिर सुरक्षित राहते. मंदिर ज्या घाटावर बांधले आहे, त्याला गणपती घाट म्हटले जाते. तो पूर्णपणे फरसबंदी व दगडात बांधलेला आहे. याच घाटावर पश्चिमेस भव्य तटबंदीच्या आत काशी विश्वेश्वर मंदिर आहे. या महागणपतीची स्थापना वैशाख शु.१३ शके १६९१ मध्ये केली. हा गणपती वाईचे ग्रामदैवत असून तो नवसाला पावतो, अशी श्रद्धा असल्याने महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील अनेक भक्त तसेच पाचगणी-महाबळेश्वरला जाताना अनेक पर्यटक आवर्जून या महागणपतीच्या दर्शनासाठी येतात, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विश्वास गोखले यांनी दिली.