बाल गणेशाने इथेच मारला सिंदुरासुरास

संकेत कुलकर्णी
Wednesday, 4 September 2019

पुण्याचा दगडूशेठ हलवाई, मुंबईचा लालबागचा राजा किंवा राजूरच्या गणपतीच्या मंदिरांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते; पण पुराणात सांगितलेल्या गणेशाने केलेल्या सिंदुरासुर वधाची कथा आपल्याच शहराजवळ घडल्याचे आपल्याला माहीत नाही!

औरंगाबाद : गणेश चतुर्थी, अंगारकी-संकष्टीला गणपतीच्या देवळांमध्ये भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. गणेशोत्सवात तर पुण्याचा दगडूशेठ हलवाई, मुंबईचा लालबागचा राजा किंवा राजूरच्या गणपतीच्या मंदिरांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते; पण पुराणात सांगितलेल्या गणेशाने केलेल्या सिंदुरासुर वधाची कथा आपल्याच शहराजवळ घडल्याचे आपल्याला माहीत नाही! अशा या शेंदूरवादा गावाबद्दल थोडेसे... 

अष्टकमानी चिरेबंदी मंदिर
गंगापूर तालुक्‍यातील शेंदूरवादा हे खाम नदीच्या काठावर वसलेले गाव. औरंगाबाद शहरापासून जेमतेम 35 किलोमीटरवर वसलेल्या या गावात खाम नदीच्या पात्रातच सिंदुरात्मक गणेशाचे मंदिर आहे. शके 1706 मध्ये इ.स. 1784 मध्ये बांधल्याचा शिलालेख तिथे पहायला मिळतो. अष्टकमानी मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी आहे. कायगाव टोका येथील सुंदर मंदिरांना समकालीन असलेल्या या मंदिरात सिंदुरात्मक गणेशाची वाळूची भव्य दक्षिणमुखी मूर्ती आहे. नदीत उतरायला छोटासा दगडी घाट, जवळच भाविकांना राहण्यासाठी जुन्या काळात बांधलेली चिरेबंदी सराई आहे. श्री गणेशाच्या चरणी भागीरथी तीर्थकुंड आहे. त्याला "विनायक तीर्थ' असेही म्हणतात. 

अशी आहे पौराणिक कथा 
पुराणकथेत सांगितल्यानुसार एकदा झोपेतून उठलेल्या ब्रह्मदेवाने दिलेल्या जांभईतून महाकाय राक्षसाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाने "तू ज्याला मिठी मारशील, तो भस्मसात होईल' असा वर त्याला दिला. त्याची प्रचिती पाहण्यासाठी तो ब्रह्मदेवालाच मिठी मारण्यासाठी झेपावला. त्याच्यापासून बचावासाठी ब्रह्मासह सर्वच भयभीत देवादिकांनी बाल गणेशाला साकडे घातले. गुरू पाराशर ऋषींच्या आश्रमात विद्या आत्मसात करणाऱ्या बाल गजाननाने त्या असुराला युद्धासाठी आव्हान दिले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. गजाननाने विश्वरूप धारण करून आपल्या पाशाने गळा आवळून त्या राक्षसाला ठार केले. त्याच्या रक्ताने गणेशाचे अंग शेंदरासारखे माखले. हे युद्ध जिथे झाले, ते ठिकाण म्हणजे शेंदूरवादा. येथील गणेशाला "सिंदुरवदन' किंवा "सिंदुरात्मक गणेश' असे म्हणतात. 

असा आहे इतिहास 
पानिपतच्या लढाईच्या अगोदर उदगीरला नानासाहेब पेशवे आणि निजाम यांच्यात झालेल्या तहानुसार दौलताबाद मुलुखाच्या चौथाई वसुलीचे अधिकार आणि देवगिरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर सुमारे 40 वर्षे या भागात मराठ्यांचा अंमल होता. तत्कालीन मराठा सरदार, जहागीरदारांनी दिलेल्या दानांमधून पैठण, कायगाव टोका, औरंगाबाद या भागात त्यावेळी कित्येक मंदिरेही उभी राहिली. अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले गेले. देवगिरी किल्ल्यावरील गणपती मंदिर आणि शेंदुरवादा येथील सिंदुरात्मक गणेशाची स्थापना याच काळात झाली. 

पर्यटक देतात भेटी 
गणेशोत्सवात, अंगारकी-संकष्टी चतुर्थीला येथे मोठी गर्दी होते. 1974 मध्ये गावात गणपती अथर्वशीर्ष मंडळ स्थापन करण्यात आले. तेव्हापासून दर संकष्टी चतुर्थीला येथे अथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तने केली जातात. मंदिराला स्थानिक उत्पन्न काही नाही. श्री मध्वनाथ संस्थानतर्फे मंदिराची देखभाल केली जाते. संतकवी मध्वमुनीश्‍वर यांची मंदिरालगतच समाधी आहे. हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटक, पुरातत्त्वशास्त्राचे अभ्यासक आणि इतिहासतज्ज्ञही येथे भेट देतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesha killed Sindurasura near Aurangabad