गणेशोत्सव2019 : सोनपावलांनी आली गवर माहेराला!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

फराळाचा नैवेद्य
गौराईला पहिल्या दिवशी पालेभाजी व भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा गोड नैवेद्य दिला जातो. निरोपाच्या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी गौराईला दिवाळीमध्ये बनवण्यात येणारा फराळही नैवेद्य म्हणून दाखवण्यात येतो. पाच प्रकारची फळे ठेवली जातात.

गणेशोत्सव2019 : मुंबई - ‘आली गवर आली सोनपावलांनी आली...’ गीताच्या तालावर गणपतीनंतर गुरुवारी लाडक्‍या गौराईचे घरोघरी आगमन झाले. पावसाने उसंत घेतल्याने भाविकांनी आनंद आणि उत्साहात गौराईचे स्वागत केले. गौराईच्या आगमनासाठी बाजारपेठाही फुलल्या होत्या. 

प्रामुख्याने शाडू मातीच्या गौरींच्या मूर्ती बसवण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी गौरींचे मुखवटे तयार करून त्यांचे पूजन झाले. हिरव्या गौराईला मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, नथ आदी आभूषणे घालून तिची पूजा करण्यात आली. 

उभ्या गौरी, बैठ्या गौरी, खड्यांच्या गौरी, कलशातील गौरी, पानाच्या गौरी आदी विविध प्रकारच्या गौरी घराघरात बसवल्या जातात. गौरी म्हणजे पार्वतीचे रूप मानले जाते. तेरडा, इंद्रायणी आदी झाडांच्या फांद्याची गौरी म्हणजे पानांची गौरी. त्या झाडांच्या फांद्या घराबाहेरच ठेवल्या जातात. आगमनाच्या वेळी घराबाहेर पाटावर गौरीचा कलश आणि मुखवटे व पानांच्या गौरी मांडल्या जातात. त्यांची बाहेरच पूजा केली जाते. ती करण्याचा मान माहेरवाशिणीचा असतो. गौरी माहेरवाशीण म्हणून घरी येते. त्यामुळे तिचे सर्व लाड पुरवले जातात. आगमनासाठी हळदी-कुंकवाची आठ पावले दारापुढे काढण्यात येतात. माहेरवाशीण गौरीचा कलश व तिच्यापाठोपाठ आणखी सुवाशीण मुखवटा घेऊन घरात प्रवेश करते.

घरातील चारही कोपऱ्यांमध्ये कलश फिरवला जाऊन त्याची गणपतीच्या बाजूला स्थापना केली जाते. तिथेच मुखवटेही ठेवले जातात. दुसऱ्या सुपामध्ये गौराईचा साजशृंगार ठेवला जातो. त्यानंतर गौराईला सजवले जाऊन तिची पूजा केली जाते. 

कोकणामध्ये खड्यांच्या गौरी बसवल्या जातात. त्या विहिरी किंवा नदीवरून घरात आणल्या जातात. विदर्भात उभ्या गौरी बसवल्या जातात. विदर्भात गौराईच्या पाटवड्या आणि पुरणपोळीचा नैवेद्य असतो. गौरी आगमनाच्या दुसऱ्या दिवशी रात्री गौरी जागवल्या जातात. त्यामध्ये विविध खेळ खेळले जातात. उद्या गौरींच्या जेवणानंतर शनिवारी गौरी-गणपतींचे विसर्जन केले जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Gauri Ganpati Decoration