कोल्हापूर : आळवेत रंगविरहित गणेशमूर्तीची पूजा 

सागर चौगले
Tuesday, 3 September 2019

पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक मूर्तीचे पूजन व विसर्जन करण्यासाठी एकीकडे जनजागृती सुरू आहे; मात्र शंभर वर्षांपासून रंगविरहित पूर्ण मातीच्या गणेशमूर्तीचे पूजन व विसर्जन करण्याची परंपरा आळवे येथील ग्रामस्थांनी आजही जपली आहे. 

माजगाव - गणेशोत्सवात पूर्वी शाडूच्या मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवल्या जात. कालांतराने प्लास्टर ऑफ पॅरीसपासून मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत आणि त्यांना लावलेल्या रंगामुळे अशा मूर्तींच्या विसर्जनानंतर जल प्रदूषण होते. अनेक तलावांत मूर्ती विसर्जनास बंदी आहे. पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक मूर्तीचे पूजन व विसर्जन करण्यासाठी एकीकडे जनजागृती सुरू आहे; मात्र शंभर वर्षांपासून रंगविरहित पूर्ण मातीच्या गणेशमूर्तीचे पूजन व विसर्जन करण्याची परंपरा आळवे येथील ग्रामस्थांनी आजही जपली आहे. 

दोन-अडीच हजार लोकसंख्येच्या गावात दहा सार्वजनिक मंडळांतर्फे तसेच घरोघरी चिखल मातीपासून बनविलेल्या व विनारंगाच्या गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. गावातील सर्वच गणेश मूर्ती चिखल मातीपासून बनविलेल्या जातात. ग्रामदैवत भैरोबाच्या श्रद्धेपोटी ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून आजही गाव जपत आले आहे.

पूर्ण चिखलाच्या घरगुती "श्री' मूर्ती लहान असतात. त्याचप्रमाणे चिखलमाती व विनारंगाच्या मंडळाच्या गणेशमूर्ती चार ते पाच फुटांपर्यंत उंच असतात. गावातील कुटुंबे नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेरगावी वास्तव्यासाठी कायमची राहायला गेली आहेत. अशा कुटुंबांकडूनही जिथे राहायला असतील, त्या ठिकाणी विना रंगाच्या व मातीच्या गणेशमूर्तीचे पूजन करून विसर्जन केले जाते. त्या कुटुंबाने गावची परपरा सांभाळावी अशी प्रथा आहे. गौरी गणपतीचे विसर्जन एकोप्याने व ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून केले जाते. 

पूर्वीपासून येथे चिखल मातीच्या गणेशमूर्तीचे पूजन करून विसर्जन केले जाते. या मूर्ती आम्ही काळ्या मातीत नारळाची शेंडी, तागाची पोती, कापूस आदी घटक वापरून बनवतो. आजही आम्ही कुंभार बांधव सुमारे 300ते 350 श्री मूर्ती बनवतो. 
- तानाजी कुंभार
, मूर्ती कारागीर, आळवे 

आळूची पाने, गौरीपासून गौरी शंकर मुखटे 
चिखल मातीऐवजी आळूच्या पानाचा व गौरी वनस्पतीचा वापर करून गौरी शंकराच्या मूर्तीचा आकार तयार केला जातो. त्याची भक्तिभावाने पूजाअर्चा केली जाते. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Colourless Ganesh idol puja n Aalve in Kolhapur