महापुराचं थैमान अन्‌ जवानांना सलाम...! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

कोल्हापूर - महापुराच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी आता काही ठिकाणी तांत्रिक व सजीव देखाव्यांना प्रारंभ झाला आहे. ज्या मंडळांनी देखावे साकारले आहेत. त्यातूनही महापुराच्या थैमानाच्या कारणांबाबतचे प्रबोधन, मदतकार्य करणाऱ्या संस्थांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

कोल्हापूर - महापुराच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी आता काही ठिकाणी तांत्रिक व सजीव देखाव्यांना प्रारंभ झाला आहे. ज्या मंडळांनी देखावे साकारले आहेत. त्यातूनही महापुराच्या थैमानाच्या कारणांबाबतचे प्रबोधन, मदतकार्य करणाऱ्या संस्थांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

राजारामपुरीसह शिवाजी उद्यमनगर, जुना बुधवार पेठ आदी परिसरात तांत्रिक देखाव्यांचे तर शिवाजी पेठ, मंगळवार पेठेसह शुक्रवार पेठेतील काही मंडळांनी सजीव देखावे साकारले आहेत. शिवाजी उद्यमनगरातील जय शिवराय मित्र मंडळाने "एनडीआरएफ'च्या जवानांना सलाम करणारा तांत्रिक देखावा साकारला आहे.

कालपासून हा देखावा खुला झाला आहे. बोटीचे सारथ्य बाप्पा करत असून भाविकांचे प्रतिनिधी म्हणून ते जवानांच्या कार्याला आशिर्वाद देत असल्याचा हा देखावा यंदाही लक्षवेधी ठरतो आहे. न्यू छत्रपती शिवाजी उद्यमनगर फ्रेंडस्‌ सर्कलने वनविहार करणारा बाप्पा हा तांत्रिक देखावा साकारला आहे. 

राजारामपुरी सहावी गल्लीतील जय शिवराय तरुण मंडळाने अकरा फुटी वीर हनुमानाचा तांत्रिक देखावा साकारला आहे, तर राजारामपुरी दुसरी गल्ली येथील शिवाजी तरुण मंडळाने यंदा काल्पनिक मंदिर, तर राजारामपुरी स्पोर्टसनेही शिवानंद मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. यासह विवेकानंद मित्र मंडळानेही काल्पनिक मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.

दरम्यान, शिवाजी चौकातील एकवीस फूटी महागणपती, संयुक्त शिवाजी चौकाच्या गणेश, न्यू सम्राट चौक, एसपी बॉईजचा चिंतामणी, रंकाळवेश गोल सर्कलच्या गणरायाच्या दर्शनासाठीही भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. जुना बुधवार पेठेतील सोल्जर्स ग्रुपने आपत्ती व्यवस्थापन, क्रांतिवीर राजगुरू तरुण मंडळ, डांगे गल्ली तरुण मंडळाने महापुरावर तर हायकमांडो फ्रेंडस्‌ सर्कलने "सायकल चालवा' असा संदेश देणारा देखावा साकारला आहे. 

खाऊगल्लीत उत्साह 
पावसाने उसंत दिल्याने आता कोल्हापूरकर सहकुटुंब गणेशमूर्ती व देखावे पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रमुख मार्गावर खाद्यपदार्थांचे स्टॉलही सजले असून खाऊ गल्लीतही उत्साह जाणवू लागला आहे. येत्या दोन दिवसात ही गर्दी आणखीनच वाढत जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Ganesh Festival special report