गणेशोत्सव 2019 : विसर्जन सोहळ्यात खड्ड्यांचे विघ्न?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

पावसामुळे पेव्हरब्लॉक उखडल्याने मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणूक खड्ड्यांतूनच न्यावी लागणार असल्याने मंडळांना चिंता...

मुंबई : पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर बसवण्यात आलेले पेव्हरब्लॉक उखडल्याने खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे विसर्जन सोहळ्यात अडथळे येण्याची चिंता गणेश मंडळांना सतावत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी होत आहे. 

मुंबईत बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे  वांद्रे, मालाड, गोरेगाव, दादर-नायगाव, भोईवाडा, शीव-प्रतीक्षानगर, दादर उड्डाणपूल, घाटकोपर (पूर्व), कुर्ला, गोवंडी, मानखुर्द आदी परिसरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. पावसाने काही दिवसांपूर्वी उघडीप घेतल्यानंतर पालिकेने पेव्हरब्लॉक आणि डेब्रिजचा वापर करून खड्डे भरले होते; मात्र ४ सप्टेंबरपासून मुंबईत पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने पेव्हरब्लॉक आणि डेब्रिज उखडल्याने रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत.

रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी पेव्हरब्लॉकच्या वापरावर पालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी बंदी घातल्यानंतर पालिका ‘हॉटमिक्‍स’चा वापर करत होती. दोन वर्षांपासून ‘कोल्डमिक्‍स’चा वापर करण्यात येतो. पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांना यंदा १२०० टन कोल्डमिक्‍स देण्यात आले. मात्र, पालिकेने कोल्डमिक्‍सऐवजी पेव्हरब्लॉकचा वापर केला. पावसासमोर पेव्हरब्लॉकने तग न धरल्याने ते उखडले आहेत. परिणामी रस्ते खड्डेमय झाले आहेत.

चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. अनंत चतुदर्शीला मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन होते. विसर्जन सोहळ्यात खड्ड्यांचे विघ्न येऊ नये म्हणून पालिकेने रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत.
- नरेश दहीबावकर, अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. विसर्जन सोहळ्यात खड्ड्यांचे विघ्न येणार नाही, याची काळजी घेत आहोत.
- यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती, मुंबई पालिका

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh immersion difficult due to road potholes in mumbai