
बारामती शहर : आदर्श गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची प्रथा यंदाही कायम ठेवत बारामतीतील बहुसंख्य मंडळे व कुटुंबानीही पर्यावरणपूरक विसर्जनाला पसंती दिली.
बारामती नगरपालिकेसमवेत एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियासह अनेक संस्थांनी केलेल्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जन संकल्पनेला आज बहुसंख्य बारामतीकरांनी प्रतिसाद दिला. नगरपालिकेने बाराहून अधिक ठिकाणी कृत्रीम टाक्या व कृत्रिम तलाव तयार केले होते.
बारामती शहर : आदर्श गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची प्रथा यंदाही कायम ठेवत बारामतीतील बहुसंख्य मंडळे व कुटुंबानीही पर्यावरणपूरक विसर्जनाला पसंती दिली.
बारामती नगरपालिकेसमवेत एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियासह अनेक संस्थांनी केलेल्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जन संकल्पनेला आज बहुसंख्य बारामतीकरांनी प्रतिसाद दिला. नगरपालिकेने बाराहून अधिक ठिकाणी कृत्रीम टाक्या व कृत्रिम तलाव तयार केले होते.
नीरा डावा कालव्यात विसर्जन करुन पर्यावरणास धोका निर्माण होऊ नये या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून नगरपालिका व फोरमच्या वतीने लोकांचे प्रबोधन केले जाते. ज्यांना कालव्यातच विसर्जन करण्याची इच्छा असते, त्यांना विरोध केला जात नाही, मात्र जी मंडळे किंवा कुटुंबे स्वखुशीने कृत्रीम कुंडात किंवा तलावात विसर्जन करु इच्छितात त्यांना मदतीची भूमिका घेतली जाते.
पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे या उद्देशाने मूर्ती स्विकारण्यासह निर्माल्य देखील कालव्याच्या पाण्यात जाऊ नये या साठी नगरपालिकेने जागोजागी कोरोगेटेड बॉक्सेस ठेवले होते. ट्रॅक्टर ट्रॉलीची यंत्रणा सज्ज असल्याने जागोजागी बॉक्सेस भरल्यानंतर ते रिकामे करुन पुन्हा निर्माल्य गोळा केले जात होते.
बारामती गणेश फेस्टीव्हल, बारामती शहर पोलिसांच्या मंडळांनी कृत्रीम कुंडातच मूर्ती विसर्जित करुन पर्यावरणपूरकतेचे दर्शन घडविले.
आज सकाळपासूनच बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांच्यासह आरोग्य निरिक्षक सुभाष नारखेडे, राजेंद्र सोनवणे, अजय लालबिगे यांच्यासह अनेक कर्मचारी नीरा डावा कालव्याच्या महत्वाच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून होते. सकाळ यीनचे अनेक सदस्य आज बारामती नगरपालिकेच्या कर्मचा-यांच्या मदतीसाठी विविध ठिकाणी उपस्थित होते. त्यांनीही नागरिकांचे प्रबोधन केले.
कालव्याचे प्रदूषण होऊ नये याची काळजी त्यांच्याकडून घेतली जात होती, मात्र जर कोणी कालव्यातच मूर्ती विसर्जित करण्याची इच्छा प्रकट केली तर त्यांना विरोधही केला जात नव्हता. प्रबोधनातून हे उद्दीष्ट पूर्ण करण्यावर सर्वांचाच भर होता, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याचीही काळजी या दरम्यान घेतली गेली.
गुलाल व डीजेविरहीत मिरवणूक
आज दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे बहुसंख्य मंडळांनी गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला तर ढोल व ताशा तसेच लेझीम पथकांच्या मदतीने मिरवणूक पार पाडण्याचा प्रयत्न केला. प्रशासनास सहकार्याची भूमिका सर्वच मंडळांनी घेतलेली असल्याने दुपारपर्यंत शांततेत विसर्जन प्रक्रीया सुरु होती.
बारामती- शहरातील तीन हत्तीचौकात बारामती गणेश फेस्टीव्हलच्या गणपतीचे कृत्रीम कुंडात विसर्जन केले गेले. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, फेस्टीव्हलचे प्रमुख किरण गुजर यांच्यासह एन्व्हॉर्यमेंटल फोरमचे कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.