
काळबादेवीचा राजा, लॅमिंग्टन रोडचा गणपती, त्रिभुवन रोडचा राजा, राजकोटचा राजा, माटुंग्याचा वरद विनायक, प्रेम सागर मित्र मंडळ आदी मंडळांनी गणपती बाप्पाची कागदी मूर्ती साकारून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला आहे...
मुंबई : गेल्या वर्षीपासून मुंबईत पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचे वारे वाहू लागले. सजावटीच्या साहित्यातून थर्माकोल बऱ्यापैकी बाहेर पडला. यंदा अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. यंदा काळबादेवीचा राजा, लॅमिंग्टन रोडचा गणपती, त्रिभुवन रोडचा राजा, राजकोटचा राजा, माटुंग्याचा वरद विनायक, प्रेम सागर मित्र मंडळ आदी मंडळांनी गणपती बाप्पाची कागदी मूर्ती साकारून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला आहे.
विलेपार्लेतील मंडळाने याआधी कागदी मूर्ती तयार केली. यंदा तेजुकाय मेंशनच्या गणेशाची मूर्ती कागदापासून साकारली जात आहे. गिरगावचा राजा व जीएसबी सेवा मंडळ (किंग्ज सर्कल)ची मूर्ती पूर्णपणे शाडूच्या मातीने तयार करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेसुद्धा पर्यावरणस्नेही उत्सव साजारा करण्यासाठी पुढे येत आहेत.
१०० वर्षे मूर्तिकलेची परंपरा जपणारे मूर्तिकार आशीष पाटकर यांनी कागदी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती तयार केल्या आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पूर्णपणे पर्यावरणस्नेही आहेत. मूर्ती बनवण्यासाठी कागदाचा लगदा, लाकूड आणि जलरंगाचा वापर केला गेला आहे. एक मूर्ती बनवण्यासाठी सुमारे महिनाभराचा कालवधी लागतो. आठ फुटांपासू १५ फुटांच्या मूर्तीची किंमत एक ते पाच लाख रुपये आहे, अशी माहिती मूर्तिकार आशीष पाटकर यांनी दिली. मूर्तीसाठी नैसर्गिक घटक वापरले जातात आणि कारागिरांच्या पगारामुळे कागदी मूर्ती पीओपीपेक्षा महाग आहेत.
अशी बनते मूर्ती
कागदाच्या लगद्याचे तीन थर मूर्तीवर दिले जातात. असे थर सुकायला वेळ लागतो. मूर्तीच्या आतील बाजूस लाकडाने आधार दिला जातो. त्यानंतर जलरंगांनी मूर्तीचे रंगकाम केले जाते. त्यातील एक मूर्ती अमेरिकेला पाठवण्यात आली आहे.
काळबादेवीच्या राजाची १५ फुटांची कागदी मूर्ती पीओपीच्या मूर्तीप्रमाणेच रेखीव आहे.
मूर्तिकाराने प्रयत्न केले तर कागदाच्या लगद्यापासून सुबक गणेशमूर्ती तयार करता येते. मूर्तिकार व मंडळाने पर्यावरणपूरक मूर्तीचा आग्रह धरावा.
- आशीष पाटकर, गिरगाव