घाऊक बाजारात फळे महागली 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 September 2018

तुर्भे - गणेशोत्सवामुळे फळांच्या मागणीत दुप्पट वाढ झाल्याने त्यांच्या दरातही 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. सफरचंद, मोसंबी, डाळिंब या फळांचे दर वाढले आहेत. 

तुर्भे - गणेशोत्सवामुळे फळांच्या मागणीत दुप्पट वाढ झाल्याने त्यांच्या दरातही 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. सफरचंद, मोसंबी, डाळिंब या फळांचे दर वाढले आहेत. 

एपीएमसीच्या घाऊक बाजारात सध्या फळांच्या दररोज 250 ते 300 गाड्या येत आहेत. सफरचंद, डाळिंब, सीताफळ, मोसंबी, संत्री यांचा हंगाम सुरू झाल्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात दररोज 25 ते 30 गाड्या फळांची विक्री होत आहे. सफरचंद, डाळिंब, मोसंबी ही फळे जास्त दिवस टिकत असल्याने त्यांना जास्त मागणी आहे. सिमला येथून सफरचंदाच्या 100 गाड्या दररोज बाजारात येत आहेत. त्यांच्या दरात पेटीमागे 100 ते 200 रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात 25 ते 30 किलोच्या पेटीला 1800 ते 2200 रुपये एवढा दर होता. तो आता 1,900 ते 2,500 झाला आहे. सीताफळ व डाळिंबाच्या दरात 15 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे.

नगर, पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली येथून डाळिंबाच्या 50 गाड्यांची रोज आवक होत असतानाही घाऊक बाजारात 80 आणि किरकोळ बाजारात 120 ते 180 रुपये किलो एवढा त्यांचा भाव आहे. पुणे, नगर जिल्ह्यातून दाखल होणाऱ्या 25-30 गाड्या सीताफळे येत आहेत. त्यांचा घाऊक दर 30 ते 100 रुपये किलो आहे. नागपूरमधून 15-20 गाड्या मोसंबी बाजारात येतात. आठ डझनला तिचा भाव 800 ते 1000 रुपये आहे. गणेशोत्सवात फळांना मागणी वाढल्याने त्यांच्या दरात 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे, असे भरत देवकर या घाऊक व्यापाऱ्याने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fruits are expensive due to Ganeshotsav