मोरयाच्या जयघोषात लाडक्‍या गणरायाचे आगमन 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 August 2017

कऱ्हाड - ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात लाडक्‍या गणरायाचे आज मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. येथील कुंभारवाड्यासह विविध ठिकाणी सकाळपासूनच घरगुती प्रतिष्ठपनेसाठी गणेशमूर्ती नेण्याची लगबग सुरू होती. वाद्याचा गजर व फटाक्‍यांची आतषबाजी करत मोठ्या भक्तिमय वातावरणात लाडक्‍या गणरायाचे आगमन झाले. 

कऱ्हाड - ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात लाडक्‍या गणरायाचे आज मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. येथील कुंभारवाड्यासह विविध ठिकाणी सकाळपासूनच घरगुती प्रतिष्ठपनेसाठी गणेशमूर्ती नेण्याची लगबग सुरू होती. वाद्याचा गजर व फटाक्‍यांची आतषबाजी करत मोठ्या भक्तिमय वातावरणात लाडक्‍या गणरायाचे आगमन झाले. 

येथील सोमवार पेठेतील कुंभारवाड्यात तसेच रविवार पेठेतील कुंभार गल्लीत सकाळपासूनच भाविकांनी घरगुती गणेशमूर्ती नेण्यासाठी गर्दी केली होती. कुंभारवाड्यातील गर्दी लक्षात घेऊन वाहतूक शाखेचे कर्मचारी सकाळपासूनच तैनात होते. गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने शहर दणाणून गेले होते. घरगुती प्रतिष्ठापनेसाठी मूर्ती नेण्यासाठी कुटुंबातील आबालवृध्द मोठ्या उत्साहात येत होते. कृष्णा नाका ते कन्याशाळा मार्गावर गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर विविध साहित्यांचे स्टॉल्स, दुकाने लागली होती. त्यात अगरबत्ती, धूप, नारळ, फुलांचे हार, लाकडी पाट, शोभेच्या वस्तू, कापडी टोप्या आदींचा समावेश होता. काहींनी सजवलेल्या पालखीतून मूर्ती नेली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा वाद्यांचे प्रमाण कमी असल्याचे पाहायला मिळत होते. दुपारी काही काळ पावसाची रिमझिम सुरू झाल्यावर छत्रीचा तसेच प्लॅस्टिक कागदाचा आधार घेत मूर्ती भिजू नये याची काळजी घेताना घरगुतीसह सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती नेण्याची लगबग सुरू होती. येथील कुंभारवाड्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यातर्फे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त कुंभारवाड्यातून गणेशमूर्ती नेणाऱ्या प्रत्येकाला कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पिशवीवर भाजपच्या नगरसेवकांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.

विनामूल्य रिक्षाची सोय.... 
पालिकेतील भाजपचे नगरसेवक सुहास जगताप यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर येथील कुंभारवाड्यातून घरापर्यंत गणेशमूर्ती नेण्यासाठी २१ रिक्षांची सोय केली होती. काल दुपारपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला. शहरासह, गजानन सोसायटी, विद्यानगर, कार्वे नाका आदी ठिकाणी गणेशमूर्ती नेणाऱ्या अनेक नागरिकांनी या उपक्रमांतर्गत विनामूल्य रिक्षाचा लाभ घेतला. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुकही केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 karad ganesh ustav