esakal | या रे या, सारे या, गजाननाला आळवू या...! 
sakal

बोलून बातमी शोधा

या रे या, सारे या, गजाननाला आळवू या...! 

या रे या, सारे या, गजाननाला आळवू या...! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - "या रे या, सारे या, गजाननाला आळवू या...' असे आनंदगीत गात आज दुपारपासूनच सर्वत्र गणेश आगमन सोहळ्याला प्रारंभ झाला. दुपारी तीनच्या सुमारास जोरदार पावसाने लावली; मात्र त्याची तमा न बाळगता सळसळत्या उत्साहात बाप्पांचे आगमन झाले. गंगावेस कुंभार गल्ली, शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प आदी ठिकाणी मूर्ती नेण्यासाठी सहकुटुंब मोठी गर्दी झाली. पारंपरिक वाद्यांच्या गजराला लेसर शोची झळाळी मिळाली आणि सारा आसमंत सप्तरंगात न्हाऊन निघाला. 

गेला महिनाभर गणेशोत्सवाची शहरात जोरदार तयारी सुरू आहे. हा उत्साह आता आणखी टिपेला पोहोचला असून बाप्पा घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांच्या मंडपात विराजमान होणार आहे. गेले दोन दिवस काही मंडळांचे आगमन सोहळे सजले तर आज दुपारपासूनच ग्रामीण भागातील मंडळांनी मूर्ती नेण्यासाठी हजेरी लावली. सायंकाळनंतर शहरातील मंडळांचे ताफे मूर्ती नेण्यासाठी आले. "गणपती बाप्पा मोरया', "एक-दोन-तीन-चार... गणपतीचा जयजयकार'... अशा जयघोषाने सारे शहर दुमदुमून गेले. रात्री उशिरापर्यंत हा जल्लोष टिपेला पोहोचला. 

अंबाबाई मंदिर गरूड मंडपातील श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्या मानाच्या गणपतीची गंगावेस कुंभार गल्ली येथून आगमन मिरवणूक निघाली. मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ झाला. करवीर नाद ढोल-ताशा पथक आणि सुप्रभात ब्रास बॅंडच्या निनादात ही मिरवणूक निघाली. विश्‍वपंढरी येथील गणरायाच्या मिरवणूक महिलांचे लेझीम पथक, धनगरी ढोल आणि गजनृत्य लक्षवेधी ठरले. आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्‌घाटन झाले. दिलबहार तालीम मंडळाच्या दख्खनचा राजा गणरायाच्या आगमन मिरवणुकीला रात्री नऊच्या सुमारास व्हिनस कॉर्नर येथून प्रारंभ झाला. हरिपूरचा ब्रास बॅंड मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरला. जुना राजवाड्यातील गणरायाचे आगमन आज झाले. मात्र नवीन राजवाड्यावर उद्या (ता. 25) सकाळी अकरा वाजता लवाजम्यासह बाप्पांचे आगमन होईल. 

दरम्यान, उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून आता उद्या (शुक्रवार) पासून सर्वत्र आनंदपर्वाला प्रारंभ होईल. सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने आनंदाला आणखी उधाण येईल. 

मोफत रिक्षा सेवा 
महाद्वार-गुजरी येथील दगडू ग्रुपतर्फे उद्या (शुक्रवार) दिवसभर मूर्ती नेण्यासाठी दोन रिक्षांची मोफत सेवा दिली जाणार आहे. एमएच 09 जे 6482 आणि एमएच 09 सीडब्ल्यू 973 या दोन रिक्षा पापाची तिकटी येथे उपलब्ध असतील. गणेशभक्त आरिफ पठाण व महालक्ष्मी रिक्षा मित्र मंडळाच्या वतीने दिवसभर मोफत रिक्षा सेवा दिली जाणार आहे. एकूण 21 रिक्षांतून ही सेवा दिली जाणार आहे. सकाळी आठ वाजून 20 मिनिटांनी या उपक्रमाचे महापौर हसीना फरास, देवस्थान समिती खजानीस वैशाली क्षीरसागर, पद्मा तिवले, वृषाली सिराळे, पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, आर. आर. पाटील, किरण शिराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‌घाटन होईल. 

आगमनाच्या वाटेवर 
नवीन राजवाड्यावरील गणपती लवाजम्यासह आज येणार 
शिवाजी चौकातील महागणपती उद्या होणार खुला 
घरगुती बाप्पांचा यंदा सहा दिवसांचा तर सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचा अकरा दिवस मुक्काम 
पावसाची तमा न बाळगता सळसळता उत्साह 
समृद्धीच्या पावलांनी मंगळवारी गौराई तर बुधवारी येणार शंकरोबा 

सात किलो चांदीची मूर्ती 
मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिरात सात किलो चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. उत्सवकाळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. संत तुकाराम गाथा ग्रंथाचे वाचन होईल. 

वाहतुकीची कोंडी 
ग्रामीण भागातील मंडळे दुपारनंतर मूर्ती नेण्यासाठी शहरात येऊ लागली. मूर्ती घेऊन परतत असतानाच शहरातील मंडळे दाखल झाली. त्यामुळे चारनंतर शहरातील सर्व प्रमुख मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. ही कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांसह त्या त्या परिसरातील मंडळांचे कार्यकर्ते प्रयत्न करीत होते.