मंगल सुरांच्या साक्षीने गणरायाचे आगमन 

मंगल सुरांच्या साक्षीने गणरायाचे आगमन 

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गात गणरायाचे दिमाखात आगमन झाले. मुसळधार पाऊस असूनही जिल्ह्यातील गावागावांत गणेशभक्तीचे आल्हाददायक झरे वाहू लागले. चाकरमान्यांच्या आगमनाने आणि भजनसुरांच्या मंगलमय वातावरणात सिंधुदुर्ग गजबजून गेला. 

जिल्ह्यातील सर्वांत मोठा सण म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. गेले काही दिवस याची पूर्वतयारी सुरू होती. नेमकी गणेशोत्सव काळातच पावसाला सुरवात झाली; तरीही सिंधुदुर्गवासीयांचा उत्साह तसूभरही कमी झाला नसल्याची प्रचीती आज या उत्सवाच्या पहिल्या दिवशी आली. 

बहुसंख्य भाविकांनी कालच मूर्ती वाजतगाजत घरी आणली होती. काहींनी आज सकाळी ढोलताशांच्या गजरात मूर्ती आणली. पहाटेपासून पुरोहिताच्या उपस्थितीत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारनंतरही अनेक ठिकाणी मूर्तिपूजन सुरू होते. 

जिल्ह्याभरात या उत्सवानिमित्त लाखो चाकरमाने दाखल झाले आहेत. मूळ जिल्ह्यातील काही व्हीआयपीही या सणाच्या निमित्ताने आपापल्या घरी पोहोचले. यात केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर आदींचा समावेश आहे. त्यांच्या घरी गणरायाची पारंपारिक पद्धतीने प्रतिष्ठापना करण्यात आली. ऐतिहासिक परंपरा असलेली सावंतवाडी संस्थानची गणेशमूर्ती, सावंतवाडीतील 111 वर्षे जुना सार्वजनिक गणशोत्सव असलेल्या सालईवाडा येथील गणेशमूर्ती, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्‍वर मंदिरातील मूर्ती, आचरा येथील श्री देव रामेश्‍वर संस्थानमधील उत्सव, कुडाळ येथील कॉंग्रेसच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवातील सिंधुदुर्ग राजाची भव्य मूर्ती आदींची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमही झाले. 

जिल्ह्यात 35 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्तिपूजन केले. यांतील बहुसंख्य गणेशमूर्ती अनंत चतुर्थीपर्यंत राहणार आहेत. अनेकांनी आकर्षक देखावे साकारण्यास सुरवात केली आहे. आज प्रामुख्याने मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. देखावे टप्प्याटप्प्याने पुढच्या दोन दिवसांत भाविकांना दर्शनासाठी सज्ज होणार आहेत. जिल्ह्यात सुमारे 67748 ठिकाणी घरगुती गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. या उत्सवामुळे गावागावात मंगलमय सूर उमटू लागले आहेत. वाड्यावाड्यांवर आरती, भजनाला सुरवात झाली आहे. चाकरमानी मंडळी यात उत्साहात सहभागी झाल्याचे चित्र आहे. आज पहिला दिवस असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. उद्यापासून चाकरमानी खरेदीसाठी बाहेर पडणार असल्याने आर्थिक उलाढालीलाही गती येणार आहे. 

संततधार सुरूच 
सिंधुदुर्गात गणेशोत्सवावर पावसाचे सावट आहे. आज पहिल्या दिवशी सकाळीच पावसाने झोड उठविली. यामुळे भाविकांना मूर्ती आणण्यापासून पुजनापर्यंत बरीच कसरत करावी लागली. पावसामुळे जिल्ह्यातील बऱ्याच भागात वीजपुरवठा खंडित झाला. याचा फटकाही बसला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com