लोणावळ्यात समाज प्रबोधन देखाव्यांवर भर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

लोणावळा - लोणावळा परिसरात या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक देखाव्यांसह समाजप्रबोधन करणाऱ्या विषयांवर आधारित देखाव्यांवर भर देण्यात आला आहे. 

लोणावळा - लोणावळा परिसरात या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक देखाव्यांसह समाजप्रबोधन करणाऱ्या विषयांवर आधारित देखाव्यांवर भर देण्यात आला आहे. 

मानाचा पहिला गणपती असलेल्या रायवूड गणेश मंडळाची गणेशमूर्ती भाविकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. सचिन गोणते यंदाच्या उत्सव कमिटीचे अध्यक्ष आहेत. मानाचा दुसरा गणपती असलेला रायवूड येथील तरुण मराठा मंडळाच्या वतीने या वर्षी ‘रेड्यामुखी वेद’ हा धार्मिक हलता देखावा साकारण्यात आला आहे. संकेत निकुडे अध्यक्ष आहेत. मानाचा तिसरा गणपती असलेला रोहिदास वाडा येथील संत रोहिदास मित्र मंडळ यंदा साधेपणाने उत्सव साजरा करत असून मयूर गायकवाड अध्यक्ष आहेत. मानाचा चौथा गणपती असलेला गवळीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत आहे. हेमंत मिंडे यंदाचे अध्यक्ष आहेत. मानाचा पाचवा गणपती असलेला वळवण येथील शेतकरी भजनी मंडळाकडून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून नारायण पाळेकर यंदाचे अध्यक्ष आहेत. भव्य देखाव्यासाठी तसेच मावळचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवाजी मित्र मंडळाने यंदा ‘कैलास पर्वत’चा भव्य देखावा उभा केला असून, तो पाहण्यासाठी मावळ तालुक्‍यातून भाविकांची गर्दी होत आहे. प्रकाश चौहान मंडळाचे अध्यक्ष आहे. नवा बाजार येथील श्री नेहरू तरुण मंडळाने यावर्षी ‘बारा ज्योतिर्लिंग’ हा धार्मिक देखावा साकारला आहे. सचिन राठोड हे अध्यक्ष आहेत. नाकोडा कॉम्प्लेक्‍समधील श्री राणाप्रताप नेताजी मित्र मंडळाच्या वतीने यंदा ‘सिंहगड-तानाजी मालुसरे पराक्रम’ हा ऐतिहासिक देखावा साकारला आहे. पक्षाल पालरेचा मंडळाचे अध्यक्ष आहेत. पौराणिक देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या तुंगार्ली येथील ओंकार तरुण मंडळाने यंदा ‘महिषासुर मर्दन’ हा पौराणिक हलता देखावा सादर करण्यात आला आहे. राजू बच्चे मंडळाचे मानद अध्यक्ष आहेत. छत्रपती शिवाजी चौकातील महात्मा फुले फळ-भाजी मंडई गणेशोत्सव मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेला ‘हनुमान भक्ती’ हा पौराणिक देखावा नागरिकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. यशवंत ऊर्फ तम्माशेट बोराटी हे मानद अध्यक्ष आहेत. रोहिदास वाडा येथील महाराष्ट्र मातंग समाज मंडळ साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत असून लोणावळ्याचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेली लालबागच्या राजाची मूर्ती आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. प्रियदर्शिनी संकुल येथील श्री अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने ‘बिघडलेली संस्कृती’ हा हलता देखावा नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. येथील तुफान मित्र मंडळाने प्रतिपंढरपूर हा देखावा साकारला आहे. हर्शल रोकडे मंडळाचे अध्यक्ष आहेत. टेबल लॅंड येथील श्री नवयुग मित्र मंडळाने इंद्र दरबार देखावा साकारला आहे. रज्जाक कुरेशी हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. मावळा पुतळा येथील तानाजी युवक मित्र मंडळाने ‘गणेश महल’ हा देखावा साकारला असून प्रदीप लुणिया अध्यक्ष आहेत. शिवाजी उदय मित्र मंडळाने रोषणाई केली असून सुनील बोरकर मंडळाचे अध्यक्ष आहेत. लोणावळ्यातील सर्वांत जुना भांगरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुकुल फडके अध्यक्ष आहेत.

गावठाण येथील श्री जय महाराष्ट्र मित्र मंडळ व गजानन मित्र मंडळ यंदा संयुक्तपणे गणेशोत्सव साजरा करत आहे. मंडळाची लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली गणेशमूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. अनंत शेळके मंडळाचे अध्यक्ष आहेत. सह्याद्रीनगर, हुडको मित्र मंडळाच्या वतीने यंदा साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येत असून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. 

रेल्वे पोर्टर चाळ येथील श्री साई आझाद मित्र मंडळ, नांगरगाव जयहिंद मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ, भांगरवाडी येथील श्री शिवाजी युवक मित्र मंडळ, इंद्रायणीनगर मित्र मंडळ, नटराज मित्र मंडळ, खंडाळा येथील नवजीवन मित्र मंडळ, दत्तवाडी, कुसगाव येथील नवनाथ मित्र मंडळाच्या वतीने यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 lonavala ganesh ustav